नंदा ऊर्फ कर्नाटकी, रेणुका विनायक

नंदा

नंदा यांचे मूळ नाव रेणुका विनायक कर्नाटकी त्यांचा जन्म ८ जानेवारी १९४१ साली झाला. नंदा या सुप्रसिध्द सिनेनिर्माते, दिग्दर्शक आणि नट मास्टर विनायकांची कन्या; लहानपणी बेबी नंदा या नावाने १९४६ रोजी प्रथम बालकलाकार म्हणून “मंदिर” या चित्रपटातनं एका मुलाची भूमिका साकारली; त्यानंतर “जग्गू”, “शंकराचार्य”, “अंगारे”, “जगद्‌गुरु” अश्या १५ ते १६ चित्रपटांमधुन काम केले; तर तरुणपणी अनेक हिंदी चित्रपटांमधुन नायिकेच्या भूमिका साकारल्या.

नंदा यांनी “मला पिक्चरमध्ये काम करायचे नाही”, असे बाबांना ठणकावून सांगितले होते. पण नाइलाजास्तव त्यांना चंदेरी दुनियेत यावे लागले. लतादीदींनी बालकलाकार म्हणून तीन चित्रपटांनंतर अभिनय थांबवला आणि त्यातूनच मास्टर विनायकांना आपल्या मुलीला कॅमेऱ्यासमोर उभे करावे लागले. तेथूनच ‘बेबी’ नंदाचा जन्म झाला. बेबी नंदा यांची भूमिका असलेला मंदिर हा चित्रपट प्रदर्शित होण्याआधीच मास्टर विनायक यांचे निधन झाले. तेव्हा त्यांचे कुटुंब दादर-शिवाजी पार्क येथील आशीर्वाद बंगल्यात राहत होते. नंदा या आयडियल हायस्कूलमध्ये शिकत असताना,त्यांना वयाच्या बाराव्या वर्षी “कुलदैवत” या दिनकर पाटलांच्या मराठी चित्रपटात अभिनेत्री म्हणून झळकण्याची संधी मिळाली; तर नंदा यांचे मावसकाका व्ही. शांताराम यांनी हिंदी चित्रपटात प्रवेश मिळवून दिला. नंदा हिंदीत अभिनेत्री म्हणून झळकल्या तो पहिला चित्रपट होता “तुफान और दिया”! २५ आठवडे चाललेल्या या चित्रपटाने अभिनेत्री नंदा यांची कारकीर्द यशाच्या शिखरावर नेऊन पोहोचवली. त्यानंतर “छोटी बहन”, “कालाबाजार”, “लक्ष्मी”,“बंदी”,“दुल्हन”, आणि “भाभी” अश्या एकामागून एक चित्रपटातनं नंदा यांनी सरस भुमिका साकारल्या.त्यांनी अभिनय केलेला “भाभी” हा चित्रपट तर ५० आठवडे हाऊसफुल चालला. त्यानंतर“धूल का फूल”,“आंचल”,“इत्तेफाक” पासून ते १९८३ च्या “प्रेमरोग”पर्यंत नंदा यांनी ”आपल्या अभिनयाची मोहिनी रसिकांच्या मनावर घातली.

ज्येष्ठ अभिनेते देव आनंद यांच्यासोबत “हम दोनों” तील त्यांची भूमिका व राज कपूर यांच्यासोबत “आशिक” तर “राजेश खन्ना”बरोबर ‘इत्तेफाक’ मध्ये तिने रंगविलेल्या खलनायिका खुपच गाजली.“आंचल” या चित्रपटातील भूमिकेसाठा नंदा यांना सर्वोत्कृष्ठ सहअभिनेत्रीचा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला होता.

हिंदीशिवाय त्यांनी मराठी चित्रपटांतही नंदा यांनी अभिनय केला.मराठीत सदाशिव जे रावकवी दिग्दर्शित “शेवग्याच्या शेंगा”, राजा परांजपे दिग्दर्शित “देव जागा आहे”,“देवघर”, यशवंत पटेकरांचा“झालं गेलं विसरुन जा” तर हंसा वाडकरसोबतचा “मातेविना बाळ” हे ते चित्रपट तर प्रेक्षक आजही विसरु शकलेले नाहीत. “शेवग्याच्या शेंगा मधील बहिणीच्या भूमिकेसाठी नंदा यांना तत्कालीन जवाहरलाल नेहरुंच्या हस्ते गौरवण्यात आले होते.

याशिवाय अभिनेत्री नंदा यांचे लोकप्रिय ठरलेले हिंदी चित्रपट ज्यामध्ये त्यांच्या प्रमुख व्यक्तीरेखा होत्या ते म्हणजे “तीन देवियाँ”,“मेरा कसूर क्या है?”,“कैदी नंबर ९११”,“छलिया”,“गुमनाम”,“नींद हमारी ख्वाब तुम्हारे”,“पती पत्‍नी”,“बडी दीदी”,“मोहोब्बत इसको कहते हैं”,“बेदाग”,“बेटी”,“वोह दिन याद करो”,“शतरंज”,“कैसे कहूँ”,“अंगारें”,“अधिकार”,“अभिलाषा”,“अमर रहे यह प्यार”“असलियत”,“आकाशदीप”,“आहिस्ता आहिस्ता” आणि“जग्गू”.

नंदा या आजन्म अविवाहित राहिल्या. २५ मार्च २०१४ यादिवशी म्हणजे वयाच्या ७५ व्या वर्षी नंदा यांचे वृध्दापकाळाने मुंबईत निधन झाले.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*