नवीन लेखन...

मुंबईचा ‘फोर्ट’..

The Old Fort in Mumbai

मुंबईच्या दक्षिण टोकावर असलेला ‘फोर्ट’ एरिया ज्याने पाहिला नाही त्यानं मुंबई पाहिली नाही असं म्हणायला हरकत नाही..किंबहूना, मुंबई हे संबोधन मुख्यत्वेकरून याच विभागाला लागू होतं असं म्हटलं तरी चुकणार नाही..फोर्टातले ते प्रशस्त रस्ते आणि फुटपाथ, त्या ब्रिटीशकालीन भव्य आणि देखण्या इमारती, प्रत्येक इमारतीला असलेला घाटदार घुमट वा उंचं मनोरा याची भुरळ न पडणारा विरळाच..!

हा सारा परिसरच देखणा, ब्रिटीश साम्राज्यशाहीच्या खुणा अंगाखांद्यावर मिरवणारा..प्रथम पोर्तुगीज व नंतर ब्रिटीश, असा पावणेतीनशे वर्षांच्या परकीय सत्तेच्या खुणा, काही प्रत्यक्ष तर काही नाममात्र, या परिसरात अजुनही सापडतात..सुरूवातीस उल्लेख केलेल्या ब्रिटीशकालीन इमारती (एक एक इमारत नुसती इमारत नसून प्रत्येकीला स्वत:ची अशी कहाणी आहे) या प्रत्यक्ष दिसणाऱ्या खुणा, तर केवळ नांवाने अखंड दुनियेत मशहूर असलेल्या ‘काळा घोडा’ आणि ‘फोर्ट’ अशा दोन ठळक खुणा मुंबईत आजही नांदतायत..!

पैकी ‘काळा घोडा’ भायखळ्याच्या राणीबागेत असलेल्या ‘भाऊ दाजी लाड’ म्युझियममध्ये वरच्या स्वारासकट विसावला आहे. त्याची स्टोरी व फोटो मी पुढच्या भागात सविस्तर देईन..या लेखाचा उद्देश मुंबईच्या ‘फोर्ट’ची कहाणी सांगणं हा आहे..!!

मुंबईचा फोर्ट एरीया हा प्रमुख्याने व्यापारी व कार्यालयीन परिसर आहे. निवासी मनुष्य वस्ती इथं अगदी तुरळकच सापडते. ब्रिटीशराज मध्येही हा ब्रिटीशाच्या व्यापाराचा महत्वाचा हिस्सा होता..फोर्ट म्हणजे किल्ला. जुने मुंबईकर फोर्टचा उल्लेख ‘कोट’ असा करायचे व ‘कोट’ या मराठी शब्दाचा अर्थही किल्ला असाच आहे (आठवा, गड-कोट).

Mumbai Fort 02तर या परिसराला ‘फोर्ट’ हे नांव पडण्यामागे या परिसरात इंग्रजांचा ‘किल्ला’ होता हे आहे.  मुळात हा किल्ला इंग्रजांचा नसून पोर्तुगीजांनी बांधलेला होता..पोर्तुगीज वनस्पती शास्त्रज्ञ ‘गोर्सिया दा ओर्ता’ हा मुंबई बेट लीजवर घेऊन अभ्यासासाठी इथं मुक्कामाला होता. स्वत:च्या निवासासाठी त्याने ‘मनोर हाऊस’ नांवाचे किल्लेवजा घर बांधले होते. या घराचं लोकेशन सध्याच्या एशियाटीक सोसायटीच्या मागं कुठतरी होतं…(मुळ ‘मनोर हाऊसचे’ दोन दरवाजे व त्यातील एक बुलंद इमारत अजुनही शाबूत असून ती नेव्हीच्या ताब्यात आहे.) हा परिसर सध्या नेव्हीच्या (आय.एन.एस. आंग्रे) ताब्यात असल्याने तिथं कोणाला जाताही येत नाही.

मुंबई ब्रिटीशांच्या ताब्यात आल्यावर या ‘मनोर हाऊस’चा ताबाही ब्रिटीशांकडे आला. ब्रिटीशांनी आपल्या व्यापारी पेढीचे सागरी शत्रूंपासून संरक्षण करणे या हेतूनं किल्ल्याचा उत्तर, दक्षिण व पश्चिम दिशेकडे विस्तार करून त्याला पक्के बुरूज व मजबूत तटबंदी केली..किल्याव्या तटबंदीला तीन मुख्य दरवाजे होते. उत्तरेस, सध्याच्या सीएसठी स्टेशनसमोरच्या दरवाजाला ‘बझार गेट’, उत्तरेला आताच्या काळाघोडा किंवा जहांगीर आर्ट गॅलरीच्या परिसरात असलेल्या गेटला ‘अपोलो गेट’ तर पश्चिम दिशेस ‘चर्च गेट’ अशी नांव दिली..’चर्चगेट’ हे सध्याचं जे फ्लोरा फाऊंटन आहे, बरोबर त्याच कारंजाच्या जागी होतं..पूर्वेस तर समुद्राचंच सानिध्य होतं..पूर्वेकडचा समुद्र आणि उर्वरीत बझारगेट, अपोलोगेट व चर्चगेट अशा चार दिशांच्या आतील भागाला ‘फोर्ट’ हे नांव मिळालं, ते आज किव्ल्ला अस्तित्वात नसला तरी चार-साडेचारशे वर्षांनंतरही कायम आहे व ‘फोर्ट’ नांवाने आळखला जाणारा भागही तोच आहे..इतिहासात या किल्ल्यावा ‘बाॅम्बे कॅसल’ असाही उल्लेख आहे.

किल्ल्याच्या तीन गेट्सपैकी ‘अपोलो गेट’ तर नांवासकट गायब झालं आहे तर ‘चर्च गेट’ व ‘बझार गेट’ नांवापुरतं का असेना, अस्तित्वात आहे..इंग्रजांचा ‘फोर्ट’ कधीचाच काळाच्या पडद्याआड गेला असला तरी या किल्ल्यावा नेपोलियनच्या हल्ल्याच्या भितीने सीएसटी स्टेशनच्या मागील बाजूस केलेल्या वाढीव तटबंदीचा भाग मात्र अजुनही बऱ्यापैकी शाबूत आहे. या वाढीव बांधकामाला ब्रिटीशांनी नांव दिलं ‘फोर्ट सेंट जाॅर्ज’..! सध्याचं सेंट जाॅर्ज हाॅस्पिटल याच्याच भागावर उभारून त्याला ‘सेंट जाॅर्ज’ असं नांव दिलंय ते त्यामुळेच..! (संदर्भ-स्थलकाल, अरुण टिकेकर)

सीएसटी स्टेशनच्या मागे असलेल्या ‘पी.डीमेलो’ मार्गाने (आताचा शहीद भगतसिंग रोड) जाताना, सेंट जाॅर्ज हास्पिटलचं या रस्त्यावरचं प्रवेशद्वार व सीएसटी स्टेशनचं नव्याने बांधलेलं मागील  प्रवेशद्वार यांच्या दरम्यान किल्ल्याचा हा भाग आहे. सेंट जाॅर्ज हाॅस्पिटलच्या आवारातूनही याच्याकडे जाता येतं..

Mumbai Fort 04किल्ल्याचा हा तटबंदीसहीतचा हा भाग मुळात दारूगोळ्याचं कोठार होतं..शहराच्या वाढत्या पसाऱ्याला मोकळीक मिळावी म्हणून तत्कालीन ब्रिटीश गव्हर्नर सर बार्टल फ्रिअर यांने वर उल्लेख केलेल्या तिन्ही ‘गेट्स’च्या दरम्यानची तटबंदी १८६० साली तोडून टाकली मात्र ‘फोर्ट सेंट जाॅर्ज’चं बांधकाम येवढ मजबूत होतं, की ते तुटता तुटेना व म्हणून ते तसंच ठेवलं गेलं व म्हणूनच ते आजही आपल्याला पाहाता येतं..अगदी रस्त्यावरून मशीद बंदरच्या दिशेने जातानाही किल्ल्याची भिंत सहज पाहता येते..या किल्ल्याच्या बुलंद भिंती, त्यात शत्रुवर दारुगोळा डागण्यासाठी ठेवलेल्या उभट, अरुंद फटी (गनस्लीट्स), किल्ल्याचं दणकट छत, आतील तीन-साडेतीन फुट रुंद भिंती पाहता येतात.

सध्या या ‘किल्ल्यात’ महाराष्ट्र शासनाच्या पुरातत्व खात्यातं आॅफिस असून तिथं श्री.बी.व्ही.कुलकर्णी नांवाचे इतिहासाविषयी आस्था व अभ्यास असणारे संचालक आहेत. मी त्यांना भेटल्यावर त्यांनी सर्व माहिती आनंदाने दिली व किल्ल्याचे फोटोही काढू दिले..त्यानी मुंबई व परिसरातल्या किल्ल्यांवर लिहीलेल्या पुस्तकाची झेराॅक्सही अगत्याने दिली..इतका सहृदय सरकारी अधिकारी असू शकतो हे त्यांना भेटून कळतं..

सोबत किल्ल्याचे मी काढलेले काही फोटो आपल्यासाठी पाठवत आहे परंतू प्रत्येकाने आपल्या इतिहासाचे ते अवशेष प्रत्यक्ष बघावेत व आपल्या इतिहासाची छोटीशी सफर करून यावी असं सुचवावंसं वाटतं..

— गणेश साळुंखे
09321811091

नितीन अनंत साळुंखे  उर्फ गणेश
About नितीन अनंत साळुंखे  उर्फ गणेश 377 Articles
श्री नितीन साळुंखे (मित्रपरिवारात गणेश या नावाने परिचित) हे मुळचे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभववाडी तालुक्यातील खांबाळे या गावचे. सध्या मुक्काम मुंबईत. वाचन, लेखनाची अत्यंत आवड. स्वत:चा ७०० हून जास्त पुस्तकांचा संग्रह. इतिहास, भाषा,शब्दांचा जन्म, देव, धर्म, संस्कृती, प्रथा, परंपरा यांचा अर्थ काय व त्या कशा अस्तित्वात आल्या याचा शोध घेण्याची विशेष आवड. लहानपणापासून संघ स्वयंसेवक व संघविचारांशी एकनिष्ठ. पुणे येथील संघप्रणित सर्वात मोठ्या अशा जनता सहकारी बॅंकेतील प्रदिर्घ नोकरीनंतर त्यांचे मित्र आणि आमदार प्रमोद जठार यांच्याबरोबर काम करण्यासाठी त्यांनी २००७ मध्ये नोकरी सोडली. त्याचबरोबर मित्राबरोबर मुंबईत बांधकाम व्यवसायात पदार्पण. २०-२२ वर्षांचा ज्योतिष शास्त्राचा अभ्यास असल्यामुळे परिचितांमध्ये एक उत्तम ज्योतिषी म्हणून ओळख. सर्व थरातील मित्र. त्यातही बहुतकरून लेखक, कविंचा, कलाकारांचा जास्त भरणा.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..