नवीन लेखन...

मुंबैकरा, सावध हो

आज सकाळीच ‘लोकसत्ता’तील पहिलं पान पाहिलं आणि दचकलो. पहिल्याच पानावर ‘शिवालिक’ बिल्डर्सची वांद्रे येथील वन बीएचकेचा फ्लॅट फक्त ७५ लाखात विक्रीसाठी उपलब्ध असल्याची ती पानभर जाहिरात आहे. मी दचकलो का, याचं स्पष्टीकरण या लेखात देत आहे. मुंबईवर प्रेम करणाऱ्या प्रत्येकाने यावर विचार करून काहीतरी कृती करावी अशी अपेक्षा आहे.

मुंबईच्या उपनगरांची प्रशासकीय सोयीसाठी पूर्व उपनगरे आणि पश्चिम उपपनगरे अशी विभागणी केलेली आहे. यातील प्रत्येक उपनगराची त्यांच्या पोटातून दक्षिणोत्तर जाणाऱ्या रेल्वे लाईनमुळे पुन्हा पूर्व आणि पश्चिम अशी पोट विभागणी झालेली आहे. पश्चिम उपनगराचं पहिलं उपनगर असलेल्या वांद्र्याचीही अशी विभागणी झालेली आहे.

पश्चिम उपनगरांकडे पाहिलं असता, एक गोष्ट चटकन लक्षात येते, की वांद्रे ते दहिसर या पश्चिम उपनगरांतील उपनगरांची मुख्यत: पश्चिम बाजू पूर्व बाजूपेक्षा जास्त विकसीत आहे. कदाचित पश्चिमेस समुद्र असल्याने पूर्वीपासूनच उच्चभ्रू लोकांची वसती असल्याने असं झालं असावं किंवा आणखीही काही कारणं असावीत परंतू ह्या लेखाचा तो विषय नाही. पश्चिम बाजू जास्त विकसीत आहे येवढंच इथे महत्वाचं आहे.

वांद्रे पूर्व भाग पश्चिमेच्या तुलनेत गरीबांचा. सरकारी कर्मचाऱ्यांची वसाहत, काही सोसायट्या व पूर्व दिशेला सुरू होणारी धारावी झोपडपट्टी असा हा तुलनेनं अविकसीत भाग. मध्यमवर्गीयांची वस्ती पूर्वेला जास्त, तर वांद्रे पश्चिम, मुंबई क्रमांक ५० हा पत्ता उच्चभ्रू लोकांच्या रहिवासाचा आहे. बडे राजकारणी, बाॅलिवूडचे तारे-तारका, उद्योगपतीं, सचिन तेंडूलकरांसारखे बडे खेळाडू, सरकारी अधिकारी यांचासारख्या हाय प्रेफाईल लोकांचं हे निवासस्थान आणि त्यामुळे कायम चर्चेत. या भागातल्या निवासस्थानांचे भाव सामान्यांना परवडण्याचं सोडाच, विचार करण्याच्याही पलिकडे. मी सुरुवातीस दचकलो म्हणालो ते यामुळेच. वास्तविक शिवालिक बिल्डरने ज्या किंमतीत वन बीएचके देऊ केलाय, त्या किंमतीत वांद्र्याला फारतर एखादा बाथरूम येऊ शकतो. वांद्रे पूर्वलाही या किंमतीत वन बीएचके मिळू शकत नाही, फारतर एखादी जी प्लस वनची झोपडी येऊ शकेल.

शिवालिक बिल्डरची बनवाबनवी इथेच आहे. त्याने जाहिरातीत फक्त ‘Bandra’ असंच म्हटलंय, पूर्व की पश्चिम याचा उल्लेख नाही. मला हा शिवालिक बिल्डरचा हा प्रकल्प माहित आहे. रोज लोकलने प्रवास करताना हा पूर्व दिशेला पाहाता येतो. वास्तविक पाहाता हा प्रकल्प सांताक्रूझ आणि खार स्टेशनच्या मधेच, तो ही पूर्वेला आहे. जास्त बरोबर सांगायचं तर, खार स्टेशनला अधिक जवळ. शिवालिकने या जाहिरातीत जो नकाशा दिलाय त्यात खार स्टेशन या प्रकल्पापासून केवळ ३०० मिटर अंतरावर आहे आणि ते जाहिरातीत उल्लेख केलेलं वांद्रे या उपनगराचं वांद्रे स्टेशन तिथून पुढे आणखी दोन-तीन किलोमिटरवर. या प्रकल्पाचा आणि वांद्रेचा काहीएक संबंध नाही.

शिवालिकने वांद्रे पूर्व वा पश्चिम असा उल्लेख न करता केवळ वांद्रे, नाही, बॅन्ड्रा असा उल्लेख केला आहे. मुंबईचं हे आणखी एक दुर्दैव. इथल्या प्राचिन ठिकाणांच्या नांवाचा उच्चार इंग्रजी पद्धतीने केला, म्हणजे आपण थेट अमेरीकन किंवा ब्रिटीश वैगेरे झालो असं लोकांना वाटतं. असं का वाटतं हे त्यांचं त्यांना ठाऊक. म्हणूनच ‘वांद्रे’चं बॅंन्ड्रा होतं, तर ‘सांताक्रुझ’चं’ सॅंटाक्रूझ’ आणि ‘छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस’चं ‘सीएसटीम’..! असो. विषय थोडा भरकटला, पण हे भरकटणं आवश्यक होतं. शिवालिकने ‘बॅन्ड्रा’ असा उल्लेख करून इंग्रजाळलेल्या गावठी सायबांना भुलवण्याचा प्रयत्न केलाय हे स्पष्ट आहे.

अशी चलाखी करणारे शिवालिक हे काही पहिलेच बिल्डर्स नव्हेत आणि एकमेंवही नव्हेत. या पूर्वीही मुंबईतील ठिकाणांची नांव बदलण्याचा प्रयत्न अलिकडे अनेकांनी केला आहे. लोढा बिल्डर्सने वडाळ्याचं चक्क ‘न्यू कफ परेड’ आणि परेल-लोअरपरेल भागाला ‘अप्पर वरली’ असं नामकरण केलंय. कारण एकच, मुळचं कफ परेड आणि मुळची वरळी उच्चभ्रू लोकांचा आहे. आणखी एका बिल्डरने अंधेरी पश्चिमेच्या दादाभाई नवरोजी नगर, अर्थात, डि. एन. नगर भागाचं नामकरण ‘अप्पर जुहू’ असं केलंय. ‘सिद्धू’स ऑफ अप्पर जुहू’ या नांवाने एक नाटकही आलं होतं. मागेही जुहूच्या ब्रांडनेमचं एन्कॅशमेंट करणं.

आपापल्या प्रकल्पाचा ठिकाणांना जवळपासच्या प्रसिद्ध ठिकाणांची नांव देण्यामागे त्या प्रसिद्ध आणि उच्चभ्रू वस्तीच्या नावांसोबत येणाऱ्या वलयाचा लाभ उठवणे हे एकमेंव कारण नाही, नसावं. तर आपल्या मायमुंबईतल्या जुन्या नावांची या नव्याने आलेल्याना लाज वाटणं, हे महत्वाचं कारण आहे. मुंबई घडवणारी ही अस्सल देशी ठिकाण यांना ‘लो प्रोफाईल’ वाटतात..

लालबाग, परळ, लोअर परेल या मुंबईच्या कामगारांच्या लढ्याच्या इतिहासातली धगधगती पानं असणाऱ्या ठिकाणांच्या नांवांची या धनदांडग्याना लाज वाटते. स्वातंत्र्यपूर्वकाळात झालेल्या सविनय कायदेभंगाच्या चळवळीत जिथल्या मिठागरांचं काम स्वातंत्र्यसैनिकांकडून बंद पाडलं गेलं आणि त्यासाठी जिथल्या स्त्रियांनी ब्रिटीश सरकारचा कारावास भोगला, त्या वडाळ्याला बडाळा म्हणायची या उपऱ्यांना लाज वाटते. दादाभाई नवरोजींसारख्या महान देशभक्ताचं नांव अभिमानाने मिरवणाऱ्या डि.एन. नगरची या पैशाला चटावलेल्यांना लाज वाटते, खार या प्राचिन खारवी अदिवासींपासून मिळालेल्या अस्सल देशी नांवाची या लुब्र्यांना लाज वाटते, हे दुसरं आणि जास्त महत्वाचं कारण आहे.

मला खरं दु:ख या बदलांचं आपल्याला काहीच वाटत नाही याचं वाटतं. आपल्याला आपल्या इतिहासाचा अभिमान नाही आणि म्हणून हे सोकाजीराव असं धाडस करू शकतात. मुंबईतली पुरातन ठिकाणं म्हणजे आई मुंबादेवीचे अवयव आहेत आणि हे बिल्डर्स पैशांच्या जोरावर आईच्या किडनीला फुफ्फूस आणि हाताला पाय म्हणायची डेअरींग करताहेत. परचक्र एकहाती थोपवणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या लढवय्या महाराष्ट्राच्या राजधानीत राहाणारे आणि त्यांचे वंशज म्हणवणारे आपण मुंबैकर एवढे थंड (की षंढ?) कधी आणि कसे झालो?

बिल्डरांचं हे जाहिरात तंत्र असावं असं म्हणून एकवेळ मान्य केलं तरी, जाहिरातींच्या माध्यमातून करण्यात येणाऱ्या आणि वरवर निरुपद्रवी वाटणाऱ्या या बदलांच्या पोटात मला पुढे होऊ शकणाऱ्या काही बदलांची दु:चिन्ह दिसून येत आहेत. उदा. शिवालिकच्या जाहिरातीला भुलून त्यांच्या प्रकल्पात अनेकांनी फ्लॅट घेतले, तर ते ’वांद्रे’ म्हणून घेणार. कारण त्यांना वांद्रे आणि खार यातला फरकच समजणार नाही. याचाच अर्थ ते बाहेरचे असणार. या प्रकल्पात फ्लॅट घेणाऱ्या अशा लोकांची संख्या वाढली, की मग ते त्यांच्या निवासाच्या पत्त्यावर ‘मुंबई क्रमांक ५०’ लागवा कारण बिल्डरने तसंच सांगीतलं होतं असं म्हणून त्यासाठी पुढेमागे मागणी करणार. मागणी करणारे पैसेवाले लोक असल्याने लाचार सर्वच राजकीय पक्ष त्यांचीच री ओढणार. सध्या परिस्थिती अशी आहे, की राजकीय पक्ष कोणताही असो, जिथे बहुसंख्य तिकडेच ते बघणार, कारण त्यांना मतं महत्वाची असतात आणि ती मिळणार असतील तर ते सूर्याला पश्चिमेला उगवलाही भाग पाडू शकतात किंवा ते अगदीच शक्य झालं नाही, तर कागदोपत्री तसा बदल करु शकतात. स्थानिक ठिकाण, त्याचा इतिहास, सन्मान वैगेरे गोष्टी त्यांना वायफळ आणि फालतू वाटत असाव्यात..किंवा कदाचित बिल्डर्सच्या जाहिरातीत दिसणाऱ्या ठिकाणींच्या विपर्यस्त नांवामागे राजकीय पंक्षांची मूकसंमतीही असू शकते, कुणी सांगावं..!!

अशा पद्धतीने खरंच झालं, तर मग लालबाग, परळ, लोअर परळ, वडाळा, डि. एन. नगर व अशी आणखी नांव प्रत्यक्षातून लुप्त व्हायला वेळ लागणार नाही. हे असंच चालू राहीलं तर यांची भीड चेपून मुंबईची आणखी काही ऐतिहासिक नांवं गायब होतील आणि होता होता एक दिवस ‘मुंबई शहरा’चं नांवही कुठल्यातरी वेगळ्याच शहराचा ‘अप्पर’ किंवा ‘लोअर’ किंवा ‘एक्सटेन्शन’चा भाग म्हणून जाहीर होण्याची शक्यता नाकारता येत नाही..मुंबई महाराष्ट्रापासून तोडायची वेगळी काय गरज आहे, असं केलं तरी काम होण्यासारखं आहे..मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याची भिती दाखवून मतं मागणाऱ्या राजकीय पक्षांनो आणि म्हणून त्यांना मत देणाऱ्या मुंबैकरांनो भानावर या, रात्रच नव्हे, तर दिवसही वैऱ्याचे आहेत..

अनेकांना या लिखाणात अतिशयोक्ती वाटेल, तशी ती आहेही, पण अतिशयोक्तीच्या पोटातच शक्यतेची बिजं असतात हे विसरून चालणार नाही. किंवा असं नाहीच झालं, तरी येणाऱ्या आपल्या नविन पिढ्यांना त्या विभागाचं बिल्डरने दिलेलं नांव हेच खरं नांव वाटायला लागेल आणि नविन पिढीला आताचं जुनं नांव आणि त्याचा इतिहास कधी माहिती होणारच नाही, ही भितीही आहेच. तेंव्हा मुंबैकरांनो, सावध व्हा..!!

— ©️नितीन साळुंखे
9321811091

नितीन अनंत साळुंखे  उर्फ गणेश
About नितीन अनंत साळुंखे  उर्फ गणेश 377 Articles
श्री नितीन साळुंखे (मित्रपरिवारात गणेश या नावाने परिचित) हे मुळचे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभववाडी तालुक्यातील खांबाळे या गावचे. सध्या मुक्काम मुंबईत. वाचन, लेखनाची अत्यंत आवड. स्वत:चा ७०० हून जास्त पुस्तकांचा संग्रह. इतिहास, भाषा,शब्दांचा जन्म, देव, धर्म, संस्कृती, प्रथा, परंपरा यांचा अर्थ काय व त्या कशा अस्तित्वात आल्या याचा शोध घेण्याची विशेष आवड. लहानपणापासून संघ स्वयंसेवक व संघविचारांशी एकनिष्ठ. पुणे येथील संघप्रणित सर्वात मोठ्या अशा जनता सहकारी बॅंकेतील प्रदिर्घ नोकरीनंतर त्यांचे मित्र आणि आमदार प्रमोद जठार यांच्याबरोबर काम करण्यासाठी त्यांनी २००७ मध्ये नोकरी सोडली. त्याचबरोबर मित्राबरोबर मुंबईत बांधकाम व्यवसायात पदार्पण. २०-२२ वर्षांचा ज्योतिष शास्त्राचा अभ्यास असल्यामुळे परिचितांमध्ये एक उत्तम ज्योतिषी म्हणून ओळख. सर्व थरातील मित्र. त्यातही बहुतकरून लेखक, कविंचा, कलाकारांचा जास्त भरणा.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..