आंबेडकर, (डॉ.) भीमराव रामजी

जन्म- १४ एप्रिल, १८९१ (महू, मध्य प्रदेश)
मृत्यू- ६ डिसेंबर, १९५६ (दिल्ली)

भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार आणि दलितांच्या उद्धारासाठी आपलं संपूर्ण जीवन पणाला लावलं असे थोर तत्वज्ञ आणि राजकीय नेते म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचं स्थान निर्विवाद आहे. बाबासाहेबांचा जन्म १४ एपिल १८९१ रोजी महु या गावी एका अस्पृश्य कुटुंबात झाला.

अस्पृश्य कुटुंबात जन्मल्यामुळे लहान वयापासून अन्यायकारक प्रथेचा अनुभव येत गेला. त्यांचे वडिल लष्करात सुभेदार मेजर होते, भीमराव आंबेडकरांचे माध्यमिक व महाविद्यालयीन शिक्षण मुंबईच्या एलफिन्स्टन हायस्कूल व महाविद्यालयात झाले. पदवी घेतल्यानंतर त्यांनी बडोदे संस्थानात नोकरी पत्करली. पण तिथे सुद्धा पदोपदी जातीच्या नावाखाली हेटाळणी होत असे. याचा त्यांच्या मनावर खोलवर परिणाम झाला. त्यांनी ती नोकरी सोडून, मुंबईतल्या सिडनहॅम महाविद्यालयात प्राध्यपकाची नोकरी स्वीकारली.

अन्याया विरुद्ध आवाज उठवून, अस्पृश्यांचा उद्धार हेच त्यांनी आपले जिवीत कार्य मानले. त्यासाठी आंबेडकरांनी अस्पृश्य कार्यकर्त्यांची संघटना उभारण्यास सुरुवात केली. १९१९ पासून त्यांचा सार्वजनिक जीवनात वावर सुरु झाला आणि अस्पृश्य समाजाच्या जागृतीचं आणि संघटनाचं कार्य करुन ते दलितांचे नेते म्हणून ही ओळखले जाऊ लागले.

१९२० मध्ये त्यांनी मुंबई येथून “मूकनायक” नावाचे पाक्षिक सुरु केले. त्याच वर्षी कोल्हापूर संस्थानातील अस्पृश्यांची माणगांव येथे परिषद आयोजित केली. तर नागपूरला छत्रपती शाहू महाराजांच्या अध्यक्षतेखाली आखिल भारतीय परिषद ही बोलावली, लोकजागृतीचं कार्य सुरु असतानाच स्वत:चे अर्धवट राहिलेलं शिक्षण पूर्ण करण्याकरिता ते इंग्लंडला गेले. आणि लंडन विद्यापीठाची डी.एस.सी. ही दुर्लभ पदवी संपादन करुन बॅरिस्टर झाले.

१९२४ मध्ये त्यांनी “बहिष्कृत हितकारिणी” ही संस्था स्थापन केली. “शिकवा, चेतवा व संघटित करा”हे या संस्थेचे ब्रीदवाक्य होते.

१९२७ मध्ये महाडच्या चवदार तळ्यावर सर्वसामान्यांप्रमाणे अस्पृश्यांनाही पाणी भरता यावे यासाठी त्यांनी आपल्या हजारो अनुयायांसह सत्याग्रह केला व त्याच वर्षी अस्पृश्यतेचा पुरस्कार करणारी “मनुस्मृती” आणली.

अस्पृश्यांना इतर भक्तांप्रमाणे देवाचे दर्शन घेता यावे यासाठी १९३० साली. काळाराम मंदीर प्रवेशासाठी सत्याग्रह ही केला, त्याचं नेतृत्व त्यांनी स्वत: केलं होतं.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर तिन्ही गोलमेज परिषदांना उपस्थित होते, तिथे त्यांनी अस्पृश्यांची बाजू अगदी हिरहिरीने मांडली; त्यांची स्वतंत्र मतदार संघांची मागणी ही मंजूर झाली. पण यामुळे म.गांधी आणि डॉ. आंबेडकर मध्ये मतभेद निर्माण झाले, त्यामुळे गांधीजींनी उपोषण आरंभले.

१९३६ साली त्यांनी स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना केली. प्रांतिक विधीमंडळाच्या झालेल्या निवडणूकीमध्ये ते प्रचंड बहुमतांनी निवडून आले.

१९४१ साली त्यांनी “ऑलइंडिया शेड्युलकास्ट फेडरेशन” नावाच्या देशव्यापी पक्षाची स्थापना करुन, अस्पृश्यांसाठी अनेक लढे ही दिले. तसंच अन्याय ग्रस्त समाज घटकांचं एक व्यापक पक्ष म्हणून स्थापना करण्याचा निर्णय बाबासाहेबांनी घेतला होता. त्याचं नाव “रिपब्लिकन पक्ष” असं ठरवण्यात आलं होतं, पण या पक्षाची स्थापना बाबासाहेबांच्या मृत्यू नंतर म्हणजे १९५७ साली करण्यात आली.

१९४२ ते १९४६ या कालखंडात बाबासाहेब व्हॉइसरॉयच्या कार्यकारी मंडळात मजूरमंत्री होते, भारत स्वतंत्र झाल्यावर ते केंद्रीय मंत्रिमंडळात विधी मंत्री झाले.

भारतीय राज्यघटनेच्या निमिर्ती मध्ये त्यांचा सिंहाचा वाटा आहे, सोबतच ते मसुदा समितीचे अध्यक्ष होते, अथक परिश्रम पणाला लावुन त्यांनी संविधनाचा मसुदा तयार केला होता, म्हणूनच त्यांना राज्यघटनेचे आदिशिल्पकार मानण्यात आलं आहे.

वाचन हा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा व्यासंग होता. ग्रंथाशिवाय आपण जगूच शकणार नाही असे त्यांना वाटे. त्यांच्याकडे दुर्मिळ अशा २५ हजार ग्रंथांचा संग्रह होता, बाबासाहेबांनी लिहिलेले अनेक ग्रंथ ही विचार प्रेरक आहेत.

आंबेडकरांच्या व्यासंगाचे व संशोधनकुशलतेचे प्तीक असलेला ग्रंथ म्हणजे “हु वेअर शुद्राज” तर त्यांचे “द अनटचेबल्स” या नावाचे पुस्तक ही उल्लेखनीय आहे.

जातीय संस्थेमुळे हिंदूधर्म पोखरला गेला आहे, अशी बाबासाहेबांची ठाम समजूत होती. धर्मांतर केल्याशिवाय अस्पृश्यांवरील त्रास व अन्याय दूर होणार नाही, अशी पक्की धारणा झाल्यानंतर त्यांनी १४ ऑक्टोबर १९५६ रोजी आपल्या अनेक अनुयायांसह नागपूर येथे बौध धम्माची दीक्षा घेतली. त्यानंतर बौध धम्माच्या प्रचार आणि प्रसारासाठीचे कार्य हाती घेतले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी, तसंच राजकीय आणि सामाजिक चळवळींनी प्रचंड क्रांतिकारी कार्य ही केले. त्यामुळेच शतकानुशतके मुक असणार्‍या एका मोठ्या समुदायाला बाबासाहेबांच्या रुपाने वाचा मिळाली.

भारताचे एक द्रष्ट नेते, श्रेष्ठ कायदेपंडित, तळा गळातील जनतेचा नेता आणि “एक विद्वान महामानव” अशा अनेक रुपांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची किर्ती आणि स्मृती चिरंतन रहाणार आहेत.

६ डिसेंबर १९५६ ला त्यांच महानिर्वाण झालं, त्यानंतर भारताचं सर्वोच्च असा “भारत रत्न” हा सन्मान मरणोत्तर बहाल करण्यात आला.

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*