देशपांडे, बाजी प्रभू

Deshpande, Baji Prabhu

छत्रपती शिवाजी महाराजांचे एक अत्यंत विश्वासू सरदार. महाराजांसाठी जीवाची बाजी लावणारे बाजी प्रभू देशपांडे पावनखिंडीत शत्रूचा मुकाबला करताना धारातिर्थी पडले. पावनखिंडीतील लढाईत त्यांनी अतुलनीय पराक्रम गाजवला व शिवाजीराजे विशाळगडापर्यंत पोचेपर्यंत पावनखिंड रोखून धरली.

सिद्धी जौहरने पन्हाळ्याला घातलेल्या वेढ्यातून सुटण्यासाठी महाराजांना घेऊन बाजी विशाळगडाकडे निघाले होते. त्या वेळी, आपली फसवणूक झाली हे लक्षात येऊन विजापूरी सैन्य त्यांचा पाठलाग करीत होते. पुढचा धोका लक्षात घेऊनच वडीलकीच्या अधिकाराने बाजींनी महाराजांना विशाळगडाकडे पुढे जाण्यास सांगितले. बाजी व फुलाजी हे दोघे बंधू गजापूरच्या खिंडीत (घोडखिंडीत) सिद्धीच्या सैन्यासाठी महाकाळ म्हणून उभे राहिले. हजारोंच्या सैन्याला ३०० मराठी मावळ्यांनी रोखले होते. सतत २१ तास चालून शरीर थकलेल्या स्थितीत असतानाही बाजी आणि त्यांच्या मावळ्यांनी मोठ्या हिंमतीने ६ ते ७ तास खिंड लढविली. सिद्धी मसूदचे सैन्य अडविताना कामी आलेले मराठी मावळे, धारातीर्थी पडलेले बंधू फुलाजी, जखमी झालेले स्वत:चे शरीर या कशाचेही भान बाजींना नव्हते. महाराज विशाळगडावर सुखरूप पोहोचले याचा इशारा देणार्‍या तोफांच्या आवाजाकडे त्यांचे कान होते. तोफांचा आवाज ऐकेपर्यंत ते दोन्ही हातात तलवार घेऊन प्राणांची बाजी लावून लढत होते. तोफांचे आवाज ऐकल्यावर कर्तव्यपूर्तीच्या समाधानाने त्यांनी प्राण सोडले. ही घटना १३ जुलै, इ.स. १६६० रोजी घडल्याची इतिहासात नोंद आहे. घोडखिंडीतला हा लढा मराठ्यांच्या इतिहासात पराक्रमाची शर्थ मानला जातो.

मराठ्यांच्या अभूतपूर्व अशा पराक्रमाने आणि बाजींसारख्या स्वराज्यनिष्ठांच्या पवित्र रक्ताने घोडखिंड पावन झाली, म्हणूनच तिला पावनखिंड संबोधले जाऊ लागले. बाजी – फुलाजी बंधूंवर विशाळगडावर, महाराजांच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार करण्यात आले. बाजी प्रभू व फुलाजी यांची समाधी विशाळगडावर आहे. तसेच पन्हाळगडावर बाजी प्रभूंचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात आलेला आहे.

पावनखिंडीचा लढा आणि बाजी प्रभू देशपांड्यांची स्वामिनिष्ठेची कथा मराठीमाणसांच्या जनमानसावर शेकडो वर्षे अधिराज्य गाजवत आहेत. या कथेवर विपुल लिहिले गेले आहे. बाबूराव पेंटर यांनी ‘बाजी प्रभू देशपांडे’ या चित्रपटाच्या (१९२९) माध्यमातून बाजीप्रभूंच्या पराक्रमाच्या स्मृती जतन करून ठेवल्या आहेत.
चांद्रसेनीय कायस्थ प्रभू समाजाचे हे एक भूषण मानले जातात.

 

## Bajiprabhu Deshpande

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*