नाडकर्णी, ज्ञानेश्वर गणपत

वयाच्या नवव्या वर्षापासून अखंड वाचन आणि वयाच्या अठराव्या वर्षापासून अखंड लेखन अशी साधना करणारे लेखक आणि कलासमीक्षक ज्ञानेश्वर गणपत नाडकर्णी. कलासमीक्षा, साहित्यसमीक्षा आणि स्वत:चे लेखन यासाठी अठराव्या वर्षी हाती घेतलेली लेखणी नाडकर्णींनी ६४ वर्षे खाली ठेवली नाही. जन्माने अस्सल मुंबईकर (जन्म जोगेश्वरीत) असलेले नाडकर्णी म. वा. धोंड, रघुवीर सामंत, वा. ल. कुलकर्णी यांचे शाळकरी विद्यार्थी होते. या शिक्षकांचा संस्कार त्यांनी बालवयातच झेलला आणि जोपासला. विसाव्या वषीर्च त्यांच्या कथा प्रकाशित होऊ लागल्या. तेव्हा त्यांनी ‘तुकाराम शेंगदाणे’ असे टोपणनावही घेतले. पुढे १९५१ ते ५३ या काळात ब्रिटनमध्ये ते हायकमिशनमध्ये नोकरी करत. मायदेशी परतल्यावर त्यांनी जोमाने इंग्रजी पत्रकारिता व कलासमीक्षा सुरू केली. त्यांनी कथा, कादंबरी, लेख असे विपुल लेखन केले. दोन बहिणी, कोंडी, या कादंबऱ्या व पाऊस, भरती हे कथासंग्रह हे त्यांचे आरंभीचे लेखन. पण पहिला गाजलेला कथासंग्रह म्हणजे ‘चिद्घोष.’ श्रेष्ठ कादंबरीकार म्हणून आपल्याला ओळखले जावे, अशी नाडकणी यांची आकांक्षा होती. त्यांच्या कादंबऱ्या मुंबईच्या उच्चभ्रू पारशी किंवा ख्रिस्ती समाजाचे दर्शन घडवतात. ते वातावरण मराठी माणसाला अपरिचित.

नाडकर्णीची कलासमीक्षा एकेकाळी फार गाजली. एम. एफ. हुसेनसारखे चित्रकारही त्यांचा आदर करत. त्यांच्या कलासमीक्षेचा सुवर्णमहोत्सव झाला तेव्हा जहांगीर आर्ट गॅलरीत खास प्रदर्शन व सत्कार झाला. तेव्हा हुसेनने स्वत:चे लक्षावधी रुपये किमतीचे चित्र नाडकर्णींना भेट दिले. पुस्तके, चित्रपट, नाटके आणि चित्र यांविषयी लिहिताना नाडकर्णी भीड ठेवत नसत. पण पुस्तके न वाचता आणि चित्रे न पाहता ते लिहितात, असा आक्षेप त्यांच्यावर घेतला जाई. अशाच एका प्रसंगी ‘ते पुस्तक वाचवत नव्हतेच’ अशा शब्दांत नाडकर्णीनी स्वत:चे समर्थन केले! नाडकर्णीच्या स्वभावात ओलावाही होता. एकदा एकाने ख्यातनाम कादंबरीकाराच्या फसलेल्या कादंबरीवर तिखट अभिप्राय लिहिला. तेव्हा नाडकर्णीनी फोनवर त्या तरुणाची कानउघाडणी केली आणि मग समजावले की, ‘त्यांच्या वयाकडे पाहून तू लेखणी आवरायला हवी होतीस. शिवाय, त्यांनी वाङ्मयाला पूर्वी अमूल्य देणग्या दिल्यात. त्या कशा विसरायच्या?’ फ्रेंच सरकारच्या पुरस्कारासकट कित्येक मानाचे पुरस्कार त्यांना लाभले. त्यांचे अलीकडे गाजलेले समीक्षालेखांचे पुस्तक म्हणजे ‘अश्वत्थाची सळसळ.’ आळंदीत ज्ञानदेवांच्या दारात अश्वत्थ आहे. या ज्ञानेश्वरांनी जणू त्याच्याशी नाते जोडून त्याची सळसळ टिपली होती.

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.

## Dnyaneshwar Ganpat Nadkarni

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*