कुडतरकर, गजानन

प्रत्येक कलावंत हा तोंडाने नाही तर त्याच्या कलेतून बोलत असतो. त्याच्या तत्वांना, भावनांना, व आयुष्यभर जोपासलेल्या स्वप्नांना तो कलेच्या सौंदर्यामध्ये घोळवत असतो, मुर्तरूप देत असतो, त्यांना एका अर्थाने जीवंतच करत असतो. खळबळलेला समुद्र जसं आपल्या मनातलं वादळ व्यक्त करण्यासाठी लाटांचा आधार घेतो, त्याप्रमाणे कलावंत आपल्या कलेतून ही तळमळ रसिकांसमोर मांडत असतो. पायामधील पैंजण ज्याप्रमाणे हळुवार वाजुन पावलं कुठे चालली आहेत याची जाणीव करून देतात, त्याप्रमाणे कलाकाराच्या मनाचा थांगपत्ता हा त्याच्या कलेच्या अविष्कारामधून केवळ दर्दी रसिकांनाच लागु शकतो. त्याच्या आदर्श आयुष्याच्या संकल्पना इतरांपेक्षा फार वेगळ्या नसल्या तरीही त्याची जगण्याची शैली व इतरांशी संवाद साधण्याची पध्दत वेगळी असल्यामुळे काही जणांना त्याचा स्वभाव भावतो, तर काही जणांना खटकतो. त्याला चारचौघांसारखे सामान्य व चाकोरीबध्द आयुष्य जगायला लावण्याचा, चांगले शिक्षण किंवा नोकरी मिळवून देण्याचा त्याच्या आयुष्यामधील स्वच्छंदीपणावर अंकुश ठेवण्याचा कितीही प्रयत्ना केला तरीही त्याचा फायदा होत नाही. कारण सामान्य जगण्याच्या चौकटी धुडकावून स्वतःच्या मनाला रूचेल अशी जगण्याची नवी मुक्त चौकत बनवणे, व आयुष्यामधल्या विवीध वाटा चोखंदळून आपल्या भावनांना व विचारांना इतरांपर्यंत पोहोचवण्याची कला शोधणे, व त्या कलेतील सुक्ष्म बारकावे शोधून त्या कलेवर पूर्ण प्रभुत्व गाजवण्याचा प्रयत्न करणे हे प्रत्येक सच्या कलाकाराच्या आयुष्यातील एक अनिवार्य वळण असते.

जे. जे. स्कुलमधील शिल्पकला व मॉडेलिंग ची जी. डी. आर्ट ही पदवी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण केल्यानंतर शहरात अतिशय चांगल्या संधी व मान उपलब्ध असूनसुध्दा गुंजीससारख्या लहानशा खेड्यात शहरी झगमाटापासून व गजबजाटापासून अगदी दूर आपल्या शिल्पकलेचा कारखाना सुरू करणारे व हिरव्यागर्द निसर्गाच्या व विविध पशुपक्ष्यांच्या सानिध्यात आपल्या शिल्पांना बोलत करणारे हाडाचे कलाकार म्हणजे श्री गजानन कुडतरकर. गेली अनेक वर्षे हा कलाकार विनम्रपणे शिल्पकलेची साधना करीत आहे. स्वताःच्या उत्तुंग प्रतिभेला साजेशा अशा कलाकृती निर्माण करून त्या लोखंडवाला व अनेक बड्या व्यावसायिकांना व उद्योगपतींना विकत आहे. संवेदनशील विचार, अफलातुन निरीक्षणक्षमता, आजुबाजुच्या निसर्गाबद्दल बाळगलेले अफाट प्रेम, व समाजात काही चांगले बदल घडून यावेत याबद्दलची तळमळ ही त्यांच्या स्वभावातील काही ठळक वैशिष्ठे. त्यांच्या कार्यशाळेतील प्रत्येक शिल्प काळजीपुर्वक निरखल्यानंतर असे ध्यानात येते की आपल्याला अंतर्मुख व्हायला लावतील, व निसर्गाच्या विशाल व क्षमाशील रूपासमोर आपले अस्तित्व खुजे ठरवायला लावतील असे कितीतरी विचार व गोष्टी ते त्यांच्या शिल्पांच्या माध्यमातून नेहमीच मांडतात. निसर्गावर कुरघोडी करून प्रत्येक गोष्टीचं व्यापारीकरण करायला निघालेला माणूस त्यांना मनापासून चीड आणतो व ही चीड ते नव्हे तर त्यांची शिल्पे व्यक्त करतात. कुर्डतरकरांची असामान्य कला ही कुठल्याही पुस्तकापासून किंवा वैज्ञानिक सिध्दांतांपासून जन्मलेली नसून ती त्यांना वेडं करणार्‍या निसर्गापासून व त्यांच्या सामाजिक बांधिलकीपासून जन्मलेली आहे. त्यामुळे प्रत्येक शिल्प घडवताना त्याच्या शरीररचनेबद्दल, प्रमाणबध्दतेबद्दल व त्यासाठी वापरण्यात येणार्‍या पध्दतींच्या तंत्रशुध्दपण बद्दल कुर्डतरकर जेवढे दक्ष असतात, तेवढेच ते त्याचा जीवंतपणा, गहिरेपणा, व त्या शिल्पांतून रसिकांपर्यंत पोहोचणार्‍या संदेशाच्या तीव्रतेबद्दलही तेवढेच जागरूक असतात. त्यामुळे त्यांची ही शिल्पे नेत्रसुखद वाटण्याबरोबरच आपल्या सरळ मनाला जाऊन भिडतात. आपल्यामधील दडलेल्या निसर्गप्रेमाला, माणुसकीला, व नैतिकतेला साद घालून आपण इतकी वर्षे आपल्या पर्यावरणाकडे पाहात असलेल्या दृष्टीलाच बदलवतात. ही शिल्पे शोभेचे पुतळे नसून आपल्या मनाशी संवाद साधणारे बोलके असे बाहुलेच वाटतात, ज्यांचा आवाज हा कुर्डतरकरांच्या प्रतिभेतून व निर्माणशक्तीतून आला आहे. स्वतःच्या आयुष्यात आलेले अनेक सुखद व दुःखद अनुभव, वेगळे वाटलेले हृद्यस्पर्षी प्रसंग, कडु गोड आठवणी, व निसर्गशाळेने त्यांना दिलेल्या असंख्य शिकवणींची शिदोरी ते शिल्पकलेच्या माध्यमातून इतरांसमोर मांडत असले तरीही केवळ शिल्पे बनवून ते थांबत नाहीत तर निरनिराळे प्रयोग करून आपली शिल्पे पर्यावरणाच्या हातात हात धरून कशी चालतील याचाही विचार करतात. काही तासांतच पाण्यात पुर्णपणे विरघळणारा कागदाचा लगदा व शाडुच्या मातीपासून बनवलेला मजबुत गणपती ही कुर्डतरकरांची शक्कल आहे. त्यांची हीच संशोधक वृत्ती त्यांच्या अनेक शिल्पांमधूनही दिसते. असंख्य श्रोतेवर्गाला मंत्रमुग्ध करण्याची ताकद असलेले बासरी हे वाद्य, कुठल्याही कारागिराने बनविलेले नसून ते कसे निसर्गाच्या किमयेतून जन्माला आले आहे हे लोकांना समजवणारे जीवन हे शिल्प असो किंवा महाराष्ट्र शासनाने सुवर्णपदक देऊन गौरविलेले कंडोलन्स म्हणजे एखाद्या मयताच्या वेळी केलेले सांत्वन साकारणारे अतिशय हृद्यस्पर्षी असे शिल्प असो, या अशा शिल्पांद्वारे त्यांची संशोधक वृत्ती प्रतिबिंबीत होते.

गाजलेली शिल्पे

संवेदनशील विचार पोहोचवणारी, रेखीव व कलात्मकतेकडे झुकणारी, अतिशय भावपूर्ण बोलके डोळे व देहबोली असणारी, अशी कुर्डतरकरांच्या शिल्पांची सर्वदूर पसरलेली किर्ती आहे. त्यांनी टिपु सुलतान या टी. व्ही. मालिकेसाठी पन्नास ते साठ राजेशाही व सुंदर नक्षीकाम व बारीक कोरीवकाम केलेली तबके व भांडी बनवून दिली होती. याशिवाय कंडोलन्स नावाचे महाराष्ट्र शासनाने सुवर्णपदक देऊन गौरविलेले व अतिशय गाजलेले शिल्प, पत्रकार भवन अलिबागमध्ये साकारलेला भालचंद्र महाराजांचा पुतळा, लोणावळ्यामधील लोखंडवालामध्ये अठरा फुटांचा आफ्रिकन जमातीचा डौलदार हत्ती, वेंगुर्लेमधील जेष्ठ समाजसेवक तुळसकर यांची सुबक मुर्ती, नेफेन्सी रोडवरील सोफैय्या कॉलेजशेजारी कृत्रिम [बांबुंच्या तट्ट्यांचा] डोंगर व हिरवीगार बाग तयार करून अतिशय अप्रतिम व जीवंत वाटणारं हरणांच फायबर ग्लासमधील कुटुंब, पत्र्यावर ठोकून ठोकून बनविलेले रिपोसिंग हे शिल्प, सावरकरांचा पुतळा (रत्नागिरी), मार्बलमध्ये मढविलेले पाच फुट हत्तिणीचे पिल्लु, व संगमरवरी सौंदर्यामध्ये साकारलेले प्रसन्न हसरे साई बाबा ही त्यांची आतापर्यंतची काही नावाजलेली व गौरविली गेलेली शिल्पे आहेत. त्यांच्या रिपोसिंग या शिल्पाला शासनाकडून रौप्यपदक मिळाले आहे. अवघ्या महाराष्ट्राची शान असलेला विधानभवनातील अठरा फुट उंचीचा राजेशाही सिंहस्तंभ साकारताना गजानन कुर्डतरकर हे विद्यार्थी म्हणून सहभागी झाले होते. कुर्डतरकरांनी शाडुची माती, प्लास्टर ओफ पॅरिस, धातु, मार्बल, काच, लाकुड, पत्रा, अशा जवळजवळ सर्व प्रकारांमध्ये शिल्पे बनवण्यात प्राविण्य मिळविले असून विविध आकारांचे व रंगीबेरंगी कारंजे बनविणे हा त्यांचा जिव्हाळ्याचा विषय आहे. सर्व आबालवृध्दांस रिझविणारे अनेक कारंजे तयार करून त्यांनी ते अनेक प्रतिष्ठित व लोकप्रीय उद् ानांमध्ये बसविले आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*