नवीन लेखन...

छत्रपतींच्या रणनितीचा वापर करुन देशासमोरची आव्हाने कमी करा

छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती महाराष्ट्रात अत्यंत मोठ्या प्रमाणात साजरी होत असते. शिवछत्रपतींनी अनेक अद्भुत भासणारे पराक्रम करून आदिलशहा, कुतुबशहा व मोगलांस जेरीस आणून स्वराज्याची स्थापना केली. शिवरायांच्या या पराक्रम गाथेतील एक सुवर्णपान म्हणजे, मध्यरात्री बारानंतर महाराजांनी शाहिस्तेखानावर घातलेला छापा!

शाहिस्तेखान स्वराज्यात धुमाकूळ घालत होता.शाहिस्तेखानाने तळ ठोकलेल्या लाल महालावरच हल्ला करण्याची, कल्पनेच्याही पलीकडील अशी योजना आखली. शिवरायांनी त्यांचे बालपणीचे सवंगडी बाबाजी बापूजी व चिमणाजी बापूजी देशकुळकर्णी यांच्यासह काही निवडक, जीवाला जीव देणार्‍या अत्यंत शूर साथीदारांसह लाल महालावर छापा घातला. महाराज, बाबाजी व चिमणाजी यांना लाल महालाची माहिती होती. त्यांनी भटारखान्यातून महालात सहज प्रवेश केला व कापाकापीस सुरुवात केली. अंधाराचा फायदा घेऊन खान पळण्याच्या बेतात होता. परंतु महाराजांनी चपळाईने त्याच्यावर घाव घातला.त्याच्या हाताची तीन बोटेच तुटली, उजवा हात थोटा झाला.

शाहिस्तेखानावरील यशस्वी झडपेआधी सतत तीन वर्षे महाराजांनी अनेक संकटांना तोंड देत त्यांच्यावर विजिगीषु वृत्तीने मात केली. अफझलखानाशी मुकाबला करण्यासाठी महाराज राजगडावरून ११ जुलै १६५९ रोजी प्रतापगडाकडे जाण्यास निघाले आणि महाराजांच्या आयुष्यातील, स्वराज्याच्या उभारणीतील एका महत्त्वपूर्ण अवघड कालखंडास सुरुवात झाली. अफझलखान वधानंतर महाराजांनी व त्यांच्या सहकार्‍यांनी अथक मेहनत करून स्वराज्य वाढवले. याच दरम्यान त्यांनी विलक्षण धाडसाने सिद्दी जौहरच्या वेढ्यातून आपली सुटका करून घेतली होती.

स्वत: आघाडीवर राहून योजना कार्यान्वित करणे हे देदीप्यमान यशाचे सूत्र

मानवी स्वभावाचा अतिसूक्ष्म अभ्यास महाराजांनी केला होता. अहंकारी, आत्ममग्न माणसे खोट्या स्तुतीला भाळतात, मोहात पडतात याचा उपयोग करून अफझलखानास त्यांनी आपल्याला सोयिस्कर अशा रणक्षेत्रात खेचून आणले. तहाचा आभास निर्माण करून सिद्दी जौहर व त्याच्या सैन्याला गाफील बनवून ते पन्हाळ्यावरून निसटले. शाहिस्तेखानाला स्वराज्यातून हुसकावण्यासाठी आक्रमण हेच संरक्षणाचे उत्तम साधन असते व अनपेक्षित धक्क्यांतून सावरताना बेसावध माणसाला वेळ लागतो (धक्का तंत्र) याचा यशस्वी वापर त्यांनी केला. काटेकोर नियोजन, वेळेची अचूक निवड, वेगवान हालचाली व स्वत: आघाडीवर राहून योजना कार्यान्वित करणे हे त्यांच्या देदीप्यमान यशाचे सूत्र होते. बलाढ्य शत्रूंचा पराभव त्यांनी युक्तीच्या व बुद्धीच्या बळावर आपल्या मर्यादित सामर्थ्याचा कौशल्याने उपयोग करून केला.

शिवरायांचे पराकोटीचे प्रगल्भ हेरखाते

छत्रपती शिवाजी महाराजांनी अत्यंत आदर्श राज्यव्यवस्था निर्माण केली. हे स्वराज्य निर्माण करताना शिवरायांसारख्या द्रष्ट्या राजाचे ‘गुप्तचर विभाग’ या राज्याच्या महत्त्वाच्या अंगाकडे दुर्लक्ष होणे शक्य नव्हते. शिवरायांचे हेरखाते एवढे पराकोटीचे प्रगल्भ होते की, त्यांची तुलना जगातल्या कुठल्याही हेरयंत्रणेशी होऊ शकत नाही.

एखाद्या मोहिमेचे पूर्वनियोजन तसेच प्रत्यक्ष मोहिमेची आखणी यात हेरांचे महत्त्वपूर्ण योगदान असे. ज्यायोगे शिवरायांचे पुढील बरेचसे काम सोपे व सुलभ होई. पराक्रम, धाडस व हेरांनी योग्य वेळी पुरवलेली माहिती या समन्वयावर शिवराय अत्यंत यशस्वीपणे मोहीम पूर्ण करीत असत!

बहिर्जी व त्यांच्या साथीदारांनी इतिहासात महत्त्वाची कामगिरी बजावली

शिवरायांच्या संकल्पनेतील हेरखात्याला प्रत्यक्षात मूर्त स्वरूपात आणले ते बहिर्जी नाईक यांनी! अत्यंत कुशाग्र बुद्धिमत्ता, समयसुचकता, धाडसीपणा, साहसाची अंगभूत जोड आदी गुणांवर बहिर्जी व त्यांच्या साथीदारांनी इतिहासात अत्यंत महत्त्वाची कामगिरी बजावली आहे यास तोड नाही! बहिर्जी नाईक, सुंदरजी, कर्माजी, विश्‍वास मुसेखारेकर, विश्‍वास दिघे, विठोजी माणके, अप्पा रामोशी, महादेव अशी काही नावे जरी आपल्याला परिचित असली तरी शिवरायांच्या गुप्तहेर खात्याची पूर्ण माहिती इतिहासाला नाही. इतिहास इथे मुका होतो. कदाचित हेच शिवरायांच्या हेरगिरी खात्याचे यश म्हणावे लागेल!

शिवरायांचे हेरखाते हे आजच्या कुठल्याही देशाच्या ‘इंटेलिजन्स ब्युरो’पेक्षा कमी नव्हते. किंबहुना काकणभर सरसच ठरेल. शिवराय व बहिर्जी यांच्या बुद्धिचातुर्यांच्या मार्गदर्शनाखाली मोहिमेच्या पूर्वतयारीचा भाग म्हणून काही मार्गदर्शक तत्त्वांचा वापर केला जाई.

वेशांतर करून हेरगिरी करणे हा शिवरायांच्या हेरखात्याचा, पर्यायाने बहिर्जी नाईक आणि इतर हेरांचा हातखंडा होता. बहिर्जी व त्यांचे हेर परमुलखात, साधू, भिकारी, सोगांडे, गोंधळी, जादूगार, भविष्य सांगणारे, ज्योतिष इत्यादी वेषांतर करून इत्थंभूत माहिती घेत असत. ही वेषांतरे इतकी चपखल असत की प्रत्यक्ष शत्रूलासुद्धा यांचा थांगपत्ता लागत नसे. स्वराज्यापासून अनेक कोस दूर असलेल्या सुरतेची माहिती काढणे हे अत्यंत धोकादायक काम, परंतु बहिर्जीच्या नेतृत्वाखाली विठोजी माणके, अप्पा रामोशी हे बाबुल, मोमीन व रामशरण या नावाने सुरतेत वावरत होते. यात मोमीन म्हणजे बहिर्जी भिकार्‍याच्या वेशात, तर विठोजी माणके म्हणजे बाबुल नावाने घोड्याला नाल लावण्याचे काम तर अप्पा रामोशी रामशरण या नावाने वावरताना सुरतेची खडान्खडा माहिती काढली व पुढे शिवरायांनी आपले काम फत्ते केले!

सर्वोत्तम सर्वश्रेष्ठ हेरयंत्रणा

इतक्या जुन्या काळात आजच्यासारखे मोबाईल, विविध गॅझेट्स, वेबकॅम, सेटॅलाईट नसताना, तंत्रज्ञानाची जोड नसताना बहिर्जी नाईक व त्यांच्या हेरांनी मिळालेल्या माहितीचे संकलन, विश्‍लेषण इतक्या अचूकपणे कसे केले असेल! परमुलखातील भौगोलिक ज्ञान मिळवून प्रतिस्पर्धांच्या सणावारांची, बलस्थाने, कमकुवत स्थाने यांची माहिती योग्य वेळेत घेऊन ती महाराजांना योग्य वेळेत कशी दिली असेल ?

बहिर्जी आणि त्यांची त्यांच्या काळातील सर्वोत्तम हेरयंत्रणा निर्विवाद सर्वश्रेष्ठ होती यात कोणाचेही दुमत होणे नाही. स्वराज्यावर सर्वांत पहिले व भीषण संकट घोंघावत आले ते अफजलखानाचे. याप्रसंगी सर्वांचीच कसोटी पणाला लागली होती. मात्र अशाप्रसंगी बहिर्जी व त्यांच्या हेरांमार्फत शिवरायांना खानाची, खानाच्या गोटाची व त्यांच्या मनसुब्यांची माहिती अचूक मिळाली. इतकेच नव्हे तर भेटीची कलमे ठरवायला गेलेल्या गोपीनाथ पतांच्या माध्यमातून अफझलखानाच्या डेर्‍यामध्ये कशाची चर्चा चालू आहे, इतकेच नव्हे तर खानाचे अंगरक्षक कोणे होते, सय्यद बंडाची माहिती, खानाचे मनसुबे काय आहेत ही माहिती हेरखात्याने अचूकपणे काढली. या जोरावर सय्यद बंडाला पर्याय म्हणून जीवा महालाला उभे केले गेले; तर खान अंगचटीला आला तर त्याच्याच ताकदीचा विसाजी मुरंबकदेखील अंगरक्षकांत सामील केला होता. हे निर्णय किती अचुकपणे घेतले गेले याची साक्ष आपल्याला पटते!

पुढे पन्हाळगड प्रसंगात शिवरायांना सुखरूप बाहेर काढण्यासाठी बहिर्जी नाईक व त्यांच्या हेरांमार्फत पन्हाळगड, सिद्धी गौहरच्या वेढ्यांची अचूक व तंतोतंत माहिती शिवरायांच्या हेरखात्याने काढली व त्यानंतरच शिवराय पन्हाळ्यावरून निसटू शकले!

गुप्तहेरांच्या संदर्भात केलेली मांडणी आजच्या काळापेक्षाही आधुनिक

त्यांच्या युद्धनीती, राजनीती, समाजनीतीमध्ये अनेकदा कौटिल्याच्या नीतीचे प्रभाव दिसतात. सुरत लूट, बसनुरची स्वारी, आग्रा-भेट व सुटका, दक्षिण दिग्विजय अशा अनेक घटनांमध्ये मोहिमांमध्ये सुरक्षित मार्ग शोधण्यापासून शत्रूच्या हालचालीची बित्तमबातमी घेऊन ते सुरक्षितपणे पोहोचवणे या गोष्टी मुरब्बी हेर व हेरखाते असल्याशिवाय संभवनीय नाही!

छत्रपतींच्या रणनितीचा वापर

घसरत चाललेल्या  नीती मूल्यांबरोबर, जोर धरत असलेली स्वार्थी वृत्ती, व्यभिचार, स्रियांवरील अत्याचार, शिक्षणाचे बाजारीकरण, बेरोजगारी, आर्थिक विषमतेतील वाढती दरी आणि समाजातील तेढ. असा कल्लोळ आजूबाजूला दिसत आहे. या सगळ्या परिस्थितीला राजकारण आणि राजकीय पक्षांना जबाबदार ठरवून समाजातील प्रत्येक घटक आपले उत्तरदायित्व झटकण्याचा प्रयत्न करत आहे. पण सगळ्यात मी कुठे असं स्वतःच मूल्यमापन करण्याची तसदी मात्र घेत नाही. या सामाजिक असमतोलात आपण किती जबाबदार आहोत हे, जाणून घेण्याची तसदी घेतली तर, प्रत्येकाला आपल्या शिवाजी महाराजांचा विचार आपल्या कृतीतून हरवला आहे यांची जाणीव होईल. ही जाणीव होणं कदाचित नव्या समाज निर्मितीच बीज असेल.

शिवाजी महाराजांच्या कार्यपद्धती पाहिले की, दूरदृष्टी असलेली माणसे कोणत्याही काळात जन्माला आली तरी कालातीतच असतात आणि म्हणूनच शिवरायांचा आठव केवळ घोषणा किंवा जयजयकारांच्या गदारोळात न अडकता शिवरायांच्या कर्तृत्वगुणांची आठवण ठेवणे जरुरी आहे.

देशप्रेम ही केवळ सोयीने वापरण्यापुरती किंवा, पोलिसांवर, लष्करांवर सोपविलेली गोष्ट नसावी. आज आपला देश सुरक्षित आहे का? त्यासंदर्भात देशासमोर कोणती आव्हाने आहेत आणि छत्रपतींच्या रणनितीचा वापर करुन ही आव्हाने कमी करु शकतो का? याचा विचार केला पाहिजे.

— ब्रिगेडियर हेमंत महाजन (नि)

ब्रिगेडियर हेमंत महाजन (नि)
About ब्रिगेडियर हेमंत महाजन (नि) 288 Articles
ब्रिगेडियर हेमंत महाजन हे राष्ट्रीय सुरक्षा या विषयावर नियमितपणे लेखन करत असतात. त्यांचे लेख मराठीतील अनेक वर्तमानपत्रांत नियमितपणे प्रसिद्ध होतात. अनेक दूरचित्रवाणी वाहिन्यांवर ते नियमितपणे तज्ज्ञ वक्ते म्हणून कार्यक्रमांत सहभागी असतात.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..