अर्जुन उमाजी डांगळे

मराठी साहित्याची कोंडी फोडण्याचे महत्त्वाचे काम ज्या साठोत्तरी पिढीने केली तिचे अर्जुन डांगळे हे एक शिलेदार होते. या पिढीच्या लिटल मॅगझिन चळवळीत जसे ते होते तसेच त्याच्या पुढच्या दशकात उगवलेल्या दलित साहित्यचळवळीच्या पहिल्या फळीतही ते होते. त्यांच्या ‘छावणी हलते आहे’ या क्रांतीचे तत्त्वज्ञान मांडणार्‍या कवितासंग्रहाने साहित्य वर्तुळात हलचल माजवली होती.

हे तत्त्वज्ञान केवळ तिखटजाळ शब्दांत मांडून त्याचेच भांडवल करणारे ते कवी नव्हते तर प्रत्यक्ष मैदानात उतरून त्यासाठी झुंजणारे हाडाचे कार्यकर्तेपणही त्यांच्यात होते. म्हणूनच ‘दलित पॅन्थर’च्या स्थापनेतही ते अग्रभागी राहिले. हे कार्यकर्तेपणाचे बाळकडू त्यांना घरातच मिळाले. माटुंग्याच्या लेबरकॅम्पमध्ये त्यांचे बालपण गेले. हा परिसर म्हणजे दलित रिपब्लिकन कार्यकर्त्यांच्या चळवळीचा अड्डाच होता.

अर्जुन डांगळे यांचे वडील उमाजी डांगळे हे रिपब्लिकन चळवळीत सक्रिय होते. त्यामुळे अण्णाभाऊ साठे, दादासाहेब गायकवाड, आचार्य अत्रे, बाबुराव बागुल असे नेते आणि साहित्यिक यांची त्यांच्या घरातच उठबस असे. त्यांचे विचार डांगळे यांच्या नेणिवेत झिरपले. हेच वैचारिक बळ घेऊन ते दलित पॅन्थरचा लढा आणि दलित साहित्य चळवळ यात अग्रभागी राहिले.

अखिल दलित साहित्याचे संपादन करण्याचे मोठे काम त्यांनी केले. त्यांनी संपादित केलेल्या ‘पॉयझन्ड ब्रेड’ या भारतीय दलित साहित्याच्या ग्रंथाची कीर्ती तर नेल्सन मंडेला यांच्यापर्यंत पोचली आणि ९८ साली डांगळे जेव्हा दक्षिण आफ्रिकेच्या दौर्‍यावर गेले तेव्हा मंडेला यांनी आपल्या आत्मचरित्राची प्रत स्वाक्षरी करून डांगळेंना भेट दिली.

डांगळे यांना राजकीय भान उत्तम होते. त्यामुळे राज्यपातळीवर तिसर्‍या आघाडीचा समर्थ पर्याय उभा करण्यासाठी भारिप-बहुजन महासंघाच्या स्थापनेत त्यांनी प्रकाश आंबेडकर, मखराम पवार यांच्या बरोबरीने वाटा उचलला. आता त्यांनी प्रकाश आंबेडकरांची संगत सोडून रामदास आठवले यांच्या पक्षाचे प्रवक्तेपद स्वीकारले आहे.

पण त्यांचे समाजवादी, आंबेडकरी आणि कम्युनिस्ट या तिन्ही विचारधारांशी आणि कार्यर्कत्यांशी त्यांचे उत्तम जुळते. त्यांच्या समंजस समन्वयवादी भूमिकेमुळेच प्रगतीशील लेखक संघापासून साने गुरुजी राष्ट्रीय स्मारक ट्रस्टपर्यंत सर्वत्र त्यांचा संचार राहिला. गेली काही वर्षे त्यांनी आंतर भारती साहित्य संवाद या अनुवादासाठी चालवल्या जाणयार्‍या चळवळीचे समन्वयक म्हणून बजावलेले काम लक्षणीय आहे.

मराठी साहित्यक्षेत्रात मराठी साहित्यिकांसाठी उदंड पुरस्कार असले तरी अन्य भारतीय भाषांमधील लेखकाचा गौरव करणारा एकही पुरस्कार नाही. अशावेळी चेन्नईची बुकसेलर्स अॅण्ड पब्लिशर्स ऑफ साऊथ इंडिया ही संस्था तमिळेतर भाषेतील साहित्यिकांना एक लाख रुपयांचा घसघशीत पुरस्कार देते आणि त्या पुरस्कारासाठी मराठीतील ज्येष्ठ लेखक अर्जुन डांगळे यांची निवड झाली. त्यांच्या या समग्र जीवनभानाचा गौरव दक्षिणेतील ‘कला अय्यंगार’ पुरस्काराने झाला आहे.

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*