मंगेशकर, दीनानाथ

Mangeshkar, Dinanath

मंगेशकर, दीनानाथ

जन्म-२९ डिसेंबर, १९०० मृत्यू- २४ एप्रिल, १९४२

दीनानाथ मंगेशकर हे मराठी गायक, अभिनेते, संगीतकार होते.

तेजस्वी, पल्लेदार, धारदार आवाज, सूरनळ्यातून रंगीबेरंभी स्फुल्लिग उडून यावे अशाप्रकारे गळयातून बाहेर पडणार्‍या ताज्या सुंदर, ढंगदार चिजा, ठुमर्‍या, दादरे या गायकीच्या गुणांबरोबरच आवाजातील उंची, रूंदी, जोर या गुणांचे मिश्रण ज्यांच्या आवाजात आढळत असे, ते ज्येष्ठ श्रेष्ठ गायक दीनानाथ गणेश मंगेशकर. दीनानाथांचा जन्म गोमांतकातील मंगेशी या गावी २९ डिसेंबर १९०० रोजी झाला. मंगेशी गावावरून त्यांचे उपनाव मंगेशकर असे पडले असले तरी त्यांचे मूळचे आडनाव अभिषेकी होते. दीनानाथ दिसायला सुंदर, नाकी-डोळे तरतरीत आणि लोभस चेहर्‍याचे होते. त्यांचे शालेय शिक्षण फारसे झाले नाही पण तेथील ब्राह्मणांचे मंत्र पठण ऐकून ते मुखोद्गत केल्यामुळे त्यांच्या वाणीवर, उच्चारांवर आपोआपच सुसंस्कार झाले. त्यात मूळचा आवाज अतिशय गोड आणि धारदार होता. बालपणापासूनच त्यांना गाण्याची आवड होती. त्यांचा गाण्याचा छंद पाहून गणेशपंतांनी दीनानाथांना बाबा माशेलकर या संगीत शिक्षकाकडे रागदारीचे पहिले धडे घेण्यास पाठविले. गावात ह. भ. प. जोगबुवा यांच्या कीर्तनाच्या वेळी हातात झांजा घेऊन दीनानाथ आपल्या गोड आवाजाने बुवांना साथ देत असे. त्यामुळे त्यांचा लौकिक पंचक्रोशीत पसरला. १९१३ साली किर्लोस्कर संगीत मंडळीत फाटाफूट झाली. बालगंधर्व त्यातून बाहेर पडले. त्यामुळे त्यांच्या जागेवर देखणा आणि गाणारा नवीन मुलगा हवा होता. व्यंकटराव पनवेलकर यांनी दीनानाथांना किर्लोस्करमध्ये नेले आणि दरमहा तीस रुपये वेतनावर ते त्यांच्या नाटकातून काम करू लागले. त्यांनी अनेक नाटकातून स्त्री भूमिका केल्या. शाकुंतल मधील शकुंतला, शारदेतील शारदा, सुंदोपसुंद मधील सुविप्रभा, ताजेवफामधील कमलाची भूमिका या त्यांच्या गाजलेल्या स्त्री भूमिका. त्यानंतर त्यांचे अतिशय गाजलेले नाटक म्हणजे ‘पुण्यप्रभाव.’ नंतर ब वंत संगीत मंडळीतर्फे गडकर्‍यांचे ‘भावबंधन’ रंगभूमीवर आले. आणि त्यातील नायिकेची-लतिकेची भूमिका दीनानाथांनी आपल्या गायनाभिनाच्या बळावर अतिशय गाजवली. अंगात ओव्हर कोट घालून डोक्यावर स्कार्फ घेतलेल्या फॅशनेबल लतिकेच्या वेषात ते फार सुंदर दिसत असत. भावबंधनमध्ये ‘कठीण कठीण कठीण किती’ हे त्यांनी म्हटलेले गाणे महाराष्ट्रात घराघरात पोहोचले. त्यानंतर ‘एकच प्याला’, ‘राजसंन्यास’, ‘वेड्यांचा बाजार’, ‘रणदुंदुभी’ मधील ‘परावशता पाश दैवे’, ‘जगीया खास वेड्यांचा’, ‘दिव्य स्वातंत्र्यरवी’ ही त्यांनी म्हटलेली गाणी त्या काळात तर खूपच गाजली. पण आजही मराठी मन या गाण्यांवर फिदा आहे. तसेच धैर्यधीराच्या भूमिकेतील ‘शूरा मी वंदिले’ आणि ‘रवि मी चंद्र कसा’ ही नाट्यपदेही त्यांच्या गळ्यातून अजरामर झाली. दीनानाथांचे महाराष्ट्राला आणखी एक देणे म्हणजे त्यांनी पाच गंधर्व स्वरांची अपत्ये महाराष्ट्राला दिली. लता मंगेशकर, आशा भोसले, मीना खर्डीकर, उषा मंगेशकर आणि पं. हृदयनाथ मंगेशकर. या सगळ्यांनी आपल्या पित्याचा वारसा फक्त पुढे चालवला असे नाही तर तो जगाच्या नकाशावर अजरामर केला. बलवंत संगीत मंडळी पडल्यावर ते पुण्यात येऊन राहिले. रक्तदाबाच्या विकाराने ते २४ एप्रिल १९४२ रोजी दिवंगत झाले. महाराष्ट्राच्या नट श्रेष्ठाला आदरांजली !

दीनानाथ मंगेशकर यांचे मराठीसृष्टीवरील लेख.

मराठी गायक, नाट्यअभिनेते, संगीतकार दीनानाथ मंगेशकर (30-Dec-2016)

मराठी गायक, नाट्यअभिनेते, संगीतकार दीनानाथ मंगेशकर (25-Apr-2017)

मराठी गायक, नाट्यअभिनेते, संगीतकार दीनानाथ मंगेशकर (29-Dec-2017)

मराठी गायक, नाट्यअभिनेते, संगीतकार दीनानाथ मंगेशकर (29-Dec-2018)

## Dinanath Mangeshkar

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*