चिंतामणी त्र्यंबक खानोलकर (आरती प्रभू)

लेखक, कथाकार, कादंबरीकार, नाटककार आणि कवी

एक अग्रगण्य लेखक, कथाकार, कादंबरीकार, नाटककार आणि कवी म्हणून साहित्याच्या प्रांतातली प्रसिद्ध व्यक्तीमत्व म्हणजे चिंतामणी त्र्यंबक खानोलकर तथा आरती प्रभू.आपल्या बहारदार शब्दसंवेदनेतून मराठी मनाला भुरळ घालणार्‍या आरती प्रभूंचा जन्म वेंगुर्ले तालुक्यातील बागलांची राई या गावी ८ मार्च १९३० साली झाला.

अर्थार्जनासाठी खानोलकर यांच्या वडिलांना कुडाळ, वेंगुर्ले, सावंतवाडी स्थलांतर करावं लागलं. सावंतवाडीत प्लेगच्या साथीमुळे त्यांना ताबडतोब तेथून ही स्थलांतर करावं लागलं, आणि पुढील शिक्षणासाठी ते मुंबईला आले, पण त्यांच्या शिक्षणात सतत काहीना काही कारणांनी खंड पडत राहिला, पण १९६० मध्ये ते एस.एस.सी ची परीक्षा उत्तीर्ण झाले. पण त्याआधीच खानोलकरांनी लेखनाला सुरुवात केली होती.

“ब्लार्क” मध्ये त्यांची कथा व कविता प्रसिद्ध झाली होती, त्यानंतर सत्यकथेच्या अंकात जाणीव ही कथा प्रसिद्ध झाली; पण सत्यकथांमध्ये “शुन्य श्रुंगारते” या कवितेला प्रसिद्धी मिळाली आणि पुढे तर त्यांच्या अनेक कविता लोकप्रिय झाल्या. या सर्व कविता खानोलकरांनी “आरती प्रभू” या टोपण नावाने लिहिल्या. १९५८ सालच्या मराठी साहित्य संमेलनात, त्यांना कविता वाचनाची संधी मिळाली.

उदरनिर्वाहासाठी खानोलकरांनी पुन्हा मुंबई गाठली; तिथे आकाशवाणी केंद्रात स्टाफ आर्टिस्ट म्हणून रुजू झाले. त्याच काळात “जागोवा” हा त्यांचा पहिला कविता संग्रह प्रकाशित झाला. त्यांची “पाठमोरी” ही कथा सत्यकथेत तर “झाडे नग्न झाली” ही त्यांची कादंबरी रहस्यरंजनच्या दिवाळी अंकात छापून आली. त्यामुळे खानोलकरांच्या लेखनाला अधिक गती मिळाली. खानोलकरांनी सर्व प्रकारच्या वाड्मयात मुशाफीरी केली यामध्ये अनुवाद, स्फुटलेखन, बालवाड्मय, एकांकिकांचा समावेश होतो.

“एक शुन्य बाजीराव”, “सगेसोयरे”, “अवध्य”, “अजब न्याय वर्तुळाचा”, “कालाय तस्मै नम:” सारख्या दर्जेदार, रहस्यमय नाटकांनी रंगभूमी तर गाजवली, पण खानोलकरांच नाव सर्वतोमुखी झाले.

खानोलकरांनी लिहिलेल्या कादंबर्‍या ही अतिशय गाजल्या, यामध्ये “गणराय आणि चानी-१९६०”, “कोंडुरा – १९६६”, “अजगर-१९६५”, “रात्र काळी घागर काळी १९६२”, “पिशाच्च – १९७०”, “पाषाण पालवी-१९७६”, “त्रिशंकू-१९६८”, तर “सनई-१९६४”, “राखी पाखरु-१९७१”, “चाफा आणि देवाची आई-१९७५” सारख्या कथा संग्रहाचा समावेश होतो.

“चानी” आणि “कोंडुरा” या त्यांच्या दोन कादंबर्‍यांवर चित्रपट ही प्रदर्शित झाले. “दिवेलागणं” आणि “नक्षत्रांचे देणे” हे कविता संग्रह रसिकांना खुप भावले. “आरती प्रभू” या टोपण नावानं त्यांनी लिहिलेली अनेक गीतं आजही मनात घर करुन आहेत, याचं कारण म्हणजे खानोलकरांच्या लेखनात तरलता, वेधकता असल्यामुळे रसिक मनांची पकड घेणं त्यांनी साधले होते; त्यांच्या “नक्षत्रांचे देणे” या कविता संग्रहाला १९७८ सालचा साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला होता.

एक वेगळ्या तसंच विलक्षण विचारांनी नावाजलेले त्र्यं.चि.खानोलकर उर्फ आरती प्रभू यांच २६ एप्रिल १९७६ रोजी निधन झालं.

चिंतामणी त्र्यंबक खानोलकर (आरती प्रभू) यांचे मराठीसृष्टीवरील लेख.

आरती प्रभू (8-Mar-2017)

चिंतामणी त्र्यंबक खानोलकर ऊर्फ आरती प्रभू (26-Apr-2017)

1 Comment on चिंतामणी त्र्यंबक खानोलकर (आरती प्रभू)

Leave a Reply

Your email address will not be published.


*