नवीन लेखन...

कीर्तनाची प्लास्टिक सर्जरी

मला काही वेळा कीर्तनाला तबल्याची साथ करायला जाण्याचा योग येतो. कीर्तनात तबला वाजवणाऱ्या साथीदाराला साधारण संपूर्ण कीर्तनाच्या तीस ते चाळीस टक्के इतक्याच वेळेचं काम असतं. हार्मोनियमच्या साथीदाराला मात्र त्या मानाने खूप सतर्क राहावं लागतं. कारण एक तर कीर्तनकाराला सतत षड्ज किंवा मध्यमाचा सूर देत राहावा लागतो. आणि साकी, दिंडी, आर्या, ओव्या, अभंग, श्लोक, कटाव अशा एक नाही अनेक गोष्टी कधी सुरु होतील याचा अंदाज घेऊन लगेच साथ पुरवावी लागते. त्यात काही कीर्तनकारांना आयत्यावेळी विसरलेल्या चाली लक्षात आणून देणे हाही जोडधंदा हार्मोनियम साथीदाराला कधी कधी करायला लागतो. त्यामानाने तबलेवाला सुखात असतो. एकदा सुरवातीचा नामस्मरण, गजर, पूर्वपद्य इत्यादी ठराविक तालामधील गोष्टी वाजवून झाल्या की पुढचं एखादं तबल्याची साथ असणारं पद येईपर्यंत तसा आराम असतो. बरं पदाची एखादी ओळ झाल्यावर दुसऱ्या ओळीपासून तबला वाजवायचा असल्यामुळे तितकी मिळालेली पूर्वसूचना तबलजीला जागृतावस्थेत यायला पुरेशी असते. सूर चुकला तर हार्मोनियमवाल्याला जबाबदार धरतात पण ताल चुकला तर कीर्तनकाराचीच तयारी कमी झाली आहे असा सर्वसामान्य समज असतो. त्यामुळे तसा तबलेवाला सुरक्षित असतो. सांगण्याचं तात्पर्य की तबला वाजवणाऱ्याला कीर्तनात खूप रिकामा वेळ मिळतो.

मी जेव्हा जेव्हा कीर्तनाला तबला वाजवतो त्यावेळी हा वेळ मी “माणसांना वाचणे” या माझ्या छंदात घालवतो. आजूबाजूचा परिसर, उत्सवाचे संयोजक, जमलेले भाविक अशा सगळ्या चालत्या बोलत्या पुस्तकांना वाचायचा मी खूप आनंद घेतो. त्या वेळी माझ्या निरीक्षणात माझ्या काही गोष्टी लक्षात आल्या त्यातली एक खूप महत्वाची गोष्ट म्हणजे साधारणपणे कीर्तन प्रवचनाला जमलेल्या लोकांचं सरासरी वय हे सिनिअर सिटीझन वयाच्या पुढचं म्हणजे साधारण साठीच्या पुढचं असतं. या वयात कीर्तन ऐकणे हे तब्येतीला आणि वयालाही शोभेसं असल्यामुळे कीर्तनाला गेलेलं दिसणं हे बऱ्याच जणांना महत्वाचं असतं. कीर्तनाला आल्यामुळे सोसायटीत थोडी सामाजिक आणि अध्यात्मिक पत वाढते हे हळू हळू त्यांना लक्षात आलेलं असतं. बरेचसे पुरुष घरात करायला काही नसतं म्हणून थोड्या घरच्या वातावरणापासून हवापालट म्हणून आलेले असतात. काही जण, तरुण उत्साही संयोजक कार्यकारी मंडळाच्या तरुण रक्ताला, मार्गदर्शन देण्याच्या उद्देशाने आलेले असतात. काही विरंगुळयाबरोबर पुण्य ‘फ्री’ मिळत असल्यामुळे येतात. काही जण कीर्तन प्रवचनात हमखास येणाऱ्या छान डुलक्याही काढून घेतात. त्यामानाने सिनियर सिटीझन स्त्रियांची संख्या कमी असते कारण त्यांचा संसाराचा मोह किंवा जबाबदाऱ्या म्हणू हवं तर, सिनिअर सिटीझन होऊनसुद्धा सुटलेल्या नसतात. एखाद्या नवऱ्याने आपल्या सिनिअर सिटीझन बायकोला विचारलच चुकून कधी की “कीर्तनाला येतेस का? ” तर “मला खूप कामं पडल्येत. तुम्ही जा, तसंही तुम्हाला रिकामा वेळ कसा काढायचा या प्रश्नच आहे. जा जाऊन या, मलाही जरा शांती” असा त्या पत्नीचा सल्ला असेल आणि साधारण असेच काहीसे सुसंवाद नक्कीच घडत असणार असा माझा कयास आहे. “आणि जे ऐकता ते आचरणात दिसू दे थोडं” अशी खोडसाळ टीपही जोडली गेलेली जाता जाता कानी येते नवरोबांच्या. ज्या काही थोड्या जमलेल्या स्त्रिया असतात त्यांना सुद्धा घरून सक्तीची निवृत्ती मिळालेली असते म्हणून त्या येतात अशी माझी कल्पना आहे. एकंदरीत कीर्तन प्रवचनाला सगळा सिनिअर सिटीझन क्लब जमलेला असतो. साधारणपणे शंभरातील नव्वद कीर्तन प्रवचनात हाच माहोल असतो. कधी कधी या वातावरणात राहून राहून देव सुद्धा रिटायर होऊन सिनिअर सिटीझन क्लब मध्ये सभासदत्व घेण्याचा विचार करू लागेल असा एक गमतीशीर विचार मनाला चाटूनही गेला माझ्या.

गमतीचा भाग सोडून द्या. पण कथा, कीर्तन प्रवचनातच नाही तर एकंदरीत घराघरात, समाजात अध्यात्म हे रिटायर झाल्यावर करायची गोष्ट आहे असंच मानलं जातं. “करून करून भागला आणि देवपूजेला लागला” हीच परिस्थिती कमी अधिक फरकाने प्रत्येक माणसाच्या बाबतीत घडलेली दिसते.

भगवदगीतेचा अभ्यास , अष्टांग योगाचा अभ्यास, जपजाप्य, नामस्मरण सर्व गोष्टी बाकी काहीच करता येईनासं झालं कि करायच्या गोष्टी आहेत असाच समज सर्वत्र दिसतो. का असेल असं? याचा जेव्हा खोलवर विचार करू लागलो तेव्हा लक्षात आलेल्या गोष्टी अशा;

१. भागवदगीतेची शिकवण, अष्टांग योगाची सूत्र, त्याचा जन्मापासून मनुष्यजीवनाशी असणारा संबंध आणि त्याची उत्तम आयुष्य जगण्यासाठी असणारी आवश्यकता आणि उपयुक्तता सांगितलीच जात नाही लहान वयात.

आणि आता एका पिढीचं या संदर्भातील अज्ञान तसंच पुढच्या पिढ्यात संक्रमित होतंय.

जी अध्यात्माची शिकवण कथा, कीर्तनातून ( काही सन्माननीय अपवाद वगळता) तशीच पंतोजींच्या शैलीत आणि बनलेली आहे. अध्यात्मातील प्रवृत्तीवाद आणि कर्मयोग, ज्ञानयोग, भक्तीयोग आणि राजयोग हे योगचतुष्टय आणि त्यांचा मानवी जीवनाशी जन्मापासूनच असणारा घनिष्ट संबंध लहान संकसंरक्षम मुलांना त्यांना समजेल अशा भाषेत समाजवलाच जात नाहीये. अध्यात्म म्हणजे रसहीन निष्क्रिय कृती आहे असाच ठसा लहान आणि तरुणांवर उमटतो आहे.

२. अर्थशास्त्राच्या दृष्टीने आणि औद्योगिक क्रांतीला पूरक म्हणून केवळ भौतिक कारणांसाठी इंग्रजांच्या वेळेपासून हळू हळू चंचुप्रवेश करून रूढ झालेली शिक्षणपद्धती आणि आता शिक्षण या नावाखाली निर्माण होत असलेला नोकरवर्ग आणि नोकरीतून पैसे मिळवणारी मशिन्स तयार करणारी शिक्षणाची कारखानदारी सध्या सर्वत्र सुरू आहे., त्याच शिक्षणपद्धतीमुळे व्यक्तिस्वातंत्र्याचा आणि आत्मकेंद्रित जीवनशैलीचा एक स्वाभाविक परिणाम म्हणून तरुणाईत वाढीस लागलेला अहंकार दिसू लागला आहे.भारतीय तरुणाईची पाश्चात्य जीवनशैलीबद्दलची आवड, शास्त्रशुद्ध पद्धतीने प्रसार माध्यमांना हाताशी धरून चाललेली तरुणांची दिशाभूल आणि एकंदरीतच समाजातील विचित्र परिस्थितीमुळे अध्यात्म म्हणजे काहीतरी रिकामटेकडा बोअर प्रकार आहे असा तरुणाईचा होत असलेला समज हेही कारण आहे.

३. माझ्या दृष्टीने अतिशय महत्वाचा मुद्दा म्हणजे कथा, कीर्तन, प्रवचन यांचं एकाच पद्धतीने पिढ्यानुपिढ्या चालत आलेलं आउट डेटेड (कालबाह्य) स्वरूप. काळ झपाट्याने बदलतो आहे. विज्ञान अद्भुत वाटाव्या अश्या गोष्टी सर्वसामान्यांच्या हातात आणून ठेवत आहे. तंत्रज्ञान दिवसेंदिवस झपाट्याने बदलतं आहे. ऍप्स, वेबकास्ट, विडिओ कॉन्फरन्सिंग, चॅट, याचा जमाना आहे. पण कीर्तनं अजून तबला पेटी आणि त्याच त्या पौराणिक कथांमध्ये अडकलं आहे. मी परंपरेच्या अजिबात विरुद्ध नाही. उलट परंपरेचा नांगर आहे म्हणून आपलं भारतीय संस्कृतीचं तारू अजूनही भरकटलेलं नाही या ठाम मताचा मी आहे. पण परंपरेला धक्का न लावता कीर्तन प्रवचन करण्यात आणि ऐकण्यात काळाच्या बरोबर चालणारी आधुनिकता तरुणाईला आकर्षित करण्यासाठी आणणं आता गरजेचं झालं आहे. कीर्तनातील पूर्वरंगाच्या निरुपणात आजच्या जमान्याचे दाखले देणं आणि कथेत आजच्या युगातले आदर्श स्त्रीपुरुष आणि त्यांचं चरित्र गायलं जाणं हे होऊ नाही का शकणार? .

शेगड्या, चुली जाऊन गॅस आला. बैलगाडी, घोडागाडी जाऊन बस रेल्वे विमानं आली. वायरचा फोन जाऊन मोबाईल आले, कॅसेट जाऊन CD आणि आता क्लाउड वरून डाउनलोड करणे सुरू झाले. इतके सारे बदल जवळजवळ दोन पिढ्यात आत्मसात झाले. मग असं असेल तर कीर्तन प्रवाचनांची आधुनिक काळाप्रमाणे प्लास्टिक सर्जरी करून आणि त्या नवीन रुपाला लोकमान्य करून सिनिअर सिटीझन क्लब मध्ये हळू हळू तरुण चेहरे दिसायला लागले तर ते भारतीय संस्कृतीसंवर्धनाच्या दृष्टीने चांगल ठरणार नाही का?

— राजेंद्र वैशंपायन 
+91 93232 27277
rajendra.vaishampayan@gmail.com
(27 नोव्हेम्बर 2017)

विशेष विनंती: माझे लेख माझ्या नावासहित व फोन नंबरसहित फॉरवर्ड करण्यासाठी माझी काहीही हरकत नाही. 
बाकी हृदयस्थ परमेश्वर साक्षी आहेच.

Avatar
About Guest Author 522 Articles
मराठीसृष्टीवर ज्या लेखकांनी स्वत:चे अकाऊंट बनवले नाही त्यांचे लेख या Guest Author द्वारे प्रकाशित होतात. आपले सर्व लेख एकत्रितपणे मिळवण्यासाठी स्वत:चे अकाउंट मराठीसृष्टीवर जरुर बनवा.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..