जोगळेकर-कुलकर्णी, संपदा

Sampada Joglekar-Kulkarni

ठाण्यातील अनेक सांस्कृतिक कार्यक्रमांचे निवेदन करणार्‍या प्रसिद्ध निवेदिका संपदा जोगळेकर-कुलकर्णी ह्या ठाण्यातील एक रसिकप्रिय व्यक्तीमत्व आहेत.

मुंबई विद्यापीठातून एम.ए. ही पदवी संपादित केलेल्या संपदा जोगळेकर ह्या सध्या पुणे विद्यापीठात पी.एच.डी. करत आहेत. त्यांनी आपले शिक्षण मो.ह. विद्यालय व जोशी बेडेकर महाविद्यालय येथून पूर्ण केले. संपदा जोगळेकर यांनी आजपर्यंत १५ दूरदर्शन मालिका, पाच दैनंदिन मालिकातसेच “शर्यत”व “उदय” या दोन चित्रपटांमध्ये अभिनय केला आहे. तसेच त्यांनी दूरदर्शनवरील कार्यक्रमांचे निवेदन केले आहे.

अभिनय व निवेदन या कलांबरोबरच त्यांनी कथ्थक नृत्य व लेखनातही आपला ठसा उमटवला आहे. ठाण्याच्या “कला सरगम” या संस्थेच्या तीन बालनाट्यांमधून अभिनयाची सुरुवात करणार्‍या संपदा जोगळेकर ह्यांनी ठाण्याच्याच नटराज नृत्य निकेतन संस्थेत डॉ. राजकुमार केतकर यांच्याकडे कथ्थक नृत्याचे प्रशिक्षण घेतले व विशारद पदवी मिळवली. याशिवाय “आईचं घर उन्हाचं”, “घर तिघांचं हवं”, “ऑल दि बेस्ट”, “वार्‍यावरची वरात” इत्यादी नाटकांमधून भूमिका साकारल्या आहेत.

लेखन क्षेत्रातही त्यांनी आपल्या लेखनाने वाचक प्रियता मिळवली आहे. त्यांच्या “काचपाणी” या कथासंग्रहाच्या आतापर्यंत दोन आवृत्त्या प्रकाशित झाल्या आहेत. त्यांचा “बकूळ फुले” हा वैचारिक लेखसंग्रह तसेच “गुंथी” ही लघु कादंबरी प्रसिद्ध आहे.

पुरस्कार : अशी बहुविध कामगिरी करणार्‍या संपदा जोगळेकर ह्यांना आतापर्यंत ठाणे गौरव पुरस्कार, अक्षरधारा पुरस्कार, अल्फा गौरव पुरस्कार, म.टा. सन्मान पुरस्कार, कलांगण पुरस्कार इत्यादी पुरस्कारांचा समावेश होतो.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*