गाडगीळ, अनंत गणेश (दाजीकाका गाडगीळ)

Gadgil, Anant Ganesh ( Dajikaka Gadgil )

गाडगीळ, अनंत (दाजीकाका गाडगीळ)

अनंत गणेश गाडगीळ ऊर्फ दाजीकाका गाडगीळ यांचा जन्म ११ सप्टेंबर १९१५ ला सांगलीत झाला. मूळचे कोकणातील मालवणमधील त्रिंबक गावचे हे गाडगीळ कुटुंब २०० वर्षांपूर्वी सांगलीत स्थिरावले. सराफी, सावकारी असा जोडव्यवसाय करत २९ नोव्हेंबर १९३२ रोजी ” गणेश नारायण गाडगीळ सराफ व ज्युवेलर्स ” या दुकानाचा शुभारंभ झाला. त्यानंतर १९९५च्या सुरुवातीला पुण्यात ” मेसर्स पुरुषोत्तम नारायण गाडगीळ आणि कंपनी ” (पीएनजी) या नावाने दुकान काढण्याचा धाडसी निर्णय दाजीकाकांनी घेतला. त्यानंतर गाडगीळांनी ९७ मध्ये लक्ष्मी रोडवरच्या दुकानात हिरे व इतर रत्नांचा विभाग सुरू केला. नंतर पौड रोडला सोने-चांदी व हिरे-मोती विक्रीची दोन दुकाने, तसेच चिंचवड आणि कॅम्प विभागात शाखा सुरू केली. गाडगीळ ज्वेलर्सची अमेरिकेतही सराफी व्यवसायाची पेढी आहे. सचोटी आणि मालातील चोखपणा या गुणांमुळे त्यांची ग्राहकांना नेहमीच आपलेसे केले. `आपला धंदा हा मालक आणि कारागीर अशी दोन चाकांची गाडी आहे’ हे दाजीकाकांचे आवडते वाक्य.

वडिलोपार्जीत पी. एन. गाडगीळ ज्वेलर्सची जबाबदारी दाजीकाकांनी गेल्या ७५ वर्षांपेक्षा अधिक वर्षे समर्थरित्या पेलली. पुणे सराफ असोसिएशनचे अध्यक्षपद भूषवून दाजीकाकांनी पुण्यातील सराफांना एकत्र आणले. समाजकार्यात सक्रीय असाणार्‍या दाजीकाका गाडगीळांनी लातूरच्या भूकंपग्रस्तांसाठी निधी उभारला. लक्ष्मी रोडवरच्या पे-अँड-पार्क कायद्याला त्यांनी लाक्षणिक सत्याग्रह करून विरोध केला. आज लक्ष्मी रोडला असलेली पार्किंगची व्यवस्था त्याचेच फलित आहे.

दाजीकाकांना कालनिर्णय पुरस्कार, पुणे महापालिकेतर्फे सत्कार, रोटरी एक्सलन्स ऍवॉर्ड असे अनेक पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. तसेच दाजीकाकांच्या या यशस्वी उद्योगाला ‘वर्ल्ड गोल्ड काऊन्सिलची संलग्न भागीदारी’ हा दुर्मिळ सन्मानही मिळाला.

पु. ना. गाडगीळ आणि कंपनी (पीएनजी) या सराफी पेढीचे आधारस्तंभ, तरुणाईला लाजवेल असा उत्साह अंगी असणार्‍या दाजीकाका गाडगीळ यांचे १० जानेवारी २०१४ या दिवशी वृद्धापकाळाने वयाच्या ९९ व्या वर्षी पुण्यातील प्रयाग रुग्णालयात निधन झाले. अखेरच्या श्वासापर्यंत कार्यरत असलेल्या दाजीकाकांनी ‘पीएनजी’ हा ब्रँड बनवून त्याला जगभर प्रतिष्ठा मिळवून दिली.

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.

( लेखन व संशोधन – सागर मालाडकर )

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*