नवीन लेखन...

मृत्यु आणि स्वा. सावरकर

( स्वा. सावरकरांच्या आत्मार्पणदिनाच्या स्मृतीनिमित्तानें )

स्वातंत्र्यवीर सावरकार यांचा जीवनभर मृत्यूशी जवळचा संबंध होता, असें म्हणावयास कांहीं हरकत नाहीं. क्रांतीचा पथ म्हणजे मृत्यूच्या हातात हात घालून चालणेंच की. आणि , हा पथ त्यांनी विचारपूर्वक स्वीकारलेला होता. ‘की घेतलें व्रत न हें अम्हि अंधतेनें ………….. बुद्ध्याच वाण धरिलें करिं हें सतीचें’ यावरून त्यांचे सुस्पष्ट विचार आपल्याला कळतात. त्यांच्या जीवनातल्या सुरुवातीच्या काळात लिहिलेल्या आपल्या ‘हे स्वतंत्रते’ या स्फूर्तिप्रद कवितेत त्यांनी म्हटलेलें आहे – ‘तुजसाठि मरण तें जनन , तुजवीण जनन तें मरण’.  देशाच्या स्वातंत्र्याचा एवढा  ध्यास की त्यावरून निज-जीवन ओवाळुन टाकावें, अशी त्यांची वृत्ती व कृती होती.

लंडनमध्ये मदनलाल धींगराने इंग्रज ऑफिसर कर्झन वायली ( Curzon Wyllie) याचा जो वध केला, त्यामागे प्रेरणा सावरकरांचीच होती. तसेंच, त्यानी इंग्लंडमधून भारतात सशस्त्र  लढ्यासाठी शस्४ही धाडली होती. हे सारे मृत्यूशी संबंधित ‘खेळ’च . नंतर, अटकेत पडल्यावर, फ्रान्सच्या मार्सेली बंदरात जहाजातून ते पळून गेले, तेव्हां त्यांच्यावर जर गोळीबार झाला असता , तर त्यात मृत्यु पावण्याची शक्यता होतीच, आणि सावरकरांनी पलायनापूर्वी ती नक्कीच विचारात घेतली असणार.

अंदमानला काळ्या पाण्याची शिक्षा  इतकी कडक होती, की तें जीवन असह्य होऊन कांहीं कैद्यांनी आत्महत्याही केली . त्या काळाबद्दल सावरकरांनी स्वत:च लिहून ठेवलें आहे की, त्या काळात, विशेष करून जेव्हां त्यांची प्रकृती प्रचंड खालावलेली होती, त्यावेळीं त्यांना स्वत:ला, या मार्गाचा अवलंब आपणही करावा असें वाटलें होतें. ध्यानात घ्या, सर्व परिस्थिती प्रतिकूल असतांना, एकट्यानें तिला तोंड देतांना, (No support-system) ,  अशा या ग्रासलेल्या नकारात्मक मन:स्थितीतून बाहेर येणें किती कठीण असेल ! त्याची कल्पनाही करणें कठीण आहे. पण, त्यातूनही सावरकर निग्रहानें सावरले, मृत्यूचें दार न ठोठावतांच त्याच्या संभाव्य मिठीतून बाहेर पडले. खरं सांगायचं तर, त्या वेळी अंदमानातील क्रातिकारकांना मृत्यु म्हणजे ‘साल्व्हेशन’च ( मुक्ती ) वाटत होतें. पण हा ‘निगेटिव्ह’ विचार झाला. त्या salvation च्या , मुक्तीच्या, आकर्षणापासून बाहेर येणें सोपें नव्हे. पण सावकरांनी दुर्दम्य इच्छाशक्तीनें  तें  साधलें. कारण, आपण जीवित राहून देशासाठी योगदान देऊं शकूं ही त्यांची खात्री . देशासाठी मृत्यूशी  जवळीक बाळगणें हा एक संबंध झाला ; आणि नकारात्मकरीत्या त्याला भेटणें, म्हणजे कर्तव्यच्युत होणें, हा अगदी वेगळा संबंध झाला. तसल्या संबंधाला सावरकर बळी पडले नाहींत.  मृत्यूची भीती त्यांनी conquer केलेली होती, तिला पूर्णपणें कह्यात आणलें होतें.

अगदी देशाच्या स्वातंत्र्यानंतरही, आपल्याच सरकारनें  त्यांना महात्मा गांधीच्या खुनाच्या खटल्यात गोवलें  , तेव्हां त्या महापुरुषाला काय वाटलें असेल ? ‘ याचसाठी केला सारा अट्टाहास ?’ असा प्रश्न नक्कीच त्यांच्या मनात आला असेल. जी माणसें  दोषी  ठरलीं,  त्यापैकी दोघांना मृत्युदंड झाला , हें आपल्याला माहीतच आहे. ज़रा कल्पना करा, दोषी नसतांनाही जर सावरकरांना दोषी ठरविलें गेलें असतें, तर काय भयंकर प्रकार झाला असता !! कल्पनेनेही अंगावर शहारे येतात ! अनेकानेक महापुरुषांना , त्यांचा दोष नसतांनाही मृत्यू स्वीकारावा लागला आहे. येशू ख्रिस्त हें एक उदाहरण. पण येशू मृत्यूला घाबरला नाहीं .  गांधी खून खटल्यात तर नथूराम व आपटेही घाबरले नाहींत,  (टीप – ध्यानीं घ्या, इथें त्यांच्या कृत्याचें ग्लोरिफिकेशन करण्याचा यत्किंचितही हेतू नाही; आपण केवळ  मृत्यूवर चर्चा करत आहोत ), तिथें  सावरकरांसारखा नरसिंह घाबरणें शक्यच नव्हतें. निग्रहानें त्यांनी स्वत:चा बचाव कोर्टात केला , सत्य त्यांच्या बाजूनें होते, व ते सुटले , पण मृत्यूच्या दाराचें पुन्हां एकवार दर्शन घेऊनच !

१९४५ सालीं स्वातंत्र्यवीरांचे ज्येष्ठ बंधू बाबाराव सांगलीला मृत्युशय्येवर होते. तेही क्रांतिकारक होते, त्यांनीही अंदमानला काळ्या पाण्याची शिक्षा भोगलेली होती.  त्यांना लिहिलेल्या पत्रात स्वातंत्र्यवीर म्हणतात की आपल्याला  तर लहानपणापासूनच मृत्यूची सोबत आहे.आतां शांतपणें त्याला सामोरें जावें. यावरून त्यांचा मृत्यूविषयींचा दृष्टिकोन आपल्याला कळतो. .

कांहीं काळ आधी, याच विषयावर स्वातंत्र्यवीर काय म्हणाले, हें पाहणेंही उपयुक्त ठरेल. त्या वेळीं ,    वा. वि. जोशी यांनी, ज्ञानेश्वरांच्या संजीवन समाधी बद्दल चर्चा करून, ‘ज्ञानदेवांनी आत्महत्या केली’ असा निष्कर्ष काढला होता. त्यानंतर, ‘ज्ञानदेवांच्या संजीवन समाधीला आत्मार्पण म्हणावें की आत्महत्या ?’ असा प्रश्न उपस्थित करून स्वातंत्र्यवीरांनी समर्पक विष्लेषण केलें होतें –  ” जें जीवनांत संपायचें होतें तें संपलेलें आहे , आतां कर्तव्य असें उरलेलें नाहीं , अशा कृतकृत्य भावनेनें ‘पूर्णकाम’ झालेले धन्य पुरुष आपण होऊन प्राण विसर्जित करतात. तें कृत्य ‘उत्तान अर्थीं बळानें जीव देणें ’ असूनही, त्याला आत्मसमर्पण म्हणून जें गौरविलें जातें, तें यथार्थ असतें.” यातून सावरकरांचें मृत्युविषयक तत्वज्ञान दिसून येतें.

हिंदूंमधील ‘प्रायोपवेशन’ तसेंच जैनांमधील ‘संथारा’ या प्रकारच्या मृत्युभेटीला सन्मान मिळतो  , तें आदराला पात्र ठरतें . ( टीप- इथें धर्माचा उल्लेख हा केवळ वर उल्लेखलेल्या प्रथांबद्दल आहे ; प्रस्तुत लेखाचा धर्माशी प्रत्यक्षाप्रत्यक्ष कांहीं संबंध नाहीं ).  त्या आदराचें कारण सावरकारांच्या वरील विवेचनातून स्पष्ट होतें.

जेव्हां स्वातंत्र्यासाठी क्रांतीलढा सुरूं केला तेव्हां , ‘आपल्याला भारत स्वतंत्र झाल्याचें पहायला मिळेल’ अशी सावरकरांना अजिबात कल्पना नव्हती. देश स्वतंत्र झाल्यावर  तसें त्यांनी स्वत: म्हटलेलेंही आहे. नंतरही, स्वत:च्याअधिक्षेपाचा विचार त्यांनी दूर ठेवला ; देश स्वतंत्र होण्याचें त्यांना समाधान होतें , आणि त्यामुळे त्यांना कृतकृत्य वाटलें असल्यास त्यात नवल नाहीं. गांधी खुनाचें किटाळ दूर झाल्यावर, सावरकरांनी स्वत:च्या गतकाळाविषयीं लेखन करून आपल्या सर्वासाठी अमूल्य ठेवा ठेवला. मृत्यूच्या दोनएकवर्षें आधी  त्यांनी ‘भारताच्या इतिहासाची सहा सोनेरी पानें’ हा विचारप्रवर्तक ग्रंथ लिहिला . (टीप – आपण त्या ग्रंथातील विचारांच्या योग्यायोग्यतेची इथें चर्चा करत नाहीं आहोत. मात्र ग्रंथ विचारप्रवर्तक आहे, याबद्दल संशय नाहीं  ).

हें सर्व साध्य झाल्यानंतर, जीवनसाफल्य प्राप्त झालें असें  वाटून, त्यांनी प्रायोपवेशन करण्यांचे ठरविले. मंडळी, विचार करा, आपणां सार्‍यांना भूक-तहान काटणें थोड्या वेळानंतर कठीण होऊन जातें. एक वेळ माणूस अन्नावाचून कांहीं काळ काढूं शकेल ; परंतु  पाणी हें तर जीवन आहे, त्याच्यावाचून रहाणें किती कष्टप्रद !  तिथें दिवसेन् दिवस अन्नपाण्यावाचून काढणें यासाठी किती जबरदस्त मनोनिग्रह लागत असेल , याची कल्पनासुद्धां करणें कठीण आहे.

प्रायोपवेशनानें सावरकरांनी स्व-देहाचें ‘विसर्जन’ केलें. पण मृत्यूला कसें सामोरें जावें, याचा एक महान वस्तुपाठ ते आपल्यासाठी ठेवून गेले.

 

अशा वेळीं समर्थ रामदासांच्या वचनाची आठवण येते –   ‘महाथोर ते मृत्युपंथेंचि गेले ; कितीएक ते जन्मले आणि मेले’.   मरणें आणि ‘मृत्युपंथानें जाणें’ यांतील भेद,  जो रामदासांनी संगितला आहे, तो सावरकरांच्या कृतीतून आपल्यापुढे एक आदर्श म्हणून नेहमीच उभा राहील.

– – –

– सुभाष स. नाईक

मुंबई.

M- 9869002126

Email : vistainfin@yahoo.co.in

Website  :  www.subhashsnaik.com  ;  www.snehalaatnaik.com

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

सुभाष नाईक
About सुभाष नाईक 297 Articles
४४ वर्षांहून अधिक अनुभव असलेले सीनियर-कॉर्पोरेट-मॅनेजर (आतां रिटायर्ड). गेली बरीच वर्षें हिंदी/हिंदुस्थानी, मराठी व इंग्रजी या भाषांमध्ये गद्य-पद्य लिखाण करत आहेत. त्यांची ९ पुस्तकें प्रसिद्ध झाली आहेत. पैकी ६ ‘पर्यावरण व प्रदूषण’ या विषयावरील इंग्रजी न हिंदी कवितांची पुस्तकें आहेत. दोन पुस्तकें , ‘रामरक्षा’ व ‘गणपति-अथर्वशीर्ष’ या संस्कृत स्तोत्रांची मराठी पद्यभाषांतरें आहेत. अन्य एक पुस्तक ‘मृत्यू आणि गत-सुहृद ’ हा विषयाशी संल्लग्न बहुभाषिक काव्याचें आहे. गदिमा यांच्या ‘गीत रामायणा’चें हिंदीत भाषांतर. बच्चन यांच्या ‘मधुशालचें मराठीत भाषांतर केलेलें आहे व तें नियतकालिकात सीरियलाइझ झालेलं आहे. टीव्ही वर एका हिंदी सिट-कॉम चें स्क्रिप्ट व अन्य एका हिंदी सीरियलमधील गीतें व काव्य लिहिलेलें आहे. कत्थक च्या एका कार्यक्रमासाठी निवेदनाचें हिंदी स्किप्ट लिहिलें आहे. अनेक मराठी व हिंदी पब्लिकेशब्समध्ये गद्य-पद्य लेखन प्रसिद्ध झालें आहे, जसें की, महाराष्ट्र टाइम्स, लोकसत्ता, सत्यकथा, स्वराज्य, केसरी, नवल, धर्मभास्कर, धर्मयुग, धर्मभास्कर, साहित्य अकादेमी चें हिंदी जर्नल ‘समकालीन भारतीत साहित्य’ , मराठी अकादेमी बडोदा चॅप्टर चें मराठी जर्नल ‘संवाद’, तसेंच प्रोफेशनल सोसायटीचें इंग्रजी जर्नल यांत लेखन प्रसिद्ध झालेलें आहे.मराठी , हिंदी व इंग्लिश वेबसाईटस् वर नियमित गद्य-पद्य लेखन. कांहीं ई-बुक सुद्धा प्रसिद्ध.
Contact: Website

महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..