मुळ्ये, अभिजीत

आरोग्यविषयक विपुल व वैविध्यपुर्ण लेखन करून अनेक कौटुंबिक जोडप्यांच्या जीवनांमध्ये लक्षवेधी सुधारणा करणार्‍या निवडक काही तरूण पत्रकारांमध्ये अभिजीत मुळ्ये यांचे नाव घेता येईल. पत्रकारितेच्या आपल्या प्रदीर्घ कालावधीमध्ये त्यांनी विवीध पदांवर व विभीन्न जबाबदार्‍यांवर आवडीने काम केले, असले तरी आरोग्याच्या सर्वांगीण विकासाच्या संकल्पनेभोवती फिरणार्‍या घटकांवर माहितीपर लेखन करणे हा त्यांचा विशेष जिव्हाळ्याचा प्रांत आहे. लहान असताना प्रत्येक गोष्टींवर चौफेर विचार करणार्‍या अभिजीत यांनी आपल्यातल्या जिज्ञासु पत्रकाराला अवांतर वाचनाद्वारे व सुक्ष्म निरीक्षण शक्तीद्वारे आकार दिलेला होता. मुंबई विद्यापीठातून शैक्षणिक पर्व यशस्वीरित्या संपवल्यानंतर सकाळ या वृत्तपत्राशी त्यांचा जो घट्ट ऋणानुबंध निर्माण झाला होता तो आज इतक्या वर्षांनंतरही टिकुन आहे. सकाळ च्या परिवारात, आपल्यामधील उत्तुंग प्रतिभेला नव्या स्वप्नांची जोड देत असताना त्यांनी अनेक कार्यकारी पदांची धुरा समर्थपणे वाहिली. सकाळ मध्ये त्यांनी सहाय्यक संपादक, मुख्य उप संपादक, वरिष्ठ उप संपादक अशा महत्वच्या कार्यकारी पदांवरती काम केले आहे. सकाळने आज मराठी वाचकांच्या मनामध्ये विश्वासाचे व अत्मियतेचे जे नाते निर्माण केले आहे, त्यामागे मुळ्येंसारख्या विश्वासु, अनुभवी व जुन्या पत्रकार गड्यांच्या साधनेचा अमुल्य वाटा आहे.

सकाळ मिडीया ग्रुप मध्ये साहाय्यक संपादकाचे काम करताना त्यांच्या कामाचे स्वरूप, फॅमिली डॉक्टर या विशेष पुरवणीसाठी येणार्‍या मजकुराची जोडणी, एडिटींग, व नवा मजकुर मिळविण्यासाठी स्त्रोत उपलब्ध करणे हे होते. या विशेषांकांने वेगवेगळ्या आरोग्यविषयक बाबींचे व समस्यांचे निराकरण सोप्या भाषेत करून सामान्य वाचकांचे विचारमंथन व आत्मिक प्रबोधन करण्यात सिंहाचा वाटा उचलला होता. याशिवाय साम मराठी या वाहिनीवर येणार्‍या आरोग्यविषयक कार्यक्रमासाठी मजकूर मिळवून देण्याचा भार त्यांनी उचलला होता. त्यानंतर काही वर्षे त्यांनी स्वतंत्र व्यावसायिक पत्रकार म्हणूनही काम केले ज्याअंतर्गत उपयुक्त पत्रकारितेवर सल्ला देणे, उपयुक्त पत्रकारितेचा आराखडा व विकास करणेबाबत तरूणांना मार्गदर्शन करणे, तसेच या क्षेत्रात स्वतःच अस्तित्व निर्माण करू पाहणार्‍या मिडीया गटांना मजकुरबांधणीकरिता प्रशिक्षीत करणे, अश्या बहुआयामी जबाबदार्‍या त्यांनी समर्थपणे निभावल्या. फॅमिली डॉक्टर या अत्यंत गाजलेल्या विशेषांकामध्ये अभिजीत यांनी स्वतः वेगवेगळ्या आरोग्यविषयक घडामोडींवर स्वाध्यायाद्वारे अनेक माहितीपर लेख लिहून महाराष्ट्रात निरोगी आयुष्याचा पाया घडविण्यास हातभार लावला आहे. त्यांच्या या आरोग्य क्षेत्रातील जाग आणणार्‍या उल्लेखनीय योगदानाबद्दल विरारच्या आरोग्य ज्ञानेश्वरी अंकातर्फे “आरोग्यज्ञानेश्वरी”  हा पुरस्कार प्राप्त झाला. आरोग्य क्षेत्राखेरीज विज्ञान, तंत्रज्ञान, पर्यावरण आदींवर लेखन करण्यात त्यांना रस आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*