तांबेकर, (डॉ.) डी. एच.

 

मुळचे वर्धा जिल्ह्यातील असणारे डॉ.डी.एच. तांबेकर सुक्ष्मजीव शास्त्रज्ञ व त्यातील संशोधन करणारे वैज्ञानिक म्हणून प्रसिद्ध आहेत. उच्च शिक्षण नागपूर विद्यापीठातनं पूर्ण झालं असून, मध्य प्रदेशातील सागर विद्यापीठातून त्यांनी “आचार्य” ही पदवी संपादन केली. १९९४ सालापर्यंत अमरावतीच्या डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती वैद्यकीय महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून कार्यरत होते, व त्यानंतर संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात सूक्ष्मजीवशास्त्र, अर्थात “मायक्रोबायोलॉजी” विषयाचे विभागप्रमुख म्हणून रुजू झाले. आपल्या संशोधनाचा उपयोग हा तळागळातील व्यक्तींना व्हावा याकडे त्यांचा कटाक्ष राहिला आहे; त्यासाठी अथक परिश्रमानं लोणार सरोवरातून एक जिवाणू शोधून काढला ज्याचा उपयोग हा शेतीच्या विकासासाठी होऊ शकेल. हा जिवाणू मंगळ ग्रहावरून परतलेल्या “ओडिसी” या यानासोबत आलेल्या जिवाणूशी ९६% मिळता जुळता असून “बॉलिल्यूस ओडिसीई” असल्याचे पुरावे सुद्धा उपलब्ध झाले आहेत. “वॉटर मयक्रोबायोलॉजी” आणि “हायजिन मायक्रोबायोलॉजी” ही डॉ. तांबेकर यांच्या संशोधनाची क्षेत्र असून, सूक्ष्म जिवाणूंच्या शास्त्राचा वापर व सदुपयोग पेयजन, कृषी व औद्योगिक व्यवस्थेसाठी कसा करता येईल यावर त्यांचं संशोधन सुरु आहे. लोणार सरोवर व त्यातील जिवाणू व त्यातील पाण्याचे गुणधर्म याविषयी सुद्धा त्यांचं दिर्घकाळापासून संशोधन सुरु आहे. त्यांच्या आत्तापर्यंतच्या कारकीर्दीत राष्ट्रीय तसंच आंतरराष्ट्रीय स्तरावर सुद्धा १३० पेक्षा जास्त शोधनिबंध प्रकाशित झाले आहेत. त्याचप्रमाणे त्यांची ३ पुस्तके सुद्धा प्रकाशित झाली असून, आता पर्यंत तांबेकरांच्या सान्निध्यात व मार्गदर्शनाखाली १६ विद्यार्थ्यांनी पी.एच.डी. मिळवली आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*