अनिल मोहिले

Anil Mohile

लहानपणापासून संगीताची आवड असलेल्या अनिल मोहिलेंना त्यांच्या वडिलांचे मार्गदर्शन आणि तरंगवाद्याचं बाळकडू मिळाले. वयाच्या १५ व्या वर्षी त्यांना अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालयाची संगीत विशारद ही पदवी मिळाली. रूपारेल कॉलेजमध्ये शिक्षण घेत असतानाच साठच्या दशकात त्यांनी आकाशवाणीवर संगीतसंयोजक म्हणून आपल्या कारकीर्दीला सुरुवात केली .

तेथेच त्यांना भावसंगीताकडे आकृष्ट होण्याची संधी मिळाली. संगीत संयोजनासाठी शिवकुमार पुंजाणी यांच्याकडे त्यांनी मार्गदर्शन घेतले. नोटेशन वाचून वाजवणं हा प्रकार ते पुंजाणींकडे शिकले. आकाशवाणीवर अनिल मोहिले यांची संगीतकार श्रीनिवास खळेंसोबत ओळख झाली.चालीमधल्या जागा गीताच्या चालीला अनुरूप अशा धूनांनी भरणं , नोटेशन लिहिणं हे संगीताचं ज्ञान त्यांना श्रीनिवास खळेंकडून मिळाले. अनिल मोहिले स्वतः बुलबुल तरंग आणि मेंडोलिन वाजवत. स्वतःची नोकरी सांभाळून त्यांनी ही आवड जोपासली होती.

अनिल मोहिलेंवर लक्ष्मीकांत-प्यारेलाल या जोडीतल्या प्यारेलाल शर्मा, शंकर-जयकिशन यांचे म्युझिक अरेंजर सॅबेस्टियन, कल्याणजी आनंदजी यांचे अरेंजर बाळ पार्टे आणि मदनमोहन यांचे अरेंजर सोनिक मास्तर यांचा प्रभाव होता.संगीतकार म्हणून त्यांनी स्वतंत्रपणे तसेच अरुण पौडवाल यांच्या साथीने अनेक चित्रपटांना संगीत दिले. मराठी चित्रपट सृष्टीत अनिल अरुण या जोडीने अष्टविनायक या चित्रपटाला दिलेल्या संगीतामुळे त्यांना भरपूर प्रसिद्धी मिळाली.

अनिल मोहिलेंनी ८६ हिंदी चित्रपटांचे संगीत संयोजन केले आहे. जवळपास ७० हून अधिक संगीतकारांकडे त्यांनी काम केले. मंगेशकर कुटुंबियांच्या कार्यक्रमात ते संगीत संयोजक म्हणून ते कायम मार्गदर्शन करायचे. मोहिलेंनी संगीत संयोजन केलेले हिंदी-मराठी चित्रपट म्हणजे ‘कयामत से कयामत तक’, ‘लेकीन’, ‘शराबी’, ‘डॉन’, ‘थोडीसी बेवफाई’, ‘अभि‍मान’, ‘शर्मिली’, ‘झपाटलेला’, ‘दे दणादण’, ‘धडाकेबाज’, ‘थरथराट’, ‘शुभमंगल सावधान’, ‘अशी ही बनवाबनवी’, ‘जिवलगा’, ‘झपाटलेला’ तर त्यांच्या संगीत संयोजनातून साकारलेली काही सुप्रसिद्ध हिंदी गीतांमध्ये ‘दिल चीज क्या है’, ‘यारा सिलीसिली’, ‘तेरे मेरे मिलन की ये रैना’, ‘दिल हुमहुम करे’; तर मराठी मध्ये’ केव्हा तरी पहाटे’, ‘मेंदीच्या पानावर’, ‘मालवून टाक दीप’, ‘शुक्रतारा’, ‘श्रावणात घन नीळा बरसला’, ‘ये रे घना’, ‘मी डोलकर दर्याचा राजा’, ‘असा बेभान हा वारा’, ‘स्वप्नातल्या कळ्यांनो’, ‘परीकथेतील राजकुमारा’, ‘ससा तो ससा’ अशा गाण्यांचा समावेश होतो.

संगीताच्या क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी बजावणार्‍या कलाकारांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्याचा उपक्रमही २००३ या वर्षापार्षाअनिल मोहिले यांनी राबविला. तीन पिढ्यांच्या संगीतकारांना जोडणारा दुवा म्हणून अनिल मोहिलेंकडे पाहिले जात होते. मुंबई विद्यापीठात संगीत संयोजनाचा अभ्यासक्रमही त्यांनी सुरु केला होता.

संगीत क्षेत्राला दिलेल्या योगदानासाठी अनिल मोहिलेंना राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद यांच्या हस्ते व्हायोलिनवादनाचा राष्ट्रीय पुरस्कार , सूरमणी पुरस्कार ,मास्टर दीनानाथ पुरस्कार , महाराष्ट्र राज्य शासनाचा सांस्कृतिक पुरस्कार , स्वरयोगी किताबाने सन्मानित करण्यात आले आहे.

वयाच्या ७१ व्या वर्षी म्हणजे १ फेब्रुवारी २०१२ ला पहाटे तीनच्या सुमारास हृदयविकाराच्या झटक्याने अनिल मोहिले यांचे निधन झाले.

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*