पाटील, दिनकर

मराठी चित्रपटांचे दिग्दर्शक, कथालेखक व पटकथाकार अशी ख्याती असलेल्या च यांचा जन्म ६ नोव्हेंबर १९१५ रोजी बेळगाव जिल्ह्याच्या चिक्कोडी तालुक्यातील बेनाडी गावी झाला. त्यांचे शालेय शिक्षण बेनाडीतच झाले. शालेय शिक्षणानंतर १९४० च्या सुमारास त्यांनी कोल्हापुरातल्या वृत्तपत्रांमधून लेखन करण्यास सुरूवात केली. १९४१ साली त्यांनी मास्टर विनायक यांच्या “हंस पिक्चर्स” या

चित्रपटकंपनीत नोकरी करण्यास सुरूवात केली. १९४७ सालापर्यंत ते “हंस पिक्चर्स” मध्ये कामास होते. वामनराव कुलकर्णी आणि विष्णूपंत चव्हाण यांच्या “मंगल पिक्चर्स” च्या “जय मल्हार” चित्रपटाचा संवाद लेखक म्हणून दिनकर पाटील यांचे नाव मराठी चित्रपटसृष्टीत पहिल्यांदा उदयास आले. तब्बल पाच दशके चित्रपट कारकीर्द अनुभवलेल्या दिनकर पाटलांनी शंभरापेक्षाही अधिक चित्रपटांसाठी संवाद लिहिले यामध्ये “जय मल्हार”, “सांगत्ये ऐका”, “बेल-भंडारा”, “शिकलेली बायको”, “बाळ माझं नवसाचं”, “सुधारलेल्या बायका”, “पाटलाची सून”, “फटाकडी”, “कुंकवाचं लेणं”, “गुणवंताची कन्या”, “मोसंबी नारंगी”, असे एकाहून एक दर्जेदार चित्रपटांचा समावेश असून पन्नासाहून अधिक चित्रपटांचे दिग्दर्शन देखील पाटील यांनी केले.यामाध्ये काही उल्लेखनीय चित्रपट म्हणजे “रामराम पावणं”, “शारदा”, “पाटलाचं पोर”, “मूठभर चणे”, “कुलदैवत”, “उमज पडेल तर”, “प्रेम आंधळं असतं”, “मल्हारी मार्तंड”, “कामापुरता मामा”, “धन्य ते संताजी धनाजी”, “काळी बायको”, “कोर्टाची पायरी”, “जोतिबाचा नवस”, “पैजेचा विडा”, “भामटा”, “भटकभवानी”, “शिवरायाची सून ताराराणी”; तर हिंदीत “मंदीर”, आणि “घरबार”च्या दिग्दर्शनाची धुरा दिनकर पाटील यांनी सांभाळली होती.

“पाटलाची सून” या चित्रपटासाठी दिनकर पाटील यांना सर्वोतकृष्ट संवादसाठी राज्य शासनाच्या पुरस्काराने गौरवीत करण्यात आले होते. १९९८ साली महाराष्ट्र शासनाचा व्ही.शांताराम जीवन गौरव पुरस्काराने सुध्दा दिनकर पाटील यांचा सन्मान करण्यात आला होता.

दिनकर पाटील यांनी आपल्या सिने कारकीर्दीचा प्रवास व आयुष्याचे अनुभव “पाटलाचं पोर”या आत्मचरित्रातून शब्दबध्द केले आहे. २३ ऑक्टोबर २००५ या दिवशी दिनकर पाटील यांचे कोल्हापूर येथे निधन झाले.

(लेखन व संशोधन – सागर मालाडकर)

दिनकर पाटील यांचे मराठीसृष्टीवरील लेख

दिनकर द. पाटील (6-Nov-2016)

चित्रपट ‘साहित्यिक दिग्दर्शक’ दिनकर द. पाटील (21-Mar-2017)

चित्रपट ‘साहित्यिक दिग्दर्शक’ दिनकर द. पाटील (6-Nov-2017)

चित्रपट ‘साहित्यिक दिग्दर्शक’ दिनकर द. पाटील (26-Sep-2019)

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*