उस्मानाबाद जिल्ह्यातील सातवाहनकालीन ‘तगर’ नगरी

Ter - A Town of Satvahan Era, in Usmanabad District

भारताचा प्राचीन इतिहास अतिशय समृद्ध आहे. प्राचीन काळात भारतात अनेक प्रगत औद्योगिक शहरे होती. विदेशातील शहरांसोबत त्यांचा व्यापारही चालत असे. काळाच्या ओघात ही शहरे लोप पावली. हदप्पासारख्या काही संस्कृती तर जमिनीच्या आत गडप झाल्या.

प्राचीन काळातील महाराष्ट्रातील असेच एक शहर जमिनीच्या आत गाडले गेले. हे ऐतिहासिक प्राचीन औद्योगिक शहर म्हणजे उस्मानाबाद जिल्ह्यातील ‘तेर’ होय. संत परंपरा लाभलेले हे स्थळ भारतातील प्राचीन प्रगत शहरांपैकी एक होते. उस्मानाबादपासून केवळ ३२ कि.मी. अंतरावर असलेले ‘तेर’ हे सातवाहन काळात ‘तगरनगरी’ म्हणून प्रसिद्ध होते.

इ.स. पूर्व २०० ते ४०० वर्षांंतले हे शहर असून तेव्हा रोममधून भारतात सोने आणि मद्य आयात केले जात होते. तर भारतातून मसाल्याचे पदार्थ निर्यात होत असत. त्याकाळी तगर नगरी हे भारतातील प्रमुख औद्योगिक केंद्र होते.

१९५८ मध्ये येथे पहिले उत्खनन झाले. त्यानंतर १९६७-६८ मध्ये पुन्हा उत्खनन करण्यात आले. त्यानंतर १९७५ मध्ये उत्खनन झाले. आता पुन्हा उत्खनन सुरु झाले आहे. यामधआये सातवाहन काळातील बांधकाम, तांब्याची नाणी, उथळ भांडी, हस्तीदंतापासून तयार केलेली केस विंचरण्याची फणी, शंखापासून बनवलेले दागिन्यातले मणी, खापराची भांडी अशा अनेक वस्तू सापडल्या आहेत.

उत्खनन करताना येथे भुरकट लाल माती, त्यानंतर पांढरी माती आणि सर्वात खाली काळी माती आढळून आली. मातीच्या या प्रत्येक थरात संस्कृतीतील बदल दिसून येतो. ही काळी माती त्याकाळी जवळूनच वाहणार्‍या तेरणा नदीला आलेल्या प्रचंड पुरातून जमा झाली असावी आणि या प्रचंड पुरामुळेच तगर शहराचा नाश झाला असावा असाही अंदाज व्यक्त करण्यात येतो.

उत्खननाद्वारे हे शहर बाहेर काढण्याचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प राज्य पुरातत्त्व विभागाने हाती घेतला आहे. राज्यातील हा सर्वात मोठा प्रकल्प असून यात राज्यातील संपूर्ण पुरातत्त्व विभाग मिळून काम करणार आहे. यासाठी आॅर्कियोलॉजी सर्व्हे आॅफ इंडिया यांची मदत घेतली जाणार आहे.

सातवाहनकालीन तगर नगरीतील वसाहतीचा होत गेलेला विकास, विस्तार आणि इतर विविध पैलूंवर उत्खननाद्वारे प्रकाश पडेल. हडप्पासारखे प्रगत वसाहतीचे अवशेष या ठिकाणी आढळून येण्याची शक्यता आहे. त्यामुळे अत्याधुनिक तंत्रज्ञानाद्वारे तेर येथे उत्खनन करण्यात येणार आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*