छोटा गंधर्व (सौदागर नागनाथ गोरे)

सौदागर नागनाथ गोरे उर्फ छोटा गंधर्व ह्यांचा जन्म महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातल्या कोरेगावात १० मार्च १९१८ रोजी झाला. सुमधूर आवाजाची जन्मजात देणगीच त्यांना मिळाली होती. वयाच्या अवघ्या दहाव्या वर्षी सौदागर यांनी ’’प्राणप्रतिष्ठा’’ ह्या नाटकाद्वारे मराठी नाट्यसंगीत क्षेत्रात प्रवेश केला. १९२८ ते १९४३ या वर्षात ‘बालमोहन नाटक कंपनी’च्या अनेक नाटकांतून छोटा गंधर्व यांनी अनेक भूमिका साकारल्या. अनंत हरी गद्रे ह्या समाजसुधारकाने सौदागर गोरेंना ‘छोटा गंधर्व’ हा किताब बहाल केला. हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतातदेखील छोटा गंधर्वांनी मोलाचं योगदान दिलं आहे. गुनरंग ह्या नावाने त्यांनी रचलेल्या बंदिशी आणि नंदकिशोर, बसंतीकोश, नंदबसंत, बसंतीशंकरा, गुणिकंस ह्या नवीन रागांची निर्मिती ही त्यांच्या महत्त्वपूर्ण कामगीरिचीची उदाहरणे आहेत.

१९४३ मधे छोटा गंधर्व यांनी काही कलाकारांसह ‘कलाविकास’ ही स्वतःची नाट्यसंस्था काढली. त्या संस्थेचे ‘देवमाणूस’ हे नाटक खूप गाजले. या नाटकातून छोटा गंधर्व हे गीतकार म्हणूनही पुढे आले. कलाविकास व्यावसायिकदृष्ट्या यशस्वी होऊ शकली नाहीत याचं प्रमुख कारण होतं तिच्यावरील कर्जाचा वाढलेला बोजा ; शेवटी ‘कलाविकास’ ही नाट्यसंस्था बंद पडली. ‘संगीत सौभद्र’ तसेच ‘सुवर्णतुला’ यानाटकातला कृष्ण, ‘संगीत मानापमाना’तील ‘धैर्यधर’, ‘मृच्छकटिका’ तील ‘चारुदत्त’, तर ‘संशयकल्लोळ’ मधील अश्विनशेठ ह्यांसारख्या भूमिकांमधून छोटा गंधर्व ह्यांनी मराठी संगीत रंगभूमी गाजवली. लोकप्रिय संगीत नाटकांखेरिज छोटा गंधर्व यांनी उद्याचा संसार, कर्दनकाळ ,घराबाहेर , पराचा कावळा ,फुलपाखरे, भावबंधन, भ्रमाचा भोपळा, माझा देश, लग्नाची बेडी, विद्याहरण शारदा, साष्टांग नमस्कार, स्वर्गावर स्वारी, सौभाग्यलक्ष्मी या नाटकांमधून नायक व स्त्रीपात्र असलेल्या भूमिका अगदी चपखलपणे रंगववल्या.
गायक म्हणून छोटा गंधर्व यांनी आपल्या नाट्यपदां मधुन विविधभावपूर्णता दाखवून दिली; त्यांचा लोकप्रिय नाट्यपदांपैकी ” आनंदे नटती”, “कोण तुजसंग सांग गुरुराया” “चंद्रिका ही जणू” , “चांद माझा हा हासरा”, “छळि जीवा दैवगती”, “तू माझी माउली”, “दिलरुबा दिलाचा हा”, “दे हाता शरणागता”, “नच सुंदरी करु कोपा”, “प्रिये पहा रात्रीचा समय सरुनि”, “बघुनी वाटे त्या नील पयोदाते”, “बहुत दिन नच भेटलो”, “माता दिसली समरी विहरत”, “या नव नवल नयनोत्सवा”, “रजनिनाथ हा नभी उगवला” या नाटकांचा समावेश आहे.
१९७८ मध्ये गायकीच्या शिखरावर असताना, छोटा गंधर्व यांनी नाट्यसंन्यास स्वीकारला. १९७९ मध्ये अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाच्या अध्यक्षपदाचे भाषण केल्यावर झालेल्या एका प्रयोगासाठी सादरीकरण केले. त्यानंतर १९८०-८१ मधे काही प्रयोग प्रेषकांच्या आग्रहाखातर केले.
उतारवयात संगीतावरील जुन्या ग्रंथांचं वाचन, ज्योतिष व अध्यात्माचा अभ्यास, तसंच क्रिकेट सारख्या छंदांचा आनंद घेतला.
एकेदिवशी अचानक प्रकृती खालावल्यामुळे पुण्यातील केईएम रुग्णालयात दाखल करण्यात आले, तिथेच ३१ डिसेंबर १९९७ रोजी छोट्या गंधर्व यांची प्राणज्योत मालवली.
छोटा गंधर्व यांचे मराठीसृष्टीवरील लेख.
(लेखन व संशोधन – सागर मालाडकर)

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*