अशोक रामचंद्र शिंदे

Ashok Ramchandra Shinde

श्री. अशोक रामचंद्र शिंदे हे गेली २५ वर्षे पत्रकारितेत असून त्यांनी `सांज लोकसत्ता’, `नवशक्ती’, `सकाळ’, `अर्थनीती’, `युगधर्म’ अशा दैनिकांमधून पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवेगळे विषय हाताळले असून त्याची दखल शासकीय स्तरावरून वेळोवेळी घेण्यात आली आहे. ते भारतीय पत्रकार संघ, मंत्रालय व विधिमंडळ वार्ताहर संघ, मुंबई मराठी पत्रकार संघ आदी संस्थांशी संलग्न आहेत तसेच महाराष्ट्र शासनाचे अधिस्वीकृतीधारक पत्रकारदेखील आहेत. नागपूर येथून प्रकाशित होत असलेल्या ६७ वर्षे जुन्या `दै. युगधर्म’ या दैनिकाचे ते मुंबईचे ब्यूरो चीफ म्हणून कार्यरत आहेत. त्याचबरोबर याच वृत्तपत्र समूहातील `दै. देश’, `दै. उद्याची खबर आज’, `दै. विदर्भ पुकार’ या दैनिकांसाठीही ते मुंबईचे विशेष प्रतिनिधी म्हणून काम करत आहेत.

पूर्णवेळ पत्रकारिता करत त्यांनी राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, क्रीडा, व्यापार-उद्योग अशा विविध क्षेत्रातील वार्तांकनं तसेच लेखन केले आहे. व्यसनमुक्ती तसेच अवैध दारूचे धंदे, व्यसनापायी होणारी सामाजिक हानी, राजकारणात सत्शीलपणा येण्यासाठी आग्रही राहिलेले त्यांचे लेखन, विविध सामाजिक बाबी आदी विषयांवर त्यांनी गेल्या २३ वर्षांमध्ये नियमितपणे व सातत्याने लिखाण केले आहे. त्याच्या उपयोग महाराष्ट्राच्या विकासात हातभार लागण्यासाठी झालेला आहे. प्रत्येक बातमीमागे त्याची वस्तुनिष्ठता तसेच त्याचा सापेक्षपणा ठळकपणे अधोरेखित होतो.

अनेक चरित्रपर व मार्गदर्शनपर पुस्तकांचे लेखन त्यांनी केले आहे. पत्रकारितेतील उल्लेखनीय कामगिरीबद्दल त्यांना नॅशनल एज्युकेशन सोसायटीच्या वतीने कांची कामकोठी पीठाचे जगदगुरु शंकराचार्य यांच्या हस्ते पुरस्कारदेखील मिळाला आहे. त्याचबरोबर अन्य संस्थांनीही त्यांच्या पत्रकारितेतील कार्याचा गौरव केला आहे. व्यसनमुक्ती उपक्रमांबरोबरच अन्य कामिगरींमध्ये त्यांचा लौकिक राहिला आहे. महाराष्ट्रातील जलसिंचन प्रकल्प, पंचतारांकित औद्योगिक वसाहती, कृषी प्रकल्प अशा अनेक विषयांवर त्यांनी अभ्यास करून पत्रकारितेच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रातील विविध प्रकल्पांची पाहणी करून त्याबाबत संबंधित विभागांकडे पाठपुरावा करून त्यांची सोडवणूकदेखील केलेली आहे. त्याची अनेक उदाहरणे आहे. आपल्या लिखाणातून राज्यातील असंख्य वाचकांवर शासनाच्या वतीने राबवण्यात येणा-या उपक्रमांचे तसेच योजनांचे विवेचन विश्लेषणात्मक रुपाने दिले आहे. त्यामुळे राज्यातील नागरिकांमध्ये या योजनांचे स्वरुप समजून त्याचा उपयोग कल्याणकारी कार्यासाठी करून घेण्यास हातभार लागला आहे. गेली पाच वर्षे सलगपणे ते विधिमंडळाच्या अधिवेशनांचे वार्तांकन करत असल्यामुळे शासकीय कामकाजांना त्यांनी वृत्तपत्राच्या माध्मयातून प्रसिद्धी देऊन जनमानसांपर्यंत शासनाचे विविध कार्य पोहचवले आहे.

व्यसनमुक्तीच्या उपक्रमांना आपल्या लिखाणातून प्राधान्य देत महाराष्ट्राच्या विविध विकास कामं, योजना यांच्याशी संबंधित माहिती, त्याच्यावरील विश्लेष्ण तसेच त्याच्या प्रचारासाठी सातत्याने त्यांच्याकडून होत असलेल्या लिखाणातून राज्याच्या विकासकार्यात त्यांचेदेखील भरीव योगदान काही प्रमाणात लाभत आहे.

भारतीय पत्रकार संघाचे सरचिटणीस म्हणून त्यांनी पत्रकारांचे साहित्य संमेलन दादर येथील मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाच्या सहकार्याने आयोजित केले. त्यालादेखील राज्यभरातील पत्रकारांनी उत्तम प्रतिसाद दिला होता.
त्यांनी आतापर्यंत अनेक पुस्तके व लेख लिहले आहेत. पुस्तकांमध्ये अधिकांश आत्मचरित्रपर लिखाण असून त्यात राजकीय नेते शरद पवार, विक्रमराव सावरकर, पी. एस. लाड, उद्योजक भाई सावंत, शिक्षणकर्मी अनंत वामन वर्तक, पुष्पकांत अनंत म्हात्रे आदींचा समावेश आहे. त्याचबरोबर `लघुउद्योजकांच्या दुनियेत’ हे त्यांचे पुस्तक तत्कालिक उद्योगमंत्री लिलाधर डाके यांच्या हस्ते प्रकाशित झाले. त्याला प्रचंड लोकप्रियता मिळाली. त्याशिवाय अनेक प्रासंगिक लेखन ते वृत्तपत्रांमधून करत असतात. त्यांचे अनेक लेख महाराष्ट्रातील नामांकित वृत्तपत्रांमध्ये प्रसिद्ध झाले आहेत.

केंद्रीय श्रमिक शिक्षण मंडळ, कुर्ला व श्रमिक पत्रकार संघटना असलेल्या भारतीय पत्रकार संघ यांच्या संयुक्त विद्यमाने ६ जानेवारी २०१७ या दिवशी पत्रकारितेतील उल्लेखनीय व समर्पित कार्याबद्दल व श्रमिक पत्रकार म्हणून २५ वर्षे कार्य केल्याबद्दल विशेष पुरस्कार देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले आहे.

महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळाने त्यांची परिक्षक म्हणून नियुक्ती केली होती. ती जबाबदारी त्यांनी यशस्वीरित्या पार पाडली.

मुंबईतील लघुवाद न्यायालयाच्या वतीने राष्ट्रीय लोकअदालत अंतर्गत त्यांना न्यायालयीन खटल्याच्या न्यायप्रक्रियेत पत्रकार व समाजसेवक म्हणून सहभागी करून घेतले जाते.

कोकण मराठी साहित्य परिषदेचे ते अजीवन सदस्य असून त्यांनी कोमसापच्या रौप्यमहोत्सवी वर्षाच्या साहित्य संमेलनात मोलाची भूमिका बजावली. या संमेलनाचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले होते. दादर येथील राजा शिवाजी विद्यालयात झालेल्या या भव्य संमेलनाच्या आयोजनापासून ते संपूर्ण संमेलन पूर्ण होईपर्यंत प्रसिद्धी समिती प्रमुखपदाची जबाबदारी यशस्वीरित्या सांभाळली. त्याबद्दल त्यांचा विशेष सन्मान करण्यात आला.

ऋजुता फाऊंडेशनचे ते विश्वस्त असून त्यांनी महिला साहित्यिकांचे राज्यव्यापी संमेलन दादर – माटुंगा सांस्कृतिक केंद्रात आयोजित केले. त्याच्या अध्यक्षस्थानी डॉ. विजया वाड होत्या तसेच गिरीजा किर यांना जीवनगौरव पुरस्कार दिला गेला. भाषा संचालनालयाच्या संचालिका डॉ. मंजुषा कुलकर्णी यांच्यासह देश-विदेशातील अनेक सुप्रसिद्ध महिला साहित्यिका यात सहभागी झाल्या होत्या. या संमेलनाचे नेटनेटके आयोजन अशोक शिंदे यांनी केले व संमेलन यशस्वी केले.

स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक, मुंबई यांच्या वतीने स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या निवडक ग्रंथ संपदांचा 12 भारतीय भाषांमध्ये अनुवाद तसेच ब्रेल लिपीत त्याचे रुपांतरण करण्याचा प्रकल्प त्यांनी एकट्यानी यशस्वीपणे राबविला आहे. त्यामुळे स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे साहित्य मराठी, हिंदी, इंग्रजीसह गुजराती, बंगाली, तमिळ, तेलुगू, कन्नड, मल्याळ्म, आसामी, पंजाबी, उडिया या भाषांमध्ये उपलब्ध झाले आहे.

माजी लोकसभा अध्यक्ष मनोहर जोशी यांनी लिहलेल्या `शिवसेना – काल, आज आणि उद्या’ या अभ्यासपूर्ण ग्रंथाच्या निर्मितीसाठी संपादकीय स्तरावर सहकार्य केले असून तसा उल्लेख प्रकाशकांनी प्रस्ताविकेत केला आहे.

राजहंस प्रकाशनच्या वतीने गाजत असलेल्या आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्लेषक संदीप वासलेकर लिखित `एका दिशेचा शोध’ या पुस्तकाच्या संपादकीय प्रक्रिया त्यांचा सहभाग असून तसा उल्लेख लेखकाने आपल्या मनोगतात केला आहे.

अनेक स्वयंसेवी संस्थांशी ते संबंधित आहेत. रामचंद्र प्रतिष्ठान या विश्वस्त संस्थेच्या तसेच अर्थनीती मासिकाच्या वतीने त्यांनी लेख, निबंध स्पर्धा अशा साहित्यिक उपक्रमांचे आयोजन केले आहे.

श्रमजीवी वर्गात त्यांचे व्यावसायिक कार्य येत असून त्यातून त्यांनी महाराष्ट्राच्या समाजाच्या विकासात अप्रत्यक्षपणे भरीव योगदान दिले आहे.

1 Comment on अशोक रामचंद्र शिंदे

  1. मी अशोक शिंदे यांना ओळखतो.खूप छान व्यक्ती आहे. सुस्वभावी, सकारात्मक, कुठल्याही गोष्टीत सहकार्याची भूमिका, अभ्यासपूर्ण व्यक्तीमत्व. सदैव कार्यमग्न हा त्यांचा स्थायीभाव. त्यांच्या सान्निध्यात येणा-या प्रत्येकाला ते आपलेसे वाटतात, असे त्यांच्याशी संबंधित लोकांशी बोलल्यानंतर जाणवते.

Leave a Reply

Your email address will not be published.


*