नवीन लेखन...

माझा लेखनप्रवास…

माझा आजवरचा लेखनप्रवास आणि या प्रवासातला माझा सोबती..


मी साधारणत: तिन वर्षांपूर्वी लेखनाची वाट धरली. अर्थात, ह्या वाटेवर काही ठरवून आलो नव्हते किवा आलो तेंव्हा निश्चित असं ध्येय काही नव्हतं. वेळ होता भरपूर, तेंव्हा काय करायचं म्हणून म्हटलं, असाच या वाटेवरून एक फेरफटका मारून येऊ, वेळ घालवू म्हणून निघालो होतो. पण सहज म्हणून फिरायला निघालो आणि मग इतकं छान वाटायला लागलं, की मला परत जावंसं वाटेना. आता ही काही सिंहाची गुहा नव्हे की जिथं आत जायचा मार्ग असतो, पण परतीचा नसतो. इथे परत जायला मला कुणीच अडवलं नव्हतं, अडवणारं नव्हतंच कुणी आणि जे होते, ते, ‘थोडं आणखी पुढे जा, मजा वाटेल बघा’ असं सांगून आणखी पुढे जाण्यास प्रवृत्त करणारेच. आताच्या भाषेत चिअर लिडर्स म्हणा ना..!!

साधारणत: माणूस चालायला लागला, की काही ठरावीक अंतरानंतर थकतो. परंतू ही वाटच अशी आहे, की प्रत्येक पावलानंतर माणूस रिचार्ज होतो व दुप्पट दमाने पुढे चालू लागतो. माझंही असंच झालं. दम लागतच नव्हता, उत्साह मात्र दर पावलानंतर वाढत होता. ही काहीतरी वेगळीच भानामती आहे हे जाणवत होतं, पण या भानामतीची भितीही वाटत नव्हती.आता तर परतीची इच्छाही नाही.

तिनेक वर्षांपूर्वी मी एक छोटंसं, ५०-६० शब्दांचं स्फुट लिहीलं होतं. नक्की कोणतं ते आता आठवत नाही, मात्र कोणत्या तरी शब्दांचा जन्म कसा झाला आणि त्याचा अर्थ यासंबंधी असावं. बहुतेक ‘ॐ’ चा अर्थ असावा. अगदीच बाळबोध होतं, परंतू स्वत:ची निर्मिती असल्याने मला त्याचं अप्रुप वाटलं होतं. स्वत:चं बाळ काळबिद्र का असेना, आईसाठी ते जगातील सर्वात सुंदर बाळ असते. तसंच काहीसं माझं झालं होतं. मी ते स्फुट माझ्या व्हाट्सॲपवरील काही मित्रांना पाठवसं आणि त्यांना ते खुप आवडल्याचं त्यांनी मला उलट मेसेजी कळवलं. अर्थात त्यात खरंच आवडल्याचा भाग किती आणि चांगलं म्हणायच्या प्रथेचा भाग किती, हा प्रश्नच होता, परंतू तो तेंव्हा मला पडला नव्हता. तेंव्हा उत्साहच वाटला होता आणि त्यातून स्फुर्ती घेऊन पुढे ‘शब्दनाद’ या नांवाखाली त्याच प्रकारचे आणखी १२-१५ लेख लिहीले आणि ते माझ्या परिचयाच्या सर्वांना आवडले. आपण नेहेमी बोलत असलेल्या शब्दांचा अर्थ, त्याचं मूळ जन्म ठिकाण, विविध प्रांतात त्या शब्दाची रुपं अशा प्रकारचे ते लेख होते. यात सुरुवातीस मला श्री. सुरेन्द्र तन्नाजी व संस्कृतच्या ज्येष्ठ विदुषी डाॅ. सुनिता सुवेन पाटील, मुंबई विद्यापिठाच्या संस्कृतच्या माजी विभागप्रमूख डाॅ. गौरी माहूलीकर यांचा पाठींबा आणि मार्गदर्शनही मिळालं. मया लेखांचं कौतुक ज्येष्ठ पत्रकार, राजकीय भाष्यकार आणि ‘लोकसत्ता’च्या नागपूर (विदर्भ) आवृत्तीचे माजी संपादक आणि माझे स्नेही श्री. प्रविण बर्दापूरकर यांनी केलं आणि मला प्रोत्साहन दिलं.

पुढे मला लिखाणात आनंद मिळत गेला आणि मग हा प्रवास सुरू झाला. भाषा, शब्दांपासून सुरुवात केलेला मी पुढे संस्कृती, सण, मला भेटलेली वैशिष्ट्यपूर्ण माणसं, समाज, शिक्षण, मुंबई शहाराचा इतिहास अशा विविध विषयावार लिहीत गेलो. ही विषयाची विविध वळणं का येत गेली हे नक्की सांगता येणार नाही. लिखाणाच्या विषयांचं अवकाशच असीम आहे, यात लेन पाळण्याचं बंधन नाही. बंधन असलंच तर ते लिहीणारावर, ते ही लिहीणारा भरकटू नये म्हणून. म्हणून लिहीताना आवश्यक ते संदर्भ, आधार असल्याशिवाय लिहायचं नाही हे नक्की केलं होतं. लिहीताना एखाद्या विषयावरच्या माझ्या पूर्वीच्या मतांशी विपरीत अशी पक्की माहिती मिळाली, की माझी मतं बाजुला ठेवून त्या माहितीशी प्रामाणिक राहून लिहायला सुरुवात केली. माझं लेखन वाचणारांचा उदंड प्रतिसाद मला मिळत गेला आणि त्याच्या दुप्पट उत्साहाने मी लिहीत गेलो. वाचणारांची संख्या वाढत गेली, तशी माझी जबाबदारी वाढल्याचीही मला जाणीव होत गेली. प्रत्येक शब्द काळजीपूर्वक लिहीण्याची दक्षता मी घेत गेलो. माझं लेखन लोक आवडीने वाचतात, त्यातले काही त्यावर विचारही करतात या जाणीवेतून मला माझ्यावरील जबाबदारीचं भान येत गेलं. लिहीताना कधी टिका करायची पाळी आली, की ती टिका प्रवृत्तीवर करावी, व्यक्तीवर नाही याची जास्तीत जास्त काळजी घेण्याचा प्रयत्न केला. त्याचबरोबर एखादं चांगलं काम करणाऱ्या व्यक्तींबाबत मात्र त्यांच्या त्यांच्या नांवा-कार्यासकट लिहीत गेलो..!

हळुहळू लोकांना लिखाण आवडत गेलं. काहींनी ते छापायचंही धारिष्ट्य केलं. आपले शब्द आपल्या नांवासकट कुठेतरी छापून येण्याचा आनंद काय असते, हे फक्त लेखक-कविंनाच कळतं. माझं लेखन पहीलं छापलं, ते ‘लोकप्रभा’च्या श्री. विनायक परबांनी. लोकप्रभासारख्या अग्रगणी साप्ताहीकात छापून आलेला पाहून माझा आनंद गगनात मावत नव्हता. कारण तोवर माझं नांव आणि ‘पराक्रम’ शाळा-काॅलेजच्या प्रगतीपुस्तकातच छापून येत होता. नंतर मला संधी दिली ‘चैत्रशोभा’ या वार्षिकाच्या श्री. संतोष खाड्येंनी. संतोषजी स्वत: उत्तम कवि आहेत. ‘मुंबई शहराचा राजकीय इतिहास’ हा लेख माझ्याकडून माझ्या वडीलांसारखे असणाऱ्या ज्येष्ठ पत्रकार श्री. कुमार कदमांनी ‘दर्पण’साठी लिहून घेतला आणि त्यानंतर मुंबई शहरात अद्याप दिसून येणाऱ्या ऐतिहासिक खुणांवर एकूण २६ लेख लिहीले. त्हे लेख महाराष्ट्र शासनाच्या ‘माहिती व जनसंपर्क संचनालया’चे श्री. देवेन्द्र भुजबळ यांनी शासनाच्या वेबसाईटवर प्रसिद्ध केले व वर मानधनही दिलं. या लेखांना मिळालेल्या उदंड प्रतिसादानंतर मात्र मी लिहीण्याच्या क्षेतातच काहीतरी करण्याचा निर्णय घेतला.

माझ्या या निर्णयाला कारणीभूत ठरले ते श्री. कुमार कदम. आणि या निर्णयाला माझी पत्नी सौ. वीणा हीने भक्कम पाठींबा दिला. कारण हे क्षेत्र आर्थिक लाभाचं नाही आणि जे आर्थिक लाभाचं नाही ते निषिद्ध अशी काहीशी हल्लीच्या समाजाची धारणा आहे. असं असुनही बायकोने माझ्या मागे उभं राहाण्याचा घेतलेला निर्णय मला कौतुकाचा वाटतो. तिने असा निर्णय घेतला असता आणि माझ्या पाठींब्याची अपेक्षा व्यक्त केली असती, तर मी कितपत तयार झालो असतो याची शंकाच आहे. म्हणून मला तिचं कौतुक वाटतं..ती पाठीशी आहे म्हणून मी यशस्वी होईव असं वाटतं कारण म्हणतात ना, प्रत्येक यशस्वी पुरूषाच्या मागे एक स्त्री असते म्हणून. माझ्यामागे ती आहे, आता यशस्वी होण्याची जबाबदारी माझी आहे. पाहू, पुढे काय होतं ते..!

या प्रवासातील काही लेख लिहीण्यापूर्वी माझा व्यासंगी मित्र राजन शिर्के याचीही खुप मदत झाली. पुढे या प्रवासात मला मराठवाड्यातले श्री. अनिरुद्ध जोशी भेटले. त्यांनी माझे लेख मराठवाड्यातील ‘एकमत’ या अग्रगण्य दैनिकात छापायची तयारी दाखवली. पेपरच्या अग्रलेखातं मधलं पान त्यांनी मला दिसं, ते ही शनिवारचं. माझा हुरूप आणखी वाढला. एकू ४५-५० लेख मी एकमतसाठी लिहीले. त्याचं मानधनही मला जोशींनी मिळवून दिलं. बीड, औरंगाबाद, लातूर, जालना, आंबेजोगाई वैगेरे मराठवाड्यांतील परिसरात मला जोशी घेऊन गेले. लेख वाचून आवडल्याचे असंख्य फोन मला मराठवाड्यातून येऊ लागले. कधीही न पाहीले-भेटलेले वाचक अत्यंत जवळचे मित्र होऊन गेले. त्यांचं मागणं एकच होतं, तुम्ही लिहीत राहा, आम्ही वाचत राहू..

‘दै. देशमोर्चा’चे श्री. खाडेकर त्यांच्या समुहाच्या १६-१७ दैनिकात माझे लेख प्रसिद्ध करत असतात. महाराष्ट्राच्या कुठल्यातरी कोपऱ्यातून फोन आल्यावर मला ते कळतं. वेंगुर्ल्याच्या ‘साप्ताहिक किरात’ या पाऊणशे वयोमान असणाऱ्या साप्ताहिकाच्या सौ. सीमा मराठे त्यांच्या साप्काहीकातून मला सिंधुदुर्ग ते पार कारवार, बेळगांवपर्यंत घेऊन गेल्यात..या सर्वांचं उतराई केंव्हा आणि कसं व्हायचं ते कळत नाहीय..महाराष्ट्रील असंख्य वाचकांचं प्रेम या क्षेत्रात माझ्यासारख्या नवखा असलेल्या माणसाला लाभलं याला पूर्वसंचित यापेक्षा वेगळं नांव सुचत नाही..हल्ली हल्लीतर रस्त्याने चालताना अवचित अनोळखी असं कोणीतरी भेटतं, थांबतं, तुम्ही नितीन साळुंखे ना अशी विचारणा करून दोन मिनिटं बोलतं, लेखन आवडत असल्याचं सांगतं आणि भरघोस आशीर्वाद देऊन आपल्या मार्गाने निघूनही जातं..अशा वेळी काय वाटतं, ते शब्दात वर्णन करता येणार नाही..

माझ्याकडून आतापर्यंत किती लिहून झालंय याची मला काहीच कल्पना नव्हती. किंबहूना मोजण्यासाठी मी लिहीलंही नाही. मी हिशोबात तसाही पहील्यापासूनच कच्चा. हिशोब जमलाच नाही कधी. परंतू मी हिशोब ठेवत नसलो तरी कुणीतरी चित्रगुप्त तो ठेवतच होता आणि माझ्यासाठी तो चित्रगुप्त होता ठाण्याचे श्री. निनाद प्रधान. marathisrushti.com चे सर्वेसर्वा. अलिकडेच त्यांनी माझ्या त्यांच्या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या लेखांची लिंक पाठवली होती. त्यातले लेख मोजून पाहीले तर ते २८०+ भरले. अबब, माझा माझ्यावरच विश्वास बसेना..!

या प्रवासात मला आशीर्वाद आहे मी ज्यांना गुरू मानलंय त्या पु. ल. देशपांडेंचा आणि अशाच असंख्य लेखकांचा. कित्येकदा तर पु.ल. माझ्यासमोर बसून माझ्याकडून लिहून घेतायत असा मला भास होतो.

हा प्रवास सुरुच आहे. थांबलेला नाही. जसजसा पुढे जातोय तसं तसं क्षितिज आणखी पुढे जातंय आणि त्या क्षितिजाला गवसणी घालण्यास मी ही..या प्रवासात थकवा नाही, असलाच तर अमर्याद आनंद आहे, उत्साह आहे..आपल्या सर्वांच्या अमाप प्रोत्साहनाच्या साथीने माझा हा लेखनप्रवास प्रवास सुरूच राहाणार, सुरूच राहाणार, माझ्या अंतापर्यंत..

आणि या प्रवासातला माझा सोबती-

माझ्या गत तिनेक वर्षातल्या लेखनप्रवासात मला ज्याने न थकता अखंड आणि अबोल साथ दिली, त्याही त्याच्या तिन पिढ्या, त्या माझ्या सोबत्याचा, माझ्या मोबाईलचा, उल्लेख केला नाही तर ते कृतघ्नपणाचं ठरेल.

वर कुठेतरी मी लेखणीचं बोट पकडल्याचा उल्लेख केलाय, खरं तर मी कि-पॅडवर बोटं चालवायला सुरुवात केली, ती हा लेख लिहून पूर्ण होईपर्यंत, असं म्हणायला पाहीजे.

या लेखनासाठी मी कंप्युटरचा उपयोग फार म्हणजे फारच क्वचित केला. तुम्ही विश्वास ठेवा किंना नका ठेवू, माझं आजवरचं जवळपास ९९ टक्के लेखन, मग ते ५० शब्दांचं असो की ५००० शब्दांचं, मोबाईलवरच केलं. आणि यातलं बरचसं लेखन मुंबईच्या लोकल ट्रेनमधे केलंय. लोकल प्रवासात मिळणारा सकाळ-संध्याकाळचा एकेक तास मी लेखनात व्यतित केला. मोबाईल अखंड सोबत असतो. मनात काही आलं की लगेच टाईप करून ठेवता येतं. काही चांगली वाक्य आठवतात, काही प्रसंग, व्यक्तीविषय दिसतात व त्यावर लागलीच लिहून ठेवता येतं, ही सोय कंप्युटरमधे नाही. मोबईलवरच सर्व टायपिंग असल्याने टायपिंगमध्ये काही चुकाही होतात. या चुकांची जबाबदारी माझी, मोबाईलची नाही.

हा जवळपास १२०० शब्दांचा लेखही लेकलमधेच पूर्ण करून मोबाईलवरुनच इथे अपलोड केलाय..माझ्या या मोबाईल मित्राचे आभार मानतो आणि थांबतो.

— ©️ नितीन साळुंखे
9321811091

नितीन अनंत साळुंखे  उर्फ गणेश
About नितीन अनंत साळुंखे  उर्फ गणेश 377 Articles
श्री नितीन साळुंखे (मित्रपरिवारात गणेश या नावाने परिचित) हे मुळचे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभववाडी तालुक्यातील खांबाळे या गावचे. सध्या मुक्काम मुंबईत. वाचन, लेखनाची अत्यंत आवड. स्वत:चा ७०० हून जास्त पुस्तकांचा संग्रह. इतिहास, भाषा,शब्दांचा जन्म, देव, धर्म, संस्कृती, प्रथा, परंपरा यांचा अर्थ काय व त्या कशा अस्तित्वात आल्या याचा शोध घेण्याची विशेष आवड. लहानपणापासून संघ स्वयंसेवक व संघविचारांशी एकनिष्ठ. पुणे येथील संघप्रणित सर्वात मोठ्या अशा जनता सहकारी बॅंकेतील प्रदिर्घ नोकरीनंतर त्यांचे मित्र आणि आमदार प्रमोद जठार यांच्याबरोबर काम करण्यासाठी त्यांनी २००७ मध्ये नोकरी सोडली. त्याचबरोबर मित्राबरोबर मुंबईत बांधकाम व्यवसायात पदार्पण. २०-२२ वर्षांचा ज्योतिष शास्त्राचा अभ्यास असल्यामुळे परिचितांमध्ये एक उत्तम ज्योतिषी म्हणून ओळख. सर्व थरातील मित्र. त्यातही बहुतकरून लेखक, कविंचा, कलाकारांचा जास्त भरणा.

1 Comment on माझा लेखनप्रवास…

  1. तुमचा आत्मवृत्तपर लेख आवडला. ॐ वर जो लेख लिहिला होतात, तो वाचायला आवडेल. कृपया मराठी सृष्टीवर अपलोड करावा. तेथें आधीपासूनच असल्यास, तो लेख वेबसईटवर ‘पुढे’ आणण्यांस प्रधान यांना सांगावे. धन्यवाद.
    – सुभाष स. नाईक

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..