समेळ, अशोक मनोहर

लहानपणापासून कलेची आवड असणार्‍या अशोक समेळ यांनी घरच्या गरीबीवर जिद्दीने मात करुन अपार मेहनतीने आतापर्यंतचा पल्ला गाठला आहे. विविध क्षेत्रात काम करणार्‍या समेळांची कामगिरीही तितकीच विविधांगी आहे. लेखक म्हणून त्यांनी १८ मराठी व्यावसायिक नाटकं, २३ गुजराथी नाटकं, ९ प्रायोगिक नाटकं, तसेच दूरदर्शन वरील मालिकांचे २००० पेक्षा जास्त भागांचे लेखनही त्यांनी केलेले आहे. त्यांनी “मी मालक या देशाचा”, “इथे ओशाळला मृत्यु”, “तो मी नव्हेच”, इत्यादी जवळपास १७ नाटकांमध्ये तसेच १६ दूरदर्शन मालिकांमध्येही अभिनय केलेला आहे. अशोक समेळ यांनी दिग्दर्शक म्हणूनही आपला वेगळा ठसा उमटवला आहे. नाटकं, आकाशवाणीवर कार्यक्रम, दूरदर्शन मालिका अशा विविध ठिकाणी त्यांनी दिग्दर्शक म्हणून काम केले आहे. दिग्दर्शक म्हणून “नटसम्राट”, “राजा रवी वर्मा”, “जन्मदाता” अशी नाटकं त्यांच्या खात्यात जमा आहेत.

एवढं सगळं करताना त्यांचे ठाण्याच्या कलाक्षेत्रातील योगदानही महत्वपूर्ण आहे. त्यांनी ठाण्यात, महानगरपालिकेच्या सहाय्याने व महापौरांच्या मदतीने टेंभीनाका येथे प्रायोगिक चळवळ सुरु केली. ज्याद्वारेते विनामूल्य गोरगरीब व सर्वसाधारण थरातल्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतात. या चळवळीचे आणखी एक महत्वपूर्ण काम म्हणजे, या प्रायोगिक चळवळीतून त्यांनी सर्व ठाणेकरांना घेऊन “संन्यस्त ज्वालामुखी” हे ४० तासात सलग ११ प्रयोग करणारं विक्रमी नाटक सादर केलं. हा विक्रम “लिमका बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड” मध्ये विराजमान झाला. ही गोष्ट ठाण्यालाच नव्हे तर संपूर्ण भारताला आभिमानास्पद आहे.

पुरस्कार : विविधांगी कामगिरीबद्दल त्यांना आतापर्यंत एकूण ३४ पुरस्कार मिळाले आहेत. ज्यात “मामा वरेरकर पुरस्कार (१९८४)”, “नाट्यदर्पण पुरस्कार (१९८४/१९९६)”, अ.भा.म.ना.प. चा “आचार्य अत्रे पुरस्कार”, “राम गणेश गडकरी पुरस्कार”, “ठाणे गौरव”, “ठाणे नगर रत्न पुरस्कार” इत्यादी अनेक पुरस्कारांचा समावेश होतो.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*