कर्वे, धोंडो केशव

जन्म-८ एप्रिल, १८५८
मृत्यू- ९ नोव्हेंबर, १९६२

विसाव्या शतकातील एक श्रेष्ठ समाजसुधारक, महिला सबलीकरणासाठी आपलं संपूर्ण आयुष्य वेचणारे धोंडो केशव उर्फ अण्णा साहेब उर्फ महर्षी कर्वे यांचा जन्म ८ एप्रिल १८५८ ला कोकणातील मुरुड या गावी झाला. शालेय शिक्षण मुरुड आणि रत्नागिरी येथे पूर्ण झाल्यावर एलफिनस्टन महाविद्यालयातून गणित विषय निवडून पदवी पर्यंतचं शिक्षण पूर्ण केलं.

अडचणीतून शिक्षण घेत असतानाही त्यांनी आकांक्षा धरली समाजसेवेची. वयाच्या अवघ्या १४ व्या वर्षी त्यांचा विवाह राधाबाईंशी झाला, त्यावेळी राधाबाईंचं वय होतं ८ वर्षं. पण बाळंतपणात म्हणजे १८९१ साली राधाबाईंचा वयाच्या २७ व्या वर्षीमृत्यू झाला त्याच वर्षी अण्णासाहेबांना फर्ग्युसन महाविद्यालयात गणिताचे अध्यापन करण्यास सुरुवात केली होती. म्हणजे १८९१ ते १९१४ या प्रदीर्घ कालखंडात अण्णांनी गणित हा विषय शिकवला.

याच काळात भारतीय समाजात अनेक अघोरी व स्त्री विरोधी कारवाया सुरु होत्या. जसं की मुलींना शिक्षण न मिळणं, पुनर्विवाह, दुय्यम दर्जाची वागणूक या सर्व बाबी अण्णांना खटकत होत्या. म्हणूनच घातक प्रथांविरुद्ध त्यांनी बंड पुकारले होते. विधवा स्त्रियांच्या पुनर्विवाहासाठी जागरण व्हावं यासाठी २१ मे १८९४ या दिवशी अण्णांनी पुनर्विवाहितांचा एक कुटुंबमेळा आयोजित केला. याच सुमारास त्यांनी “विधवा विवाह प्रतिबंध निवारक” मंडळाची स्थापना ही केली. या सर्व बाबी सहज साध्य नव्हत्या कारण यावेळि अनेक कर्मठ प्रवृत्ती आणि सनातन समाजाचा ही रोष, टिका पत्करावी लागली. पण दुर्दम्य इच्छाशक्ती आणि सकारात्मक बदल घडवून आणण्याच्या दृष्टीने अण्णासाहेब आपले विचार आणि क्रिया यावर पूर्णत: ठाम होते.

अनिकेत कन्यांसाठी १८९९ मध्ये अण्णांनी “अनाथ बालिकाश्रम” सुरु केला. तर १८९६ मध्ये अण्णांनी पुण्याजवळच्या हिंगणे (अत्ताचं कर्वे नगर) या गावी विधवा महिलांसाठी आश्रमाची स्थापना केली, तसंच विधवा महिलांसाठी आश्रमाची स्थापना केली, तसंच विधवा विवाहोत्तेजक मंडळ ही स्थापन केलं. अण्णांचं गे उदात्त कार्य पाहून रावबहादूर गणेश गोविंद गोखलेंनी आपली सहा एकर एवढी जागा आणि ७५० रुपये संस्थेच्या उभारणीसाठी अण्णांना दिले. या उजाडमाळरानावर अण्णासाहेबांनी “एक” झोपडी बांधली, ही पहिली वहिली झोपडी स्त्रीशिक्षण संस्थेची गंगोत्री होय. याच ठिकाणी १९०७ रोजी महिला विद्यालयाची स्थापना करण्यात आली. अण्णासाहेबांची २० वर्षांची मेहुणी “पार्वतीबाई आठवले” या विद्यालयाच्या पहिल्या विद्यार्थीनी होय. आश्रम आणि शाळेसाठी लागणारं मनुष्यबळ निर्माण करण्यासाठी “निष्काम कर्म मठा” ची स्थापना करण्यात आली. पण या संस्थेचे कार्य उत्तरोत्तर वाढत गेल्याने त्याचे एकत्रीकरण करुन “हिंगणे शिक्षण संस्था” व त्यानंतर “महर्षी कर्वे शिक्षण संस्था” असं नामकरण करण्यात आले.

बर्‍याचदा संस्था चालवत असताना अनेक आर्थिक प्रश्न उभे रहायचे. यासाठी अण्णांनी कित्येक वर्षं हिंगणे ते फर्ग्युसन महाविद्यालय असा पायी प्रवास केला. अनेकदा आर्थिक स्थैर्यासाठी स्वदेशात तर विदेशात ही वणवण केली. पण अत्यंत जिद्दीनं त्यांनी आपलं कार्य सुरु ठेवलं.

अण्णासाहेब जपानला गेले असताना तेथील महिला विद्यापीठामुळे ते खुप प्रभावित झाले होते. भारतातही महिलांसाठी विद्यापीठ असायलांच हवं हा विचार ही त्यांच्या मनात आला. त्याआधी १९१५ मध्ये भरलेल्या अखिल भारतीय सामाजिक परिषदेच्या अध्यक्ष स्थानी अण्णा होते. त्यांच्या अध्यक्षीय भाषणात त्यांनी “महिला विद्यापीठ” या कल्पनेचा पुनरुच्चार केला. ३ जून १९१६ या दिवशी भारतात पुणे येथे पहिल्या महिला विद्यापीठाची स्थापना झाली पुढे विठ्ठलदास ठाकरसी यांनी १५ लाख रुपयांची देणगी दिल्याने या विद्यापीठाचे नामकरण “श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी” (एस.एन.डी.टी.) करण्यात आले. या विद्यापीठाला भारत सरकार कडून स्वतंत्र विद्यापीठाचा दर्जा ही मिळाला, अण्णांना अभिप्रेत असणारे बोधवाक्य विद्यापीठाने शिरोधैर्य मानले ते असे “संस्कृता स्त्री पराशक्ती”.

या व्यतिरिक्त अण्णांनी ग्रामीण शिक्षणासाठी “महाराष्ट्र ग्राम प्राथमिक शिक्षण मंडळाची” १९३६ साली स्थापना केली. तर जाती भेद आणि अस्पृश्यता निर्मूलनाच्या उद्देशाने “समता संघ” ची १९४४ ला त्यांच्या हस्ते स्थापना झाली.

महिला स्वावलंबी, कर्तृत्ववान बनाव्यात या हेतुनं अण्णांनी सर्व प्रकारचे शिक्षण देणार्‍या संस्था मुंबई, पुणे, वाई, सातारा इत्यादी भागांमध्ये स्थापन केल्या. अनेक योजना त्यांनी पूर्णत्वास नेल्या.

त्यांच्या कार्याची दखल ही भारत सरकारनी ही घेतली. १९५५ साली त्यांना पद्मविभूषण हा किताब प्रदान करण्यात आला, तर १९५८ साली भारताचा सर्वोच्च नागरी सन्मान “भारतरत्न” ने सन्मानित केलं गेलं. याशिवाय अनेक भारतीय विद्यापीठांनी त्यांना डी.लिट
ही पदवी देऊन सन्मानित केलं.

त्यांनी “आत्मवृत्त” (१९२८) साली इंग्रजीत “लुकिंग बॅक” (१९३६) अशा दोन्ही भाषांमध्ये आत्मचरित्र लिहिली.

अशा थोर विचारवंत असलेल्या आणि स्त्री शिक्षणाचा आग्रह धरणारे अण्णासाहेब खर्‍या अर्थाने “महर्षी” ठरतात.

एकशेचार वर्षांचे शतायुषी खर्‍या अर्थाने निसर्गाकडून ही सन्मानित झाले. ९ नोव्हेंबर १९६२ रोजी अण्णासाहेबांच वृद्धापकाळानं निधन झालं.

 

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*