देव, मुकुंदराज

युवकांमध्ये शास्त्रीय संगीताची गोडी वाढविण्यासाठी सतत प्रयत्नशील असणारे, तबलावादक  मुकुंदराज देव म्हणजे भारतीय संगीताची झेप सात समुद्रपार नेणार्‍या अनेक रत्नांपैकी एक रत्न.

आई, ज्येष्ठ कथ्थक नृत्यांगना डॉ. मंजिरी देव यांकडून प्रेरणा घेऊन कलेचा वारसा अविरतपणे पुढे नेण्याचे काम मुकुंदराज देव गेले कित्येक वर्षे करीत आहेत. गंधर्व महाविद्यालयातून “तबला विशारद” ही पदवी प्राप्त करुन, दूरदर्शन व आकाशवाणीवर “अ” श्रेणीचे कलाकार आहेत. मराठी संगीत प्रेमींसाठी “सुसंवाद तबल्याशी” या पुस्तकाचे लेखन त्यांनी केले. देव यांच्याच कल्पनेतून व कला दिग्दर्शनाखाली अनुभूती, ड्रम्स अॅण्ड बेल, मिलाप, नादवैभव, रंग इत्यादी सुमधूर कार्यक्रम नावारुपाला आले.

नटराज गोपीकृष्णन्, पं. बिर्जू महाराज, डॉ. प्रभा अत्रे, बेगम परविन सुलताना, उस्ताद दिलशाद खॉं, पं. जसराज, पं. शिवकुमार शर्मा, पं. रोणू मुजुमदार, यांसारख्या अनेक मातब्बर संगीत विदुषींना त्यांनी तबल्याची साथ संगत केली आहे. तसेच सौ. आरती अंकलीकर-टिकेकर, रुपक कुलकर्णी, प्रभा अत्रे, बेगम परविन सुलताना, पं. सतीश व्यास यांसमवेत त्यांनी रागदारी संगीतातील अनेक ध्वनीमुद्रणे व अल्बम केले आहेत. ऑस्ट्रेलिया येथील इंटरनॅशनल म्युझिक फेस्टिवल अशा अनेक कार्यक्रमांमधून आपल्या कला गुणांनी रंगत भरुन परसेशी रसिक जनांना भारतीय रागदारी संगीताने तृप्त केले आहे. ठाणे शहरातील युवकांमध्ये शास्त्रीय संगीताची गोडी वाढविण्यासाठी, शास्त्रीय संगीताचा प्रचार व प्रसार करण्यासाठी व सांस्कृतिक दृष्ट्या ठाणे शहरास संपन्न बनविण्यासाठीचे योगदान श्री. मुकुंदराज देव यांनी आजवर दिले आहे, व यापुढे ही देत राहतील.

पुरस्कार : कला क्षेत्रातील त्यांच्या या भरगच्च कामगिरीमुळे त्यांना सुरसिंगार संसद, मुंबई तर्फे “तालमणी” व सावरकर सेवा संस्था, ठाणे यांतर्फे “पंडित” हे मानाचे किताब देऊन गौरविण्यात आले आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*