नवीन लेखन...

मुगल ए आझम

५ ऑगस्ट १९६० साली भारतीय चित्रपटसृष्टीच्या इतिहासातील बहुचर्चित चित्रपट “मुगल ए आझम ” मराठा मंदिर चित्रपटगृहात प्रदर्शित झाला, या गोष्टीला ५७ वर्षे झाली.

हिंदी चित्रपट सृष्टीत मैलाचा दगड ठरलेला आणि अनेक अर्थाने ऐतिहासिक ठरलेला ‘मुघल ए आझम’ हा ‘क्लासिक’ चित्रपट आज अनेक वर्षे सुजाण प्रेक्षकांना भुरळ घालत आला आहे.

मूळ ‘मुघल ए आझम’ चित्रपट हा देखील ‘अनारकली’ या नाटकावर आधारित होता आणि त्यातील काही संवाद चित्रपटात जसेच्या तसे स्वीकारण्यात आले. या नाटकापासूनच के. आसिफ यांना प्रेरणा मिळाली आणि त्यांनी ‘मुघल ए आझम’ची निर्मिती केली.

के. आसिफ यांच्या सारखा दिग्दर्शक आणि सलीम अनारकलीच्या प्रेमकहाणीचा भव्य पट..
फक्त सर्वोत्तमाचाच ध्यास घेतलेल्या आणि कसलीही तडजोड मान्य नसलेल्या के आसिफ यांच्याकडे हा चित्रपट आला तेव्हांच एका अतिभव्य रूपेरी इतिहासाचा पाया घातला गेला होता.

त्या काळचा सर्वात खर्चिक चित्रपट, या काळातला सर्वात खर्चिक संगणकीय संकलन असलेला चित्रपट
प्रत्येक सिनेमागॄहात सगळे खेळ सलग तीन वर्षं अखंड चालले… हा विक्रम आजवर मोडला गेलेला नाही…

अकरा वर्षांच्या निमिर्तीकाळात आणि पुढच्या ५७ वर्षांत या सिनेमाशी जेवढ्या सुरस कथा , दंतकथा जोडल्या गेल्या, तेवढ्या खचितच दुसऱ्या कुठल्या सिनेमाशी जोडल्या गेल्या असतील.

त्या काळचा सुपरस्टार दिलीपकुमार सलीमच्या भूमिकेत असतांना अकबराच्या भूमिकेत पॄथ्वीराजकपूरला सन्मानाने आमंत्रित करतानाच दिलीपला तू या चित्रपटाचा नायक नाहीस हे के आसिफ सूचित करून गेले होता आणि अकबर बादशहाला एक शाही व्यक्तिमत्त्व बहाल करण्याचे काम पृथ्वीराज कपूर करून गेले.

कमावलेलं शरीर, गोरापान वर्ण, रूपेरी केस आणि खर्जातला धडकी भरवणारा आवाज यामुळे अकबर बादशहाचा वावर असताना पब्लिक टेन्शनमध्येच असायचं. विशेषतः सलीम अनारकली एकत्र असताना बहार बादशहाला चुगली करते आणि बादशहा रागारागाने एकेक दालनातून तावातावाने निघतो तेव्हाचा याचा संताप अंगावर येतो. त्या प्रसंगात आता काय होणार म्हणून गळ्यात आवंढा येतो इतका दरारा पॄथ्वीराज यांनी पडद्यावर निर्माण केलाय..

अनारकली उन्मत्त होऊन उर्मटासारखा प्रश्न विचारत असताना बादशहाच्या रागाचा पारा चढत जातो आणि शेवटी असह्य होऊन तो दाणकन आपली मूठ वज्रासारखी सिंहासनावर आपटतो तेव्हां महाराणी जोधाच्या डोळ्यातलं भय आपल्या काळजात उतरत जातं.

खरं तर दिलीपकुमारला आपण शाहजादा म्हणून कसे दिसू याबद्दल शंकाच होती. पण फाळणीनंतर बरेचसे कलाकार पाकिस्तानात गेल्याने दिलीपकुमार या चित्रपटात आला आणि नर्गीसने चित्रपट सोडला. चित्रपट सुरू झाला तेव्हां नर्गीसच्या स्वप्नाळू डोळ्यांची जादू देशातल्या रसिकांवर अशी काही होती कि मधूबालादेखील तोपर्यंत त्या डोळ्यांपुढे ताठ उभी राहू शकलेली नव्हती. पण राजकपूरसाठी काम करणार असल्याने दिलीपबरोबर ती काम करणे शक्य नव्हतेच आणि मग मधूबालाच्या नावावर हा चित्रपट लागला.

या चित्रपटाचा आवाका पाहून के आसिफ त्या काळाचे प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक शापूरजी पालनजी यांच्याकडे आर्थिक मदतीसाठी गेले होते. या धंद्यात उतरण्याचा कोणताही विचार नसल्याचे त्यांनी सुरूवातीला सांगितले पण आसिफ यांनी ही गोष्ट अशी काही रंगवून त्यांच्यासमोर “दाखवली” कि त्यांचे मतपरिवर्तन झाले आणि ते अर्थसहाय्यास तयार झाले….

पुढच्या काळात शापूरजींना या चित्रपटापायी बराच मनःस्ताप सोसावा लागणार आहे आणि के आसिफ हा मनुष्य किती वेडा आहे हे त्यावेळी माहीत असलेली नियती मात्र शापूर्जीच्या कार्यालयाच्या आढ्यावर बसून खुदुखुदू हसत होती !

के आसिफ यांना या चित्रपटासाठी शीशमहाल उभारायचा होता. ३५ फूट उंच, रुंदीला ८० तब्बल ८० फूट आणि लांबी…………..? फक्त १५० फूट !

दोन वर्षे लागली हा महाल उभारायला…! त्यासाठी बेल्जियमवरून आरसे मागवण्यात आले होते. शापूरजींनी त्या काळी पैसे किती मोजले असतील? १५ लाख रूपये !!

कळतंय का १५ लाख म्हणजे किती ? सोनं चाळीस रूपये तोळा होतं म्हणे !! काढा आता हिशोब !!!
आणि तज्ञांशी चर्चा करून आशिफ म्हणाले या महालात फक्त एकच गाणं चित्रीत होणार आहे.
शापूरजींचं डोकं आउट व्हायला हे पुरेसं होतं आणि के आसिफ वि शापूरजी हे युद्ध भडकत गेलं…
शीशमहालच्या छतावर असलेल्या आरशांमुळे प्रकाश परिवर्तित व्ह्यायचा त्यामुळं कॅमेरामन चित्रीकरणास नकार देत. तर के आसिफला बादशाला तख्तपोशीकडे पाहतांना छताच्या प्रत्येक आरशात अनारकली दिसते असं दाखवायचं होतं. हे कठीण होतं. खरं तर अशक्यच शब्द योग्य होता पण आपल्यासमोर रिझल्ट आहे…

तर काय सांगत होतो….अशक्य असा निर्वाळा तंत्रज्ञांनी दिल्यावर सर्वांनी असे असेल तर हे गाणे कट करा इथपासून ते नाही दिसली मधूबाला आरशात तर कोणतं आभाळ कोसळणार आहे असे सल्ले के आसिफ ला दिले..

पण वेड्या आसिफला कलाकॄतीसाठी कोणतीही तडजोड मान्य नव्हती. त्याला त्याच्या मनःपटलावर ही कथा कशी दिसली होती तशीच ती सादर करायची होतॉ.

त्याने निर्वाणीचा इशारा दिला..मला चित्रीकरण करता येणार नसेल तर या शीशमहालला मी माझ्या हाताने आग लावीन ..

आणि घाबरलेल्या शापूरजींनी शीशमहालचे सर्व भाग सुट्टे करून तो पॅक करून ठेवायला सांगितले..

इथून पुढे ते आसिफचे तोंडही पहायला तयार नव्हते…!
आसिफची गच्छंती जवळजवळ निश्चित होती
पण हार मानणा-यातला आसिफ नव्हता. हे प्रकरण सोहराब मोदींकडे गेलं. मोदी आणि पॄथ्वीराज कपूर हे दोघेही शापूरजींचे परिचित. ..

शापूरजींनी धंद्याचे गणित मांडले. आणि आसिफच्या त-हेवाईकपणचे सर्व किस्से सांगून अशा माणसाबरोबर मी काम करू शकत नसल्याचे ठासून सांगितले. मोदींनी आसिफशी चर्चा केली. आसिफ काय चीज आहे हे त्यांना चांगलेच माहीत होते, पण कलंदरी वॄत्तीला असलेला शाप म्हणजे फटकळपणा…परखड म्हणा किंवा स्पष्टवक्तेपणा म्हणा…ज्याला सुनावले जाते तो मात्र फाटक्या तोंडाचा अशीच संभावना करीत असतो. कमाल अमरोहींसारखा मनुष्यही आसिफला सोडून गेला आणि वेगळ्या चित्रपटासाठी जुळवाजुळव करू लागला..चित्रपटाचे नाव अनारकली !

एस. मुखर्जीही प्रदीपकुमार आणि बीना रॉय या अप्रतिम लावण्यावतीला घेऊन याच नावाचा चित्रपट बनवायच्या तयारीला लागेलेले होते. आसिफ वर या कशाचाही परिणाम झालेला नव्हता.
कटू सत्य लोण्यात घोळवून सांगणं ही व्यापारी कला कलाकारांना अवगत नव्हती त्याकाळी…
मोदींनी यशस्वी मध्यस्थी केली. मोदींवर विश्वास ठेवून शापूरजींनी पुन्हा आसिफला एक संधी दिली…
द्यावीच लागली……….. !

इंग्लंडहून आलेल्या सदस्यांनी इथे शूटींग होणार नाही असा निर्वाळा दिलेला. आसिफ ने विचार करायला सुरूवात केली.

रोज तो दिव्यांची मांडणी बदलत असे, कॅमेरा बदलत असे. पण व्हायचं काय कि आरशांच्या विशिष्ट रचनेमुळं कधी त्यात कॅमेरा तर कधी प्रकाशझोत येत…मोठी समस्या होऊन बसलेली. शिवाय मधूबाला तर प्रत्येक आरशात हवी होती…शापूरजींनी इशारा दिलेला…

शेवटी आसिफच्या डोक्यात भन्नाट कल्पना आली. त्याने जिथून त्रास होत नाही ते दिवे तसेच ठेवले व झुंबरांच्या आजूबाजूला आणि विशिष्ठ ठिकाणांवर मेणबत्त्यांचा वापर केला. आता सगळीकडूनच उजेड येत असल्याने ऑब्जेक्ट आरशात दिसू लागला आणि प्रकाशाचेही संतुलन झाले !!!

सगळ्या युनिटने नि:श्वास सोडला. हा कार्यभाग तर पार पडला आणि पुढच्या सगळे शूटींगच्या तयारीला लागले. आता विघ्न येऊ नये असंच सर्वांना वाटत होतं
आणि आसिफचे नवे खूळ सुरू झाले …

सिनेमाला सुरूवात केल्याला आता सात वर्षे उलटून गेली होती. आणि आता रंगीत फिल्मसचा जमाना सुरू झाला होता. आसिफने रंगीत फिल्मसाठी पैसे मागितले. पुन्हा एकदा संघर्ष , पुन्हा मोदी !!
आता असे ठरले कि सरसकट रंगीत फिल्मवर शूट न करता काही भाग शूट करून तो इंग्लंडला लॅबमधे पाठवावा. तज्ञांचे मत विचारावे आणि मगच पुढचा निर्णय घ्यावा…
झालं

प्यार किया तो डरना क्या चे बोल शीशमहालात घुमले. मधूबालाचे पाय त्या बोलांवर थिरकू लागले. बादशहाला आरशात अनारकली दिसू लागली…..

हे गाणं रंगीत झालं. फिल्म टेस्ट करण्यासाठी इंग्लंडला गेली..प्रोसेसींग होऊन परत आली. तज्ञांनी अप्रतिम असा निर्वाळा दिला होता. आता पुढचा सिनेमा रंगीत होणार होता..आणि आसिफचं वेड पुन्हा उफाळून वर आलं……!

चित्रपटाचा रंगीत भाग पाहील्यावर आधी शूट केलेला भाग त्याला कमअस्सल वाटू लागला. आसिफ हे सर्वोत्तमाचे दुसरे नाव होतं.

आमीरला आपण पर्फेक्शनिस्ट म्हणतो..पण आसिफ या सच्च्या कलाकाराची तुलना कदाचित हॉलिवूडच्याच दिग्दर्शकांशीच करावी लागेल..

आता आसिफचे म्हणणे होते..चित्रपट पुन्हा पहिल्यापासून शूट करायचा..
संपूर्ण रंगीत !!

शापूरजी यांना ह्रूदयविकाराचा झटका येणेच बाकि होते…कारण आतापर्यंत या चित्रपटासाठी त्यांचे …….
दीड कोटी रूपये खर्ची पडले होते.. !!

एक हाडाचा कलाकार आणि एक हाडाचा व्यावसायिक यांच्यातलं हे युद्ध होतं. आसिफ हा हाडाचा कलाकार होता, त्यामुळंच तो मनासारखी कलाकॄती व्हावी यासाठी हट्ट धरत होता. आजचे सिनेमे पाहीले तर आसिफच्या या वेडाची महती काही औरच आहे.

पण शापूरजींच्या पदरातही त्यांच्या श्रेयाचे माप घालायला हवे. एका अट्टल व्यावसायिकाने एका खुळ्या कलाकाराला इतकी भरघोस मदत करावी हे त्यांच्या कलासक्त मनाचेच निदर्शन आहे.

११ वर्षानंतर सिनेमा पुन्हा पहिल्यापासून शूट करणे हे खरंच व्यावहारिक नव्हते. वितरकांचा दबाव वाढल्यावर असं ठरलं कि सिनेमा आहे तसा प्रदर्शित करावा. आसिफ रूसून बसलेला होता. सिनेमा बनेपर्यंतच त्याचा अधिकार होता. त्याने ती कलाकृती बनवली होती. आता शापूरजी आपले अधिकार वापरत होते. पैसा त्यांचा होता..

सिनेमा प्रदर्शित झाल्यानंतर पहिले तीन दिवस थेटर्स खाली होते. सगळे धास्तावलेले होते. पण आसिफ तरीही सांगत होता, या सिनेमाला ब्लॅक होईल..

आणि माऊथ पब्लिसिटीचा परिणाम होऊन सिनेमाकडे पब्लिक असं वळलं कि पुढचा इतिहास त्यांच्या या पावलांनीच लिहीला गेला !!!

प्रीमिअर चालू असतांना मात्र शापूरजींच्या मनातून आसिफबद्दलचा राग निवळत चालला होता. तो काय म्हणत होता हे त्यांना आता पडद्यावर कळत होते. आणि रंगीत भाग सुरू झाला मात्र..

त्यांना आतापर्यंतचा कृष्णधवल सिनेमा एकदम डावा वाटू लागला. ऐकलं असतं आसिफचं तर असं वाटून गेलं..

आणि मग त्यांनी आसिफचा हात प्रेमभरानं दाबत त्याला वचन दिला.

एक दिवस हा सिनेमा संपूर्ण रंगीत बनेल. मी हा सिनेमा तुझ्यासाठी कलरफुल करेन..!!
काही वर्षांपूर्वी त्यांच्याच कंपनीने हा सिनेमा रंगीत अवतारात दाखल केला आणि एका अवलिया कलाकाराला एका उद्योगपतीने दिलेल्या वचनाची पूर्तता झाली ..!!

सगळंच अतर्क्य !!!

संकलन. संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट / मायबोली.कॉम

संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर 4222 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..