तेंडुलकर, सचिन रमेश

Tendulkar, Sachin Ramesh

क्रिकेट मधील एक चमत्कार म्हणून सचिन तेंडुलकरकडे पाहिलं जातं कारण फलंदाजीतलं कौशल्य, चिकाटी, खेळताना वापरलेलं तंत्र आणि सातत्य यांच्या सहाय्याने कसोटी आणि एकदिवसीय सामन्यांसह वीस हजाराच्या वरती धावा करताना सचिनने अनेक विक्रम प्रस्थापित केले. सचिन तेंडुलकर याचा जन्म २४ एप्रिल, १९७३ रोजी मुंबई येथे झाला. त्याचे वडील रमेश तेंडुलकर हे प्राध्यापक होते. मुंबईतील शारदाश्रम विद्यालयात त्याचे शिक्षण झाले. लहान वयापासूनच सचिनला क्रिकेट या खेळात गती होती. क्रिकेटमधील सचिनचे गुरु रमाकांत आचरेकर यांच्याकडून सचिनला प्रशिक्षण मिळालं. त्याचं हे खेळातील वैशिष्ट्य शाळेत असल्यापासूनच दिसत होतं. शाळेत असतांना विनोद कांबळी बरोबर सचिनने ‘हॅरीस शील्ड’ स्पर्धेत २२३ धावा करून ६६४ धावांची भागीदारी केली आणि वयाच्या १५ व्या वर्षी तो मुंबई संघात दाखल झाला.

रणजी स्पर्धेतही त्याने शतक काढले आणि पाकिस्तान दौर्यासाठी त्याची निवड झाली. वयाच्या १६ व्या वर्षापासून त्याने मातब्बर खेळाडूंना तोंड देत आपल्या बॅटचा पराक्रम दाखवला. न्युझीलंड, पाकिस्तान, ऑस्ट्रेलिया, द. आफ्रिका, श्रीलंका, वेस्ट इंडिज यातील सर्व मातब्बर गोलंदाज सचिनवर आपल्या गोलंदाजीने दबाव आणीत. परंतु खेळाची दिशा ठरविल्यामुळे सचिनचा खेळ चमकदार होत असे. कधी आक्रमक खेळ तर कधी बचावाचा समतोल सांभाळत एकाग्रपणे आणि सावधपणे सचिन समोरच्या गोलंदाजाचे तंत्र हाणून पाडीत असे. सलामीचा फलंदाज म्हणून तर सचिनची कारकीर्द दीर्घ काळ यशस्वी झाली. तसेच गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षणातही आपल्या बुध्दिमत्तेचा प्रभाव पाडून एक उत्कृष्ट खेळी तो खेळत असे. वीस हजाराच्या वर धावा करणारा सचिन तेंडुलकर हा जागतिक क्रिकेटच्या इतिहासातील पहिला खेळाडू ठरला. एकदिवसीय सामन्यात सर्वाधिक शतकं काढण्याचा विक्रम सचिनच्या नावा वर आहे.

सुनिल गावस्कर याचा ३४ शतकांचा विक्रमही त्याने मोडला आहे. भारतीय क्रिकेट संघाची कप्तानपदाची धुरा काही काळ सचिनने सांभाळली. क्रिकेटमधील अनेक विक्रम त्याच्या नावावर आहेत. सचिनने अहंकाराचा स्पर्श होऊ दिलेला नाही. खिलाडी वृत्तीचा आदर्श खेळाडू म्हणजे सचिनचे उदाहरण आहे. ‘अर्जुन पुरस्कार’, ‘राजीव गांधी खेल रत्न पुरस्कार’ आणि भारत सरकारने दिलेला गौरवास्पद ‘पद्मश्री’ किताबाचा सचिन मानकरी ठरला आहे.

## Sachin Ramesh Tendulkar

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*