नांदेड जिल्ह्यातील पर्यटनस्थळे

माहूरची रेणूकादेवी (शक्तीपिठ) – दुर्गोत्सवासाठी विदर्भात प्रसिध्द असलेल्या माहुरच्या रेणुका देवीच्या मंदिरात हजारे भाविकांची दररोज गर्दी उसळत आहे. माहूर येथे रेणुका देवीचे ३०० वर्षांपेक्षा जास्त जुने हेमाडपंथी मंदिर आहे, तसेच माहूर गडावर महानुभावपंथी दत्त मंदिर, परशुराम मंदिर व महासती अनुसया मंदिर असल्याने भाविकांची इथे सतत गर्दी असते. देवीच्या साडेतीन पीठांपकी एक पूर्ण पीठ माहूरची रेणुका असल्याने भक्तांची वर्दळ मोठय़ा प्रमाणात होत असते.

कंधारचा किल्ला – हा महाराष्ट्राच्या नांदेड जिल्हयातील कंधार या तालुक्याच्या गावी असलेला एक भुईकोट किल्ला आहे. कंधारच्या किल्ल्यातील धन बुरूज, रंगीन दरवाजा व त्याशेजारील इमारती इब्राहीम आदीलशहा याने बांधलेल्या आहेत. मलिक अंबर या प्रसिद्ध कारभार्‍यानेही या किल्ल्यातील अनेक इमारती पूर्ण केल्या व बांधल्या.

मुखेड येथील शिवमंदिर – महाराष्ट्रातील नांदेड जिल्ह्यातील मुखेड या गावी असलेले शिवमंदिर हे इसवी सनाच्या अकराव्या शतकात बांधले गेले असावे, असा अंदाज आहे. मंदिर उत्तराभिमुख असून मंदिराच्या गर्भगृहात एक मीटर उंचीच्या भद्रपीठावर शिवलिंग आहे. मंदिराच्या बाहेरील मंडोवरावर मूर्तिशिल्पे आहेत. चौरस तळखडा, त्यावर अष्टकोनाकृती आणि वर्तुळाकृती घटक, त्यावर शीर्ष आणि कीचकहस्त असा सामान्यपणे मंदिरातील स्तंभांचा घटकक्रम आहे.

माळेगावची यात्रा – माळेगाव हे महाराष्ट्र राज्यातील नांदेड जिल्ह्याच्या लोहा तालुक्यातील एक गाव असून दरवर्षी मार्गशीर्ष महिन्यातील वद्य एकादशीला येथे भरणार्‍या खंडोबाच्या यात्रेसाठी ते प्रसिद्ध आहे. ही यात्रा म्हणजे महाराष्ट्रातील तसेच महाराष्ट्राच्या लगत असणार्‍या आंध्र, कर्नाटक यांच्या सीमावर्ती प्रदेशातील भटक्या विमुक्तांसाठी .या यात्रेत वाघ्यामुरळींची गाणी, गोंधळय़ांची गाणी, वारू नाचविणे, आराध्यांची गाणी, ढोलकी-फडाच्या तमाशाचे खेळ, संगीत बारी याशिवाय बहुरूपी रायरंद, वासुदेव, स्मशान जोगी, मरीआईवाले अशा विविध लोककलावंतांनी सादर केलेल्या कलांचे दर्शन या यात्रेत होते.

देगलूर तालुक्यातील सिद्धेश्वर मंदीर (होट्ट्ल) – होट्टल येथील चालुक्यकालीन मंदिरे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नांदेड जिल्ह्याच्या देगलूर तालुक्यात देगलूरपासून ८ कि.मी. पश्चिमेला असलेल्या होट्टल गावातील चालुक्यकालीन मंदिरे व शिल्पस्थापत्य अवशेष आहेत. महाराष्ट्रात नांदेड जिल्ह्याच्या देगलूर तालुक्यात देगलूरपासून ८ कि.मी. पश्चिमेला असणारे होट्टल हे गाव चालुक्यकालीन शिल्पस्थापत्य अवशेषांचे आगारच आहे. होट्टल येथील शिल्पसंपदा फक्त मराठवाड्याचीच नव्हे तर साऱ्या महाराष्ट्राची सौभाग्यलेणी ठरावीत अशी आहे.

याचबरोबर या जिल्ह्यात नांदेडचा किल्ला, बिलोली मशिद, श्री गुरुगोविंदसिंह यांचा गुरुद्वारा हीसुद्धा पाहण्यासारखी ठिकाणे आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*