कांबळे, चेतन

चेतन जनार्दन कांबळे यांची आजवरची वाटचाल म्हणजे माहितीचा अधिकार, न्यायालयीन लढाई आणि रस्त्यावरचा संघर्ष अशा तिन्ही मार्गांनी झगडत राहणे. औरंगाबादच्या भावसिंगपुरा या खेड्यातील या तरुणाचा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या समता, बंधुता आणि सामाजिक न्यायाच्या त्रिसूत्रीवर ठाम विश्वास आहे. संघर्षाची सुरुवात औरंगाबादच्या सरकारी कला महाविद्यालयातून झाली. डीन आणि प्राध्यापकांच्या मनमानी आणि चुकीच्या धोरणांविरुद्ध त्यांनी रान उठवले. हुमेरा परवीन तडवी या मुस्लिम समाजातील तरुणीला जीवनसाथी म्हणून निश्चित केल्यानंतर सर्वत्र विरोधाचा सूर उमटला. प्रचंड सामाजिक दबावाखाली या नवदांपत्याचा संसार सुरू झाला. मात्र दोन्ही समाजांतील कटुता कमी करण्यात त्या दोघांनाही यश आले. आपल्या वसाहतीत दारूच्या व्यसनापायी उद्ध्वस्त झालेली कुटुंबे पाहून चेतननी दारूगुत्त्यांविरोधी मोहीम सुरू केली. जी झोपडपट्टी सरकार अनधिकृत ठरवते तिथे दारूची अधिकृत दुकाने कशी सुरू होतात, असा सवाल करत त्यांनी अधिकारी आणि दारूविक्रेत्यांचे साटेलोटे बाहेर काढले. गुत्त्यांच्या विरोधात महिला, तरुण कार्यर्कत्यांची फौज तयार केली.

धान्यापासून दारूनिमिर्तीलाही त्यांनी कसून विरोध केला आहे. सत्ताधारी व विरोधी पक्ष यांनी स्वत:च्या वर्तुळातच धान्यापासून दारूनिमिर्ती प्रकल्प व त्याचे सुमारे दीड हजार कोटींचे अनुदान वाटप करून घेतल्याचा पुरावाच त्यांनी प्रसारमाध्यमे आणि न्यायालयात सादर केला. दारू ही चैन असून धान्य ही भुकेल्या माणसांची जगण्याची गरज आहे हे त्यांनी ठासून मांडले. चेतन कांबळेंनी बाहेर काढलेला मोठा घोटाळा म्हणजे पेट्रोलपंप घोटाळा. चेतनच्या वडिलांनी पेट्रोलपंपासाठी अनेकदा अर्ज केले. चेतन यांनी पत्नीच्या नावेही अर्ज केला. मात्र अशा लाभदायक योजना केवळ मंत्री, त् ांचे नातलग, राजकारणी लोक, धनिक अशांनाच मिळतात, हे त्यांनी पुराव्यानिशी शोधून काढले. सर्व पातळ्यांवर दाद मागितली, आंदोलन-उपोषणे केली आणि अखेर जनहित याचिकेचे हत्यार उपसले. या खटल्यात प्रख्यात कायदेतज्ज्ञ कपिल सिब्बल यांनी कायदेशीर मदत केली. या खटल्याच्या सुनावणीतून ज्या बाबी बाहेर आल्या त्यामुळे लोकसभा आणि राज्यसभेत मोठा गोंधळ झाला. संसदेचे कामकाज दोन वेळा बंद ठेवावे लागले. निर्भयपणे, सच्चेपणाने आवाज उठवला तर सामान्य माणूसही महत्त्वाची कामगिरी करू शकतो हेच या प्रकरणाने दाखवून दिले. ही आंदोलने उभारताना चेतन कांबळेंवर प्राणघातक हल्लेही झाले, खोट्या केसेस टाकून हैराण केले गेले. मात्र प्रसारमाध्यमांनीही त्यांना साथ दिली. सामान्य लोकही पाठीशी राहिले. स्वातंत्र्य मिळाले, पण शेवटच्या माणसापर्यंत ते पोहोचलेच नाही, ते तसे पोहोचावे यासाठी मी कायम प्रयत्नशील राहीन असे मानणाऱ्या या कार्यर्कत्याला सामाजिक न्यायासाठी प्रदीर्घ न्यायालयीन लढाई लढलेले दिवंगत समाजवादी कार्यकतेर् बाबुराव तथा प. बा. सामंत यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ देण्यात येणारा पहिलाच पुरस्कार मिळाला हे उचित झाले

 

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*