जोग, अमेय

अमेय जोग हे मराठी संगीतपटलावर चमचमणार्‍या युवा तार्‍यांपैकी एक आघाडीच नाव असून तो प्रसिध्द व्हायोलिनवादक प्रभाकर जोग यांचा सुपुत्र आहे. सारेगम या झी मराठी वरील कार्यक्रमातून असंख्य रसिकांच्या मनावर सांगितीक मोहिनी घालण्यात यशस्वी ठरलेल्या अमेयने आजगायत मराठी शास्त्रीय रागांपासून ते नवीन युगाचे व तरूणाईचे प्रतिनिधीत्व करणार्‍या भावगीतं व रॉक गाण्यांपर्यन्त सर्वच गायनप्रकारांना सारख्याच तन्मयतेने व सचोटीने न्याय दिला आहे

पुणे मुंबईमध्ये चाललेल्या बहुतांशी सांस्कृतिक संवर्धक गायन कार्यक्रमांमध्ये आपल्या सुरेल व गोड गळ्याचे प्रतिबिंब, उपस्थितांवर पाडणारी गाणी म्हणायला त्याला आवर्जुन आमंत्रित केले जाते. चंद्रासारखा पिठुर व चांदण्यांसारखा शीतल आवाज लाभलेल्या अमेयला अशा कार्यक्रमांमध्ये गायला खुपच आवडते. स्वर्गीय अभयसिंहराजे भोसले यांच्या जयंतीनिमीत्त आयोजित करण्यात आलेल्या सातारा फेस्टिव्हलमध्ये ‘रागा टु रॉक’ या मराठी संगीतक्षेत्राच्या उगमापासून ते आजवरच्या गौरवशाली प्रवासावर प्रकाश टाकणार्‍या कार्यक्रमात त्याने रसिकांना सुरांच्या बरसातीमध्ये चिंब भिजविले होते. ‘संवाद’ च्या वतीने दरवर्षी आयोजित करण्यात येणार्‍या सांस्कृतिक दिवाळी पहाट या तोबा गर्दीमध्ये संपन्न होणार्‍या कार्यक्रमात गायन, सकाळच्या वर्धापनदिनानिमीत्त गीत, संगित, व नृत्य या त्रिवेणी कलाप्रकारांचा संगम करणार्‍या व विष्णुदास भावे नाट्यगृहात 29 तारखेला रंगलेल्या विशाल सोहळ्यात हिंदी व मराठी भावगीत गायन, टाईम्स म्युझिक या कंपनीने काढलेल्या माय बाप्पा अल्बम, या भारतीय प्रार्थनांच्या अम्रृतमय वाणीने भक्तांना तृप्त करणार्‍या अल्बमसाठी कोरस गायन, असा अमेयचा चढता संगीत प्रवास आहे. संस्कृतीवैभव संस्थेतर्फे सहा ते नऊ मे यादरम्यान नाशिकमध्ये आयोजित केलेल्या गदिमा महोत्सवामध्ये त्याने आणखी काही युवा कलाकारांसोबत चैत्रबन हा श्रवणीय व नेत्रसुखद कार्यक्रम त्यांच्या गीतमय स्मृतींप्रीत्यर्थ सादर केला होता. मराठी रसिकांच्या कानांभोवती आजन्म पिंगा घालणार्‍या गदिमांच्या गीतांना ही आदर्श आदरांजली होती.

‘मेरी पसंद के गीत’ हा जेष्ठ व्यंगचित्रकार मंगेश तेंडुलकर यांच्या आवडीच्या गीतांचा कार्यक्रम ज्याला खुद्द त्यांचेच समालोचन लाभलेले होते व जो श्रुती या संस्थेतर्फे आयोजित केला गेला होता, त्या कार्यक्रमाला अमेयच्या मंत्रमुग्ध करणार्‍या आवाजाची झालर लाभली होती. तसेच राजाभाऊ बोझावर यांच्या भव्य दिव्य अशा कौटुंबिक सत्कार सोहळ्याच्या वेळी देखील अमेयने अनेक मराठी व हिंदी चित्रपट व भावगीतांचा नजराणा पेष करून त्या सोहळ्यावर अनोखा सुरमयी साज चढविला होता.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*