नवीन लेखन...

रहे ना रहे हम : रोशन

रेडिओ सिलोन, विविध भारती व ऑल इंडिया रेडिओ या आकाशवाणी केंद्रानी आपल्या देशातील संगीताची विशेषत: चित्रपट संगीताची जेवढी भूक भागवली असेल तेवढी आजतागयत कोणत्याही रेडिओ केंद्राने भागवली असेल असे मला तरी वाटत नाही. एक संपूर्ण पिढी या संगीतावर पोसलेली आढळून येईल. मी तर धाडसाने असे म्हणेन की या संगीताने आमच्या काळातील पिढीला कधीही आत्महत्येचा विचार मनात येऊ दिला नाही. मन,मेंदू व हृदयावरील सर्व ताण दूर सारण्याची क्षमता या संगीतात होती व आहे. भारतीय संगीत, मग ते लोकसंगीत असो की शास्त्रीय संगीत असो की नाट्य वा चित्रपट संगीत आमची खूप मोठी मानसिक भूक आहे ही !!!! आता तर संगीत ग्लोबल झालेय, जगातील सर्व संगीताचा खजिना स्टिव्ह जॉब्ज नावाच्या अवलियाने आमच्या थेट घरी हातात दिला आहे. यातुन किती मोत्याचे दाणे वेचता येतील तेवढे वेचत रहा..असो….

आताचे मला माहित नाही पण ५० ते ७० च्या दशकात मी सकाळी ७ ते ८ या वेळात न चूकता रेडिओ सिलोन एकत असे. सर्व जुनी गाणी आणि शेवटी के.एल. सैगलचे गाणे. सैगलचे गाणे लागले म्हणजे शंभर टक्के आठ वाजले….घडी बघायची गरज नाही. याच स्टेशनवर आठवड्यातून एक दिवस कव्वालीचां कार्यक्रम असे. आणि हा कार्यक्रम सुरू होण्यापूर्वी एक धून वाजविली जाई. हा वाद्यमेळ इतका अप्रतिम की कानात दिवसभर रूंजी घालत असे. शालेय जीवनात जुने चित्रपट बघण्याच्या व्यसनाने माझा इतका ताबा घेतला आहे की आजतागायत मला दुसरे व्यसन लागलेच नाही. माझ्या शहरात मार्निंग वा मॅटनी शो मध्ये जुने चित्रपट दाखवले जात शिवाय या शोचा तिकीट दरही कमी असे. जुन्या चित्रपटाचे व्यसन लागण्याचे खरे कारण त्यातील गाणी हेच होते. अनेकदा चित्रपट खूपच भिकार असे पण गाणे सर्व पैसे वसूल करून देत. तर एकदा ‘बरसात की रात’ हा सिनेमा मॅटनीत लागला आणि मी “श्याम टॉकीज” कडे धूम पळालो. पाण्याच्या टाकी सारखीच सिनेमाची टाकी असते असा पूर्वी माझा समज होता. पण टॉकीज या शब्दाचा खरा अर्थ खूपच उशीरा समजला. मूळ इंग्रजी शब्द Talkie म्हणजे बोलणारा असा आहे. म्हणजे चित्रपट ज्या दिवशी पासून बोलू लागले तेव्हा पासून ते बोलपट झाले. ज्या हॉल मध्ये असे चित्रपट दाखवतात त्याला टॉकीज म्हणायचे.

तर या चित्रपटाच्या क्लायमॅक्स मध्ये दोन कव्वालांच्या कव्वालीची स्पर्धा असते. ही कव्वाली सुरू होण्यापूर्वी एक सुंदर धून सुरू होते….धून ऐकली आणि मला अफाट आनंद झाला…..का? तर रेडिओवर जी धून कव्वाली कार्यक्रमाच्या आगोदर मी ऐकत असे ती समोरच्या चित्रपटात वाजत होती. यातील केवळ या एका कव्वालीने हा चित्रपट अजरामर झाला. चित्रपटात इतक्या दीर्घ लांबीची ही पहिलीच कव्वाली होती. “ना तो काँरवा की तलाश है”…….साहिरची गीत रचना तर मन्नाडे, रफी, आशा भोसले, कमल बारोट, सुधा मल्होत्रा,एस.डी.बातीश, बंदे हसन असे जादूई आवाज या कव्वालीत होते. चित्रपट संगीतातील मैलाचा दगड म्हणून आजही ही कव्वाली ओळखली जाते. या चित्रपटाच्या संगीताने ज्या संगीतकाराने आपले स्थान भक्कम केले ते म्हणजे रोशनलाल नागरथ अर्थात संगीतकार रोशन…..कव्वालीचे बादशहा म्हणून ते आजही ओळखले जातात. रोशन म्हणजे चमचमणारा….आपल्या संगीतमय तेजाने रोशनने अख्खी चित्रपटसृष्टी प्रकाशमय केली.

१४ जुलै १९१७ हा त्यांचा जन्म दिवस… पंजाबातील गुजरनवाला गावातला जे आता पाकिस्तान मध्ये आहे. लहान वयातच रोशनजीने संगीत साधना सुरू केली होती. नंतर पूढच्या संगीत शिक्षणासाठी ते लखनौला आले. येथील आताचे पं. भातखंडे म्युझिक इनस्टिट्यूट जे पूर्वी मॅरीस कॉलेज होते त्याचे प्राचार्य पं. एस.एन. रतनजनकर होते जे रोशनचे पहिले संगीत गुरू. रोशन यांचे आवडते वाद्य म्हणजे ऐसराज किंवा दिलरूबा….अतिशय सुंदर वाजवायचे. या वाद्याच्या बळावरच १९४० च्या सुरूवातीला ऑल इंडिया रेडिओ दिल्लीचे कायर्क्रम निर्माते ख्वाजा खुर्शीद अन्वर यांनी सर्वप्रथम रोशन यांना स्टाफ आर्टीस्टची नोकरी दिली. प्रतिभावान कलावंताना त्यांच्यातील प्रतिभा एका जागी कधीच स्वस्थ बसू देत नाही. ते नेहमीच मोठी स्वप्ने पाहात असतात. मुंबई ही तर अशा सर्व स्वप्ने बघणाऱ्या कलावंताचे माहेरघरच !!!!! ख्वाजा खुर्शीद अन्वर आणि रोशन मग १९४८ मध्ये मुंबईला आले. वर्षभरांच्या प्रयत्ना नंतर किदार शर्मा यांनी रोशन यांना पहिला चित्रपट दिला “नेकी और बदी” किदार शर्मा त्यावेळी चित्रपटसृष्टीतले नावाजलेले दिग्दर्शक होते. त्यांच्या “निल कमल” या चित्रपटात राज कपूर यांना नायकाची पहिली संधी देखील त्यांनीच दिली. याच चित्रपटात अवघी १४ वर्षांची मधूबाला नायिकेच्या भूमिकेत होती. रोशनचा “नेकी और बदी” हा पहिला चित्रपट फ्लाप झाला. मग ते संगीत वादकाच्या भूमिकेतच संधीची वाट बघत राहिले. ही ‘संधी’ म्हणजे एक अजब रसायन असतं. ती प्रत्येकाच्या आयुष्यात एकदा तरी येऊन आवाज देते पण खूपच हळू आवाजात. तो आवाज ज्याला ऐकता येतो तो त्या संधीचं सोनं करतो. रोशनजीला पूढच्याच वर्षी ही संधी आवाज देणार होती.

१९५० मध्ये किदार शर्मा यांनी पून्हा रोशन यानां संधी दिली. पहिल्या चित्रपटात फारशी कामगिरी पार न पाडलेले रोशन यानां पुन्हा संधी दिली गेली कारण त्यांच्यातल्या प्रतिभेवर किदार शर्मा यांचा पूर्ण विश्वास होता. मोठ्या मनांची माणसे होती….चित्रपट होता “बावरे नैन” या चित्रपटाने मात्र रोशनजीचा संगीत सितारा चमकू लागला. या चित्रपटातले दरबारी कानडा रागात बांधलेले “तेरे दुनिया मे दिल लगता नही” हे मुकेशचे गाणे अफाट लोकप्रिय झाले. या गाण्याने मुकेशही गायक म्हणून सर्वत्र पोहचला तर राज कपूरचे नावही दुमदुमले. यातील तलत मेहमूदचे “खयालो मे किसी के..” हे गाणे पण तुफान लोकप्रिय झाले. ‘बडे आरमान से रखा है बलम’ हे “मल्हार” चित्रपटातले गाणेही धूम करून गेले., याच काळातील “नौबहार” चित्रपटातील ‘येरी मै तो प्रेम दिवानी मेरा दर्द ना जाने कोए’ या लताजीच्या गाण्याने रोशन क्लसिकल गाणे अत्यंत ताकदीने तयार करू शकतात यावरही शिक्कामोर्तब् झाले. एखादा कलावंत त्याच्या कला कतृत्वाने भले कितीही मोठा असू दे पण व्यक्तीगत माणूस म्हणून त्याच्यातील गूण समोर येऊ लागले की त्याची उंची अधिक मोठी होऊ लागते. त्या काळातील बहुतांशी कलावंतात हा गूण आढळत असे. म्हणून इतर नवख्या कलावंतानां ते आग्रहाने संधी देत. इंदीवर आणि आनंद बक्षी या दोन तरूणांना रोशनजीने प्रथम संधी दिली जे नंतर या चित्रपटसृष्टीतले नामवंत गीतकार झाले. १९५९ मध्ये आनंद बक्षीनां रोशनजीने पहिली संधी दिली तो चित्रपट होता “सीआयडी गर्ल” पण तो फारसा लक्षात घेण्याजोगा नव्हता मात्र या दोघांचा १९६६ मधला “देवर” हिट झाला.

१९६०चे दशक मात्र रोशनजीने आपल्या कर्णमधूर संगीताने गाजवून सोडले. या काळातील त्यांचे प्रत्येक गाणे म्हणजे रत्नजडीत हारातील एकेक रत्नच होते…………निगाहे मिलाने को जी चाहता है (दिलही तो है), दुनिया करे सवाल तो हम (बहू बेगम), मन रे तू काहे ना धीर धरे (चित्रलेखा),पाँव छु लेने दो फुलोंके व जो वादा किया है (ताज महल), दिल जो न कह सका (भिगी रात), एरी आली पिया बिन (रागरंग), सारी सारी रात तेरी याद सताए (अजिबस शुक्रिया), लागा चुनरीमे दाग (दिलही तो है), रहे ना रहे हम महका करेंगे (ममता), स्वप्न झरे शूल से…काँरवा निकल गया गुबार देखते रहे (नयी उमर की नयी फसल), रहते थे कभी जिनके दिलमे (ममता), आप ने याद दिलाया तो मुझे याद आया (आरती), संसारसे भागे फिरते हो (चित्रलेखा), बहुत दिया देनेवाले ने तुझको आँचल ही न समाए तो क्या कीजे (सुरत और सिरत), छुपा लो यूँ दिल मे प्यार मेरा(ममता), फूल गेंदवा ना मारो सखी(दूज का चाँद), शराबी शराबी ये सावन का मौसम(नूर जहाँ), जिंदगी भर नही भूलेगी वह बरसात की रात(बरसात की रात),जो बात तुझमे है वो तस्वीर मे नही(ताज महल),हम इंतजार करेंगे कयामत तक(बहू बेगम), मिले ना फूल तो काँटो से, ओह रे ताल मिले नदी के जलमे(अनोखी रात),ऐ माँ तेरी सुरतसे अलग भगवान की सुरत क्या होगी(दादी माँ), बहारो ने मेरा चमन लूट कर (देवर)…………..ही यादी खूप मोठी आहे.

रोशनजीचे सर्वात मोठे वैशिष्ठ्य म्हणजे वाद्यांचा कमी पण अत्यंत चपखल वापर. शंकर-जयकिशन वा लक्ष्मीकांत-प्यारेलाला सारखे ग्रेंजर त्यांच्या संगीतात नसे पण दोन अंतऱ्याच्या मधली जागा जी वाद्ये भरून काढत ती लाजबाब असत. त्यांनी लावलेल्या चाली इतक्या सुंदर असत की गायकांची संपूर्ण प्रतिभा पणाला लागत असे. ना तो कारवाँ की तलाश है… ही खूप मोठी कव्वाली. या कव्वालीत दोन भाग आहेत. रेडिओत कधी पहिला तर कधी दुसरा असे आलटून पालटून लावले जाई. दुसऱ्या भागापूर्वी (ये इश्क इश्क है इश्क….)रफीची एक अत्यंत सुरेल अप्रतिम तान आहे..तर शेवटी “ खाक को बुत और बुत को देवता करता है इश्क, इंतिहा ये है के बन्दे को खुदा करता है इश्क” या ओळी गातानां रफी इतका उंच पोहचतो की त्याला तोड नाही. साहिरने तर अख्ख्या प्रेमाचा इतिहासच यात रेखाटलाय. मात्र मला सगळ्यात मोठे आश्चर्य आणि वेदना आहे ती याची की या माणसाला जवळपास २० वर्षे हृदयाचा अत्यंत गंभीर त्रास होता आणि तरीही हा माणूस काळजात झिरपणारी गाणी तयार करत होता.!!!! हे बळ कुठून मिळते? संगीत ज्याचा श्वास असतो तोच हे करू जाणे. या हृदयाच्या आजाराने वयाच्या अवघ्या ५० व्या वर्षी रोशनवर अशी झडप घातली की गाणे समेवर येण्या आगोदरच संपविले.
नवीन पिढी रोशनजी ना ओळखते ती राकेश रोशन व राजेश रोशन यांचे वडील आणि ऋतिक रोशन यांचे आजोबा म्हणून. नातवाला आजही रोशन या नावाची किती निकड आहे हे रोशनजीच्या कतृत्वा वरून दिसून येते. १९६८ सालाची गोष्ट आहे जेव्हा रोशन “अनोखी रात” या चित्रपटाचे संगीत तयार करीत होते. सर्व गाणी रेकॉर्ड झाली होती पण एक गाणे रेकॉर्ड व्हायचे बाकी होते. चाल तयार होती पण गाणे रेकॉर्ड होण्यापूर्वीच रोशन गेले. शेवटी त्यांच्या पत्नीने ही जबाबदारी स्वत:कडे घेतली. गायीका लताजीसह चित्रपटसृष्टीतले त्या काळचे असंख्य दिग्गज संगीतकार पण स्टुडिओत हजर झाले. लताजी माईक समोर उभ्या राहिल्या. डोळ्यात अश्रू, चेहऱ्यावर वेदना…… गाण्याची रेकॉर्डिंग सुरू झाली. गाणे संपले तेव्हा प्रत्येकाच्या डोळ्यांच्या कडा ओलसर झालेल्या. तिथे हजर असणाऱ्या प्रत्येकाच्या डोळ्यात या महान संगीतकारा बद्दलचे भाव स्पष्ट दिसत होते…..आजही तुम्ही जर “खुशी-खुशी कर दो विदा, तुम्हारी बेटी राज करेगी… “ हे गाणे ऐकाल तर मी खात्रीने सांगतो की तुमच्याही डोळ्यात तेच भाव असतील जे ४९ वर्षापूर्वी स्टुडिओत हजर असलेल्या सर्वांच्या डोळ्यात होते.

दासू भगत (१४ जुलै २०१७)

Avatar
About दासू भगत 34 Articles
मी मुळ नांदेड या श्हराचा असून सध्या औरंगाबादला स्थयिक आहे. मुंबईतील सर जे.जे. इन्स्टीट्यूट ऑफ अप्लाईड आर्ट येथून उपयोजित कलेतील डिप्लोमा. चित्रपट हे माझ्या आवडीचा विषय. काही काळ चित्रपटासाठी टायटल्स, कला दिग्दर्शन म्हणून काही चित्रपट केले आहेत. ….सध्या औरंगाबाद येथे दिव्य मराठी या दैनिकात मुलांसाठीच्या पानाचे संपादन करतो..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..