लातूर जिल्ह्याची भौगोलिक माहिती

महाराष्ट्राच्या दक्षिण-पूर्व सीमेवर आणि कर्नाटकाच्या उत्तर-पूर्व सीमेजवळ हा जिल्हा स्थित असून महाराष्ट्राच्या औरंगाबाद विभागातील एक महत्त्वाचा जिल्हा आहे.आग्नेय महाराष्ट्रात मराठवाडा विभागात असणार्‍या लातूर जिल्ह्याचे क्षेत्रफळ सुमारे ७,१५७ चौ. कि. मी. असून जिल्ह्याच्या उत्तरेस परभणी, उत्तर व पूर्वेस नांदेड, पूर्वेस व आग्नेयेस बिदर (कर्नाटक), दक्षिण व पश्र्चिमेला उस्मानाबाद, वायव्येला बीड हे जिल्हे लातूरला जोडून आहेत. जिल्ह्याचा पश्र्चिम भाग व मध्य भाग बालाघाट डोंगर रांगांनी व्यापलेला आहे. जिल्ह्याच्या मध्यभागी मांजरा नदीचे खोरे, तर दक्षिणेकडे तेरणा नदीचे खोरे पसरलेले आहे. उत्तरेकडील प्रदेश सखल व सपाट आहे.

मांजरा ही जिल्ह्यातील मुख्य नदी असून तेरणा, तावरजा, धरणी या तिच्या उपनद्या आहेत. जिल्ह्याच्या उत्तरेकडील भागातून मन्याड, लेंडी या नद्या वाहतात. मांजरा, तेरणा, धरणी, तीरु, तावरजा व मन्याड या नद्यांवर जिल्ह्यात धरणे बांधण्यात आली आहेत. लातूर जिल्ह्याचे हवामान उष्ण, काहीसे सौम्य व कोरडे असून पर्जन्यमान मध्यम स्वरूपाचे आहे. जिल्ह्यात बांधकामाचा दगड मोठ्या प्रमाणावर उपलब्ध हेतो.

२००१ च्या जनगणनेनुसार जिल्ह्याची लोकसंख्या २०,८०,२८५ एवढी असून जिल्ह्यात दर चौरस कि.मी.मध्ये सुमारे २९१ व्यक्ती राहतात. जिल्ह्यात पुरुषांची एकूण संख्या १०,७५,२५७ एवढी आहे व स्त्रियांची एकूण संख्या १०,०५,०२८ आहे. दर हजार पुरुषांमागे स्त्रियांची संख्या ९३५ एवढी आहे.

1 Comment on लातूर जिल्ह्याची भौगोलिक माहिती

  1. लातूर मध्ये पाणी टंचाई का आहे. मी लातूर मधून बोलतोय माझे नाव:-kendre omhari माझे गाव गुत्ती ता:- जळकोट
    गूत्ती गाव येथे पाणी टंचाई खूप आहे.गावात नळ आहेत पण नलात पाणी येत नाही. आमच्या गावात खूप मगुर लोक आहेत आणि ते मगुरी करून खातात तेवढा करून पाणी आणायला जने खूप मोठे संकट आहे.तरी हा एसएमएस जे कोणा पाशी पोहचेल त्याने जिला अधिकारी कढे पाठवा माझी ही विनंती आहे . आमच्या गावाला 3 तलाव आहेत पण गावात पाणी येत नाही … Plz ही विनंती स्वीकारावी …..??

Leave a Reply

Your email address will not be published.


*