रणदिवे, दिनू

महाराष्ट्रातल्या धडाडीच्या, नावाजलेल्या पत्रकारांपैकीच नाव जे नेहमीच अग्रक्रमांकावर असेल ते म्हणजे दिनू रणदिवे. रणदिवे ह्यांचा जन्म डहाणूतील आदिवासी बहुल भागात झाला, दिनूंच शिक्षण हे माटुंगामधील रामनारायण रुईया महाविद्यालयातून पूर्ण झालं असून त्यांचे वडिल हे सरकारी सेवेत कार्यरत होते. या देशासाठी, समाजासाठी काही तरी चांगलं कार्य करुन दाखवण्याची तळमळ ही दिनू रणदिवेंना लहानपणापासून वाटू लागल्यानं समाजवादी युवक सभेचे ते सक्रीय कार्यकर्ते झाले. या देशाचा कारभार दलित, उपेक्षित, मजूर आणि कामगार वर्गाला मिळाला पाहिजे यासाठी धडे त्यांना इथेच मिळाले. १९५५ साली समाजवादी पक्षाने छेडलेल्या “गोवा मुक्ती संग्राम” मध्ये त्यांचा सक्रीय सहभाग होता. १९५६ साली संयुक्त महाराष्ट्र समितीने “संयुक्त महाराष्ट्र पत्रिका” नावाचे अनियतकालिक सुरु केले होते. दिनू रणदिवेंनी पत्रकार म्हणून आपल्या कारकीर्दीची इथूनच सुरुवात केली. संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात आचार्य अत्रे व कॉम्रेड डांगे सोबत रणदिवेंनी कारावास ही भोगला होता. महाराष्ट्र टाईम्स या वृत्तपत्राच्या पहिल्या दिवसापासून ते रुजू झाले. ते निवृत्त होईपर्यंत त्यांच्या वार्तांकनाला महत्वाचं मानलं जात असे. वाहतूक विभागा पासून ते महापालिकेपर्यंत आणि मंत्रालयापासून ते महाराष्ट्रातल्या खेडेगावापर्यंत दिनू रणदिवेंचे सोर्स सर्वत्र होते. मुंबईतील रेल्वे कर्मचार्‍यांचा संप असोत किंवा गिरणगावातील कामगारांचा त्यांच्या न्याय हक्कांसाठी लढा असोत, दिनू रणदिवेंनी या विषयांवर केलेलं वार्तांकन व लेखन आज ही सर्वांच्या स्मरणात आहे.

ज्येष्ठ साहित्यिक अरुण साधू यांना “सिंहासन” कादंबरीसाठी सुचलेली दिघू टिपणीसांची व्यक्तीरेखा ही रणदिवेंवरुनच सुचल्याचं अनेकजण अगदी ठामपणे सांगतात. दिनू रणदिवे यांच्या व्यक्तीमत्त्वानं प्रेरित होऊन अनेक ज्येष्ठ पत्रकार त्यांच्याविषयी आदरानं बोलतात व त्यांचे विचार व कार्य नवीन पिढीपर्यंत पोहोचवताना दिसतात.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*