देशपांडे, चिंतामणी गणेश

Deshpande, Chintamani Ganesh

जन्म महाड येथे, मूळ गाव – महाड, जि. रायगड, शालेय शिक्षण – महाड येथेच झाले. ऐन तरुणपणी देवलांच्या रॉयल सर्कसमध्ये तारेवरती रिंग सायकल चालविणे व वाघ सिंहाचे रिंग मास्टर म्हणूनही अल्पकाळ कामगिरी केली.

नंतर सर्कस सोडून घरी परत आले. त्यानंतर काही दिवस मुंबई येथे एका डॉक मध्ये जर्मन कंपनीमध्ये नोकरी केली. परंतु मुंबई येथे असतानाच परममित्र कै. सुरेन्द्रनाथ गोपाळ टिपणीस उर्फ सुरबानाना व कै. अनंतराव चित्रे यांचे बरोबरच नोकरीवर लाथ मारली व सामाजिक चळवळ व स्वातंत्र्य संग्राम यात स्वत:ला झोकून दिले.

महाड येथे झालेले प्रसिद्ध चवदार तळे सत्याग्रहात आघाडीवर होते. डॉ.आंबेडकरांचे महाड येथील विश्वासू सहकारी कै.सुरबानाना यांच्या प्रमाणेच डॉ.आंबेडकरांना जवळचे असणारे असे कै.देशपांडे होते.

ते स्वातंत्र्याच्या चळवळीत हिरीरीने भाग घेत असत. भूमिगत होऊन नगर जिल्ह्याचे जंगलात वास्तव्य. सन १९२८-२९ मध्ये स्वातंत्र्यासाठी लढाईत अटक व शिक्षा, क्रांतीकारी सत्याग्रही म्हणून ब्रिटीश सरकार सतत जेल बदली. त्यामध्ये ठाणे जेल, मद्रास जेल, त्रिचनापल्ली जेल, विसापूर जेल, त्रिवेंद्रम जेल असे अनेक ठिकाणी हलविण्यात आले. जेल मध्ये असताना सहकारी कैदी म्हणून भारताचे माजी पंतप्रधान कै.मोरारजी देसाईंबरोबर एकाच सेल मध्ये होते. त्याचप्रमाणे कै.आचार्य भागवत, कै. धनाजी चौधरी व के. साने गुरुजी यांचाही सहवास जेलमध्ये मिळाला.

त्यावेळच्या कुलाबा जिल्हा लोकल बोर्डाचे सभासद व दक्षिण विभागाचे चेअरमन, महाड अर्बन बॅंकेचे संचालक व महाड नगरपालिकेचे सभासद या पदांवरही कार्य केले आहे.

संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत सत्याग्रही म्हणून भाग घेतला. दिल्ली येथे संसदभवनाचे समोर झालेले सत्याग्रहांत भाग घेतला होता व ज्या ६/७ सत्याग्रहींनी संसदभवनांत प्रवेश घेऊन सत्याग्रह केला होता, त्यामधील एक ते होते. दिल्ली पोलिसांकडून अटक व १५ दिवसांची कैद ही शिक्षा झाली.

कै. श्री. चिंतामणी गणेश देशपांडे यांना भारत सरकार कडून स्वातंत्र्य सैनिक म्हणून ताम्रपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच केंद्र शासन व महाराष्ट्र शासनाकडून निवृत्ती वेतनही मिळत होते.

आयुष्याच्या अखेरीस शेवटचे १५/१६ वर्षे त्यांचे उरण येथे नंबर दोनच्या मुलाकडे वास्तव्य होते. दिनांक ३० सप्टेंबर १९८५ रोजी वयाचे ९० व्या वर्षी देहावसान झाले.

 

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*