नवीन लेखन...

मेजर गोपाळ मित्रा आणि मिनी : दोघांचं अलौकिक आणि प्रेरणा देणारं प्रेम

Major Gopal Mitra and Mini

उत्तर भारत आणि जम्मू-काश्मीरमध्ये घुसखोरी आणि दहशतवादावर नियंत्रण ठेवण्यासाठी लष्कर मोठय़ा प्रमाणावर प्रयत्नशील आहे. यामध्ये दरवर्षी किमान ७००-८०० जवान आणि २५ ते ३० अधिकारी शहीद होतात. १९८८ पासून असलेली ही परिस्थिती कायम आहे. ही घुसखोरी थांबवताना सुमारे तीन हजार जवान दरवर्षी मोठय़ा प्रमाणावर जखमीही होतात. अनेक जवान आपले हात-पाय, डोळे गमावून बसतात. असं अपंगावस्थेत जिणं किती त्रासदायक असतं हे तर सांगायलाच नको. अशा जवानांसमोर लष्करी सेवेतून निवृत्ती स्वीकारण्यापलीकडे दुसरा कुठलाच पर्याय नसतो. पण तरी त्यांची लढाऊ वृत्ती कायम असते. एखाद्या वादळानंतर पक्षी त्याच उत्साहाने गाऊ शकतात तर आम्ही का नाही.. हा आशावाद आयुष्यभर कायम असतो.. अशी अनेक वादळं येतात आणि जातात.

असंच एक वादळ मेजर गोपाळ मित्रा यांच्या आयुष्यातही आलं. ते महार रेजिमेंटमध्ये होते. त्यांच्या कामगिरीचं रेजिमेंटमध्ये मोठं कौतुकही होत होतं. मात्र ५ नोव्हेंबर २००० नंतर त्यांचं आयुष्य पार बदलून गेलं. जम्मू-काश्मीरच्या हांडवारामध्ये त्यांना
एका कामगिरीसाठी पाठवण्यात आलं. दहशतवाद्यांबद्दल लष्कराला काही माहिती मिळाली होती आणि त्यानुसार पुढची जबाबदारी मेजर मित्रांकडे देण्यात आली होती. मेजर मित्रा यांनी लष्कर-ए-तोयबाच्या दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घातलं होतं त्यामुळे रेजिमेंटचा त्यांच्या कर्तबगारीवर पूर्ण विश्वास होता. दहशतवाद्यांना लष्कराच्या या शोधमोहिमेबद्दल कळलं आणि ते जिथे लपले होते तिथून पळून गेले. मेजर मित्रा यांच्या टीमने त्या जागेचा ताबा घेतला आणि पुढच्या कारवाईला सुरुवात केली. ही कारवाई करताना त्यांना पुढच्या दुर्दैवी क्षणांबद्दल कसलीच कल्पना नव्हती.. काही क्षणांमध्येच तिथे कानठळ्या बसवणारा आवाज झाला. ते ठिकाण स्फोटाने हादरलं. दहशतवाद्यांनी पळून जाण्यापूर्वी तिथे बाँब ठेवला होता.. त्या स्फोटामध्ये मेजर गोपाळ यांचा चेहरा जळाला.

मेजर गोपाळ यांच्या युनिटला माहिती कळवली गेली. या बातमीने सगळेच हादरून गेले. पण सगळ्यात मोठा धक्का अजून त्यांना बसायचा होता.. डॉक्टरांनी सांगितलं की मेजर गोपाळ यांचा उजवा डोळा पूर्णपणे निकामी झाला आहे. तिथे कृत्रिम डोळा बसवण्याशिवाय दुसरा कोणताच पर्याय उपलब्ध नाही. डाव्या डोळ्यानेही मेजर गोपाळना जेमतेम दिसत होतं. तरीही डॉक्टर त्यांच्या दृष्टीने प्रयत्न करतच होते. मेजर गोपाळ यांच्या चेहऱ्याचं झालेलं नुकसान प्लॅस्टिक सर्जरी करून भरून काढता आलं असतं पण त्यावेळी डोळे सर्वात महत्त्वाचे होते..

मेजर गोपाळ यांच्या युनिटमधला प्रत्येक जवान अस्वस्थ होता. का, असं का झालं, देशभक्तीने भारावलेल्या या तरुणावर अशी परिस्थिती का ओढवली हे आणि अनेक असे प्रश्न.. मात्र या प्रश्नांची उत्तरं कोणाचकडे नव्हती. फक्त प्रत्येकाच्याच हृदयात एक ठसठसणारी वेदना होती.. मेजर गोपाळ यांनाही माहीत होतं की आपण बरे होऊ पण त्याला बराच वेळ लागेल. त्यानंतरही पूर्वीसारखी दृष्टी प्राप्त होणार नाहीच. एकीकडे त्यांना मनातून भीती वाटत होती. मात्र तरीही या परिस्थितीला तोंड द्यायचं ही त्यांची जिद्द कायम होती.

त्यांच्या आयुष्यात एक वेळ अशीही आली जेव्हा त्यांना काहीच दिसत नव्हतं. मात्र उपचार, शस्त्रक्रिया यामुळे त्यांना डाव्या डोळ्याने हळूहळू दिसू लागलं. त्यानंतर उजव्या डोळ्याच्या जागी कृत्रिम डोळा बसवण्यात आला. डाव्या डोळ्याची दृष्टी सुधारण्यासाठीही बरेच प्रयत्न करण्यात आले. मात्र हा प्रतीक्षेचा काळ त्यांच्यासाठी खूप कष्टप्रद होता. त्यांच्या मित्रांसमोर मात्र त्यांनी कधीच या वेदना उघड केल्या नाहीत. गोपाळ त्यांच्यासमोर कायम हसत होते. त्यांनी आपली विनोदबुद्धी कायम ठेवली. एकदा त्यांच्या एका अधिकाऱ्याच्या पत्नीने त्यांना न राहवून विचारलं की ते अशा वेदना सहन करत असताना असं कायम हसरं राहणं खरंच इतकं गरजेचं आहे का? तेव्हा मेजर गोपाळ म्हणाले, ‘‘ज्यांना माझी इतकी काळजी वाटते त्यांच्यासमोर असं कायम हसत राहणं खरं तर खूप कठीण आहे. पण मला हे करणं गरजेचं आहे. माझी आई एकटी असताना रडते, माझे मित्र माझ्यासाठी हळहळ व्यक्त करतात, मला या गोष्टी थांबवायच्या आहेत. त्यामुळेच मी त्या दुर्दैवी अपघातानंतर त्या अनुभवातून बाहेर येऊ शकलो.’’
काळ हा सगळ्या दु:खावरचं औषध असतो. गोपाळ यांनी त्यांच्या आयुष्यातले बदल हळूहळू स्वीकारले. शक्य तितकं स्वावलंबी होण्याचा त्यांचा प्रयत्न होता. त्यांना अशा अधू दृष्टीने वावरणं काही वेळेला खूप त्रासदायक व्हायचं. त्यांच्या डाव्या डोळ्याची दृष्टी हळूहळू सुधारत होती. त्यासाठी त्यांच्या डोळ्यावर अनेक शस्त्रक्रिया करण्यात आल्या.

रात्रीनंतर सकाळ येतेच अशी एक म्हण आहे.. नशीब जणू सांगत की, ‘तू आयुष्यात खूप काही वाईट अनुभव घेतलेस आता तुला आयुष्याची चांगली बाजूही दिसेल.’ मेजर गोपाळ डेहराडूनला कम्प्युटर्सचं शिक्षण घ्यायला गेले. त्यांनी तिथे ब्रेल भाषाही शिकून घेतली. त्यावेळी त्यांची ओळख एका एनजीओमध्ये काम करणाऱ्या मिनी सेन ह्यांच्याशी झाली. गोपाळ मूळचे सिलीगुडीचे. मिनीही सिलीगुडीच्याच रहिवासी. त्यामुळे एकमेकांशी ओळख करून घ्यायला त्यांना काही फार त्रास झाला नाही. मेजर गोपाळ यांच्याशी ओळख झाल्यावर अवघ्या दोन आठवडय़ांत मिनी यांनी ठरवलं की मी लग्न करेन तर मेजर गोपाळ यांच्याशीच.. मिनी यांना भेटल्यानंतर गोपाळ यांच्यामध्ये झालेला बदल आश्चर्यकारक होता. मिनी कायम त्यांच्यासोबत राहून त्यांना पाठिंबा द्यायच्या, त्यांना मदत करायच्या, मेजर गोपाळ यांचं बोलणं ऐकून घ्यायच्या, त्यांना सल्ले द्यायच्या.. मेजर गोपाळ यांनी पुन्हा एक नवं आयुष्य जगायला सुरुवात केली होती. मेजर गोपाळ यांची दृष्टी अधू आहे असा विचार मिनी यांच्या मनातही आला नाही. ‘‘माझे वडील, कॅप्टन सेनगुप्ता १९६५ च्या युद्धामध्ये आंधळे झाले.’’ मिनी यांना मेजर गोपाळ यांच्या परिस्थितीवर कीव येत नव्हती. त्यांना वाटत होता जिव्हाळा. ‘‘मला परिस्थितीशी जुळवून घ्यावं लागणारच नाही. मी असा विचार करत नाही. आमचं एकमेकांवर प्रेम आहे आणि आम्ही आयुष्य एकत्र जगणार आहोत.’’ मिनी यांचा आत्मविश्वास आणि गोपाळ यांच्यावरचं त्यांचं प्रेम खरोखरच कौतुकास्पद..

मेजर गोपाळ यांच्या आयुष्यात नोव्हेंबर २००० मध्ये एक दुर्दैवी दिवस आला आणि त्यानंतर तीन वर्षांनी त्यांनी एका नव्या आनंदी जीवनाला सुरुवात केली. २००३ साली १९ नोव्हेंबर रोजीच त्यांनी सिलीगुडीमध्ये इतर लष्करी अधिकारी आणि कुटुंबीयांच्या साक्षीने लग्न केलं. बंगाली परंपरेनुसार ते दोघे विवाहबद्ध झाले. मेजर गोपाळ यांचे सासरे युद्धामध्ये अंधत्व आल्यानंतर आपल्या कुटुंबीयांच्या मदतीने पुन्हा आनंदाने जगत होते. त्यांची हिंमत खचली नव्हती. तोच वारसा आता त्यांचा जावई आणि मुलगी पुढे चालवणार होती.

गोपाळ यांची दृष्टी अशी काही जादू होऊन सुधारणार नव्हती. मात्र त्यांच्या आयुष्यात आलेला हा आनंद खूप महत्त्वाचा होता. त्यांनी पुन्हा एकदा पूर्णत्वाने जीवनाची मजा घ्यायला सुरुवात केली होती. त्यानंतर मेजर गोपाळ यांनी मुंबईमध्ये टाटा सामाजिक विज्ञान संस्थेमध्ये अभ्यास करण्याचा निर्णय घेतला. मिनी यांनी मेजर गोपाळ यांच्यावर दाखवलेला विश्वास त्यांनी सार्थ ठरवला.
त्या दोघांचं प्रेम हे खरोखरच आलौकिक आणि इतरांना प्रेरणा देणारं आहे..

कधीही करू शकतो जीवनाची नवी सुरुवात

थॉमस यांना नेहमी वाटत होते की, पूर्ण नावाऐवजी सर्वांनी त्यांना केवळ थॉमस म्हणून हाक मारावी. थॉमस या नावानेच भविष्यात आपली ओळख निर्माण करणार असल्याचेही ते शालेय जीवनात मित्रांना सांगायचे. त्यांनी अथक पर्शिम केले व पाच वर्षांच्या संघर्षानंतर सैन्यदलात सामील झाले. त्यानंतर ते कॅप्टन थॉमस झाले. इतर तरुणांप्रमाणे थॉमसही स्वत:साठी एक उत्तम जीवनसाथी शोधत होते. त्यांच्या वडिलांचीही मनोमन हीच इच्छा होती की, आपल्या मुलाने स्वत: भावी जोडीदार निवडावा. थॉमस यांचा सीमेवर अनेकदा दुश्मनांशी सामना व्हायचा. परंतु त्यांच्या वडिलांना याची थोडीही काळजी नव्हती. कारण, त्यांच्या पिढय़ान्पिढय़ांनी देशासाठी सेवा केलेली होती. त्यांच्या कुटुंबातील कुठलाही सदस्य रणभूमीवर शहीद झाला नाही. मात्र, कॅप्टन थॉमसच्या बाबतीत असे घडले नाही. ते एकदा सुरुंगांचे प्रात्यक्षिक घेत होते. त्याचवेळी तेथे मोठा स्फोट झाला आणि त्यांच्या उजव्या पायाला गंभीर दुखापत झाली. कॅप्टन थॉमस यांना विशेष उपचार मिळावेत यासाठी त्यांना गंभीर जखमी अवस्थेत हवाईमार्गे पुण्यातील विशेष रुग्णालयात दाखल करण्यात आले. आर्टिफिशियल लिंब सेंटर (एएलसी) हे असेच एक विशिष्ट रुग्णालय आहे. या ठिकाणी युद्धात किंवा प्रशिक्षणात जखमी झालेल्या व हात-पाय गमावलेल्या धाडसी सैनिकांना कृत्रिम अंग, उपकरण आणि पुनर्वास सुविधा उपलब्ध करण्यात येते. थॉमस यांच्यासोबत घडलेल्या दुर्घटनेमुळे ते पूर्णपणे खचून गेले होते. आपले लग्न कधी होणार व संसार कसा करायचा याची काळजी त्यांना वाटत होती. नर्सिंग ऑफिसर लेफ्टनंट मेरी ही एएलसीची इंचार्ज होती. ती अनेक रुग्णांना कधी प्रेमाने तर कधी कडक शब्दांत बोलून सांभाळायची. युद्धादरम्यान आपले अवयव गमावणार्‍या 99 टक्के रुग्ण एएलसीमधून गर्वाने आणि आत्मविश्वासाने तेथून जात असे. कृत्रिम अवयवासोबतही आनंदी जीवन जगता येते ही बाब मेरीने चार महिने थॉमस यांना समजावल्यानंतर ती गोष्ट त्यांना समजली. सहा महिन्यांनंतर ते कृत्रिम पायांवर उभे राहू लागले आणि तीन महिने झाल्यानंतर ते हळूहळू चालू लागले. तोपर्यंत दोघांनाही कळाले नाही की, ते एकमेकांवर प्रेम करू लागले होते. ते नेहमी रुग्णालयाच्या परिसरात एक-दुसर्‍यासोबत हसत-खेळत राहत असत. परंतु कोणीही त्यांच्याकडे संशयाच्या नजरेने पाहत नव्हते. कारण, सर्वांना माहिती होते की, मेरी रुग्णाची खूप काळजी घेते. शेवटी कॅप्टन थॉमस यांचा डिस्चार्ज होण्याचा दिवस उजाडला. थॉमस तेथून जात असताना मेरीच्या डोळ्यांतून अर्शू येत होते. मेरी जवळपास एक आठवड्यापर्यंत निराश आणि गुमसुम राहत होती. बरोबर एक आठवड्यानंतर कॅप्टन थॉमस त्यांच्या फियाट कारने एएलसीमध्ये आले. कारवर एक बॅनर होता व त्यावर लिहिले होते, ‘मेरी, विल यू मॅरी मी ? युवर थॉमस.’ त्यानंतर जे झाले तो इतिहास आहे. आता 2012 मध्ये ब्रिगेडियर थॉमस आणि कर्नल मेरी सेवानिवृत्त झाले आहेत. त्या दोघांना सायंकाळच्या वेळी पुण्यातील साळुंके विहार कॉलनीत एकमेकांसोबत फेरफटका मारताना आपण पाहू शकतो.शरीराचा कुठलाही अवयव गमावल्यानंतर जीवन समाप्त होत नाही. जीवनाची एक नवी सुरुवात आपण करू शकतो.

— ब्रिगेडियर हेमंत महाजन (नि.)

ब्रिगेडियर हेमंत महाजन (नि)
About ब्रिगेडियर हेमंत महाजन (नि) 288 Articles
ब्रिगेडियर हेमंत महाजन हे राष्ट्रीय सुरक्षा या विषयावर नियमितपणे लेखन करत असतात. त्यांचे लेख मराठीतील अनेक वर्तमानपत्रांत नियमितपणे प्रसिद्ध होतात. अनेक दूरचित्रवाणी वाहिन्यांवर ते नियमितपणे तज्ज्ञ वक्ते म्हणून कार्यक्रमांत सहभागी असतात.

महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..