मराठी आडनाव – गुळदगड.

Marathi Surname - GulDagad

गुळदगड हे आडनाव अैकल्याबरोबर आपल्या मनात विचार येतो की, या कुटुंबाचा, दगडासारख्या गुळाशी काहीतरी संबंध असावा. वैशिष्ठ्यपूर्ण किंवा विचित्र आडनावासंबंधी आपण असाच सरळसरळ संबंध लावतो. परंतू अशा आडनावांच्या कुळकथा वेगळ्याच असतात. त्या, त्या कुटुंबातील व्यक्तीकडून किंवा कुण्या जाणकार व्यक्तीकडूनच, बर्याच खात्रीपूर्वकरित्या जाणून घेतल्या जाअू शकतात.

गुळदगड या मराठी आडनावाची नवलकथा, श्री. मल्हारी कुळकर्णी या माझ्या कानडी-मराठी मित्रानं सांगितली, ती अशी …
“ कानडी भाषेत, टेकडी या अर्थानं गुड्ड असा शब्द आहे. कर्नाटकात गुळेद या नावचं खेडं असून त्या गावाजवळच अेक टेकडीही आहे. त्या टेकडीवर वास्तव्य असलेलं अेखादं कुटुंब, महाराष्ट्रात स्थायिक झाल्यावर त्यांनी गुळेदगुड्डकर असं आडनाव धारण केलं असावं ” …

मराठी आडनावात, ‘कर’ लागलेले आणि ‘कर’ झडलेले, अशा आडनावांच्या शेकडोंनी जोड्या आढळतात. कोठे-कोठेकर, धुळे-धुळेकर, वाड-वाडकर, देवडे-देवडेकर वगैरे. त्यानुसार ‘कर’ झडल्यावर गुळेदगुड्ड असं सुटसुटीत आडनाव तयार झालं. पुढे … गुळेदगुड… गुळेदगड..गुळदगड… असा त्या आडनावाचा प्रवास झाला असावा. परंतू ते आडनाव आपण, गुळद-गड असं न अुच्चारतांना गुळ-दगड असं अुच्चारतो आणि त्या कुटुंबाचा, दगडासारख्या गुळाशी संबंध जोडतो.

— गजानन वामनाचार्य

(अमृत :: अेप्रिल 1982)

About गजानन वामनाचार्य 25 Articles
भाभा अणुसंशोधन केन्द्र, (BARC) मुंबई येथील किरणोत्सारी एकस्थ आणि किरणोत्सारी तंत्रज्ञान विभागातून निवृत्त वैज्ञानिक. मराठीसृष्टीवरील नियमित लेखक. सेवानिवृत्तीनंतर त्यांनी मराठी विज्ञान परिषदेच्या कामात स्वारस्य घेतले. मविप च्या पत्रिका या मुखपत्राचे ते संपादक आहेत. ६०,००० हून जास्त मराठी आडनावांचा संग्रह त्यांच्याकडे आहे.
Contact: Website

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*