आडनावाचा वारसा

कुटुंबाला आणि पर्यायाने व्यक्तीला आडनाव असतेच असते. ही प्रथा जवळजवळ सर्वच देशात पाळली जाते. मराठी समाजही अपवाद नाही. आनुवंशिकतेचे साधर्म्य दर्शविण्यासाठी, कुटुंबांच्या आडनावांची प्रथा, मुळात रूढ झाली असावी. परंतू कालांतराने या प्रथेचा गैरवापर होअून विचित्र, विक्षिप्त, लाजिरवाणी, भयानक आणि हास्यास्पद आडनावे निर्माण झाली आणि ती पिढ्यानपिढ्या चालूही राहिली.

अुंदरे, कुत्रे, झुरळे, डुकरे, पिसाट, बहिरट, आळशी, शौचे, हगवणे, हगरे, अुकिडवे, अुताणे, अुपडे, रडके, रेडे, टणक, बेरड, प्राणजाळे, ढोरे, ढोरमारे, माणूसमारे, बापमारे, हडळ, भूत, ब्रम्हराक्षस, कुंभकर्ण, आगलावे, आडनटवे, आळशी, अुकिर्डे, अुपाशी, भुकेले, अेकशिंगे, बारलिंगे, कचरे, कंगाल, कानकाटे, कानतुटे, कानतोडे, कानपिळे, कानफाडे, पोटफाडे, पोटदुखे, डोआीफोडे, कावळे, किडे, किरकिरे, कोडगे, कोंबडे, खेकडे, गधडे, गधे, गालफाडे, गालफुगे, गांडोळे, गीध, गुपचुप, गेंडे, गोतमारे, घमंडे, घरबुडवे, घरमोडे, घरलुटे, भामटे, भिकारी, घाणे, घोटाळे, घोडमुखे, चकणे, चणेचोर, चिकटे, चुळभरे, चोर, चोरटे, चोरपगार, चोरमुले, चोरे, रगतचाटे, दशपुत्रे, वीसपुते वगैरे. माझ्या आडनावकोशातून अशी सर्व आडनावे घेतल्यास ती यादी ४-५ पानांची तरी होआील.

अशासारखी विचित्र, भयंकर आणि लाजिरवाणी आडनावे धारण करून समाजात वावरणार्‍या मुलां-मुलींना, लेकी-सुनांना टीका, निंदा, हेटाळणी आणि टिंगल यांना सतत तोंड द्यावे लागते, मनःस्ताप सहन करावा लागतो. विवाह जुळवितांना असल्या प्रकारच्या आडनावामुळे समस्या निर्माण होतात त्यामुळे अशी आडनावे बदलण्याची आवश्यकता आहे. आजच्या आपल्या पुरूषप्रधान समाजव्यवस्थेत, व्यक्तीनावासमोर वडिलांचेच नाव लावण्याची परंपरा आहे. आता काही बंडखोर व्यक्ती, आपल्या नावासमोर आआीचे नाव लावतात. विवाह जुळवितांना, शाळाकॉलेजात प्रवेश घेतांना, समाजकार्य करतांना, नवीन व्यक्तीची ओळख करून देतांना अशी आडनावे नाही म्हटली तरी अडचणीचीच होतात. समाजासाठी आडनाव धारण करून समाजात वावरावयाचे असल्याने विक्षिप्त, विचित्र, लांछनास्पद आणि हास्यास्पद आडनावे, हा सामाजिक कलंक आहे आणि तो पुसण्यासाठी, धुवून काढण्यासाठी पुरोगामी बदलत्या दृष्टीकोनातून अुपाय योजायला हवेत, प्रयत्न करायला हवेत. कायदेशीररित्या नावात/आडनावात बदल करून घेणे हा प्रमुख आणि प्रभावी अुपाय आहे. आडनावात बदल अशा नोटिसा वृत्तपत्रात नेहमी झळकतात. भूतकडेचे… वाडेकर, खर्जुलचे… पाटील, धोबीचे… माने असे बदल झालेल्या नोटिसा मी संग्रहीत केल्या आहेत.

— गजानन वामनाचार्य

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*