गडकरी मास्तरांना पत्र …

आदरणीय मास्तर… साष्टांग दंडवत …

आजची तुमची बातमी वाचून रडलो आणि तुम्हालाच पत्र लिहून काही प्रश्न करावेसे वाटले. तुमच्या कविता आणि धडे वाचून चार अक्षरे वाचण्याच्या अन लिहिण्याच्या भानगडीत मी पडलो. पण आजची घटना पाहून तुम्हाला विचारावे वाटते की, मास्तर तुम्ही हा लेखनाचा आटापिटा का केला होता हो ? आचमने करून अन मास्तरकी करून तुम्ही सुखासमाधानात का जगला नाहीत ? चार भिंतीच्या एका खोलीत आपला फाटका संसार मांडून जगण्याच्या वंचनेत मृत्यूस कवटाळणारया एका मास्तराची इतकी का भीती वाटावी की रात्रीतूनच त्याचा पुतळा फोडावा लागतो ? आज तुम्हाला उत्तर द्यावेच लागेल…

“मंगल देशा ! पवित्र देशा ! महाराष्ट्र देशा !
प्रणाम घ्यावा माझा हा श्री महाराष्ट्र देशा …”

ही कविता लिहून तुम्ही काय मिळवलंत गडकरी ?

तुमच्या नावात राम असला म्हणून काय झाले सद्यराज्यात रावण जास्त सक्रीय आहेत … तुम्ही माणसं ओळखून लिहायला पाहिजे होतं. तुम्ही चुकलात हो !
गोविंदाग्रज म्हणून आम्ही तुम्हाला मस्तकी मिरवत राहिलो आणि आज तुम्ही छिन्न विच्छिन्न झालात तरी आम्ही नेहमीप्रमाणे नुसते मख्ख बघत राहिलो !
मास्तर, आमच्यापेक्षा तुम्ही शब्दबद्ध केलेली ती जर्जर ‘सिंधू’ बरी की हो, जिने ‘सुधाकरा’च्या ‘एकच प्याल्या’ची नशा उतरवली. आम्ही तथाकथित सुसंस्कृत जातीयतेचे जहरी प्याले पित राहतो अन पाजतही राहतो ! पण आमचे कोणीच काहीच वाकडे करू शकत नाही !! आमच्यातला हा तळीराम जरा वेगळा आहे. तो कधी भगवा असतो तर कधी निळा तर कधी हिरवा ! मी काय म्हणतोय हे तुम्हाला कदाचित कळणार नाही, मास्तर तुम्ही रंगांधळे होतात का हो ?

“जरिपटक्यासह भगव्या झेंड्याच्या एकचि देशा
प्रणाम घ्यावा माझा हा श्री महाराष्ट्र देशा !….”

असं तुम्ही लिहिलंय ! इथे भगव्याच्या व्याख्या माहिती नसलेले लोक तुम्ही इहलोक सोडून दशकं लोटली तरी तुमच्या जीवावर उठलेत हो !
का तुम्ही प्रणाम केलात ह्या महाराष्ट्राला ? का तुम्ही जरिपटक्यावर जीव लावलात?

“अंजनकांचन करवंदीच्या काटेरी देशा , बकुळफुलांच्या प्राजक्ताच्या दळदारी देशा’

मास्तर या पंक्तीत तुम्ही दळदारी असं न लिहिता दरिद्री असं लिहायला हवं होतं…. नाहीतरी किती जणांना दळदारीचा अर्थ ठाऊक आहे ? मराठी भाषा आणि मराठी साहित्यावर इथे नावालाच प्रेम केलं जातं ! अन तुम्ही तर एक क्षुद्र कस्पटासमान लेखक की हो ! तरीही काही जणांना तुमचा चेहरा नकोसा वाटतो. ते तुम्हाला भीतात मास्तर !

आपले मूल मरणपंथाला लागल्यावर ‘राजहंस माझा निजला’ असे हळवे काव्य लिहिणारे तुम्ही जगाला कसे उमगणार हो मास्तर ? काय गरज होती तुम्हाला नाटके लिहिण्याची ? तुमच्या नाटकांना इंग्रज घाबरले असतील. ते गोरे देश सोडून गेले पण आता काळे इंग्रज त्यांचा वारसा चालवत आहेत. गोरयांनी तुमच्या अंगाला हात लावायचे धाडस केले नव्हते पण आताच्या त्यांच्या वंशजांनी चक्क तुमचा पुतळा फोडून त्याचे अवशेष गटारात टाकून आपली अतृप्त विकारवासना शमवून घेतलीय. केव्हढा हा डंख !

“काही गोड फुले सदा विहरती स्वगागनांच्या शिरी,
काही ठेवितसे कुणी रसिकही स्वच्छंद हृन्मंदिरी ….”

असलंच काव्य तुम्ही सातत्याने का लिहिलं नाहीत मास्तर ? का समाज प्रबोधन करता बसलात ? काय गरज होती देशप्रेम जागवण्याची ? इतके कसे हो तुम्ही अल्पबुद्धी ? ‘साजूक तुपावरील नाजूक कविता’ हाच विषय तुम्ही का कायम ठेवला नाही ? काही तरी तुम्हाला खुलासे करावेच लागतील …

“आहे जो विधिलेख भालिं लिहिला कोणास तो नाकळे ॥
आहे जो सुखदु:खभोग नशिबीं, कोणास तो ना टळे ॥”

असंही तुम्ही लिहिलंय. आता मला सांगा की, पुतळा फोडण्याचा विधिलेख तुमच्या भाळी होता का ? की हा भोग टाळता आला असता ? कदाचित रक्षणकर्ते आणि भंजक दोघेही एक असावेत त्यामुळे हा योग कधी टळला नसता. तुम्ही हे तेंव्हा ओळखून लिहिलंत. तुम्ही अंतर्ज्ञानी होतात का ?

“इश्काचा जहरी प्याला।
नशिबाला ज्याच्या आला॥ हा असा॥
टोकाविण चालु मरणे।
ते त्याचे होते जगणे॥ सारखे॥”

मास्तर तुमच्या नशिबी इश्काचा प्याला येण्याऐवजी काही लोकांनी प्रेमाने जतन केलेला तिरस्काराचा प्याला येऊ पाहतोय. असूद्यात, हरकत नाही. कारण ‘टोकाविण चालु मरणे’ असं तुम्ही पूर्वीच सांगून ठेवलेय.

मास्तर तुम्ही एकदा भावूक होऊन जात लिहिलं होतं की,
“क्षण एक पुरे प्रेमाचा।
वर्षाव पडो मरणांचा। मग पुढे॥”

असे पुतळे फुटणार हे कदाचित तुम्हाला आधी कळून चुकले असावे. वर्षाव पडो मरणांचा असं तुम्ही लिहिलंय त्यामुळे असे कितीएक पुतळे फुटले तरी तुम्हाला काही फरक पडणार नाही हे नक्की !

“स्मरणार्थ तयाच्या ही बोलांची रानपालवी।
मराठी रसिकांसाठी ’गोविंदाग्रज’ पाठवी॥”

तुमची ही पालवी काही लोकांच्या डोळ्यात सलते ना ! तेंव्हा कृपा करून अशी शब्दपालवी पुढील जन्मी मराठी साहित्यशारदेच्या दरबारी वाहू नका.

१३६, कसबा पेठेतदेखील आता काही शिल्लक राहीले नाही. १९१९ मध्ये याच वास्तूत तुम्ही अखेरचा श्वास घेतला होतात. इथल्या सिन्नरकर वाड्यातील तिसऱ्या मजल्यावरील खोलीत तुम्ही वास्तव्यास होतात. मात्र, काळाच्या प्रवाहात ही गोष्ट इतिहासजमा झाली. आमच्या शासनाकडून व साहित्यप्रेमी मंडळीकडून यथावकाश तुमच्या खोलीकडे सोयीस्कर दुर्लक्ष झाले याचा राग मनात धरू नका. तुमची खोली जोपासून कुठल्या सरकारला काय फायदा होणार होता ? त्यापेक्षा जुने जाऊदया मरणालागुनी हे आम्हाला फार कळते हो ! तुम्ही आपले साहित्य संमेलनापुरते उरलात हे देखील तुम्ही ध्यानात ठेवा !
तुमच्या माथी ‘राजसंन्यास’ कायम राहणार आहे, चिंता नसावी.

तुमची ‘चिंतातूर जंतू’ ही कविता आजही प्रसिद्ध आहे. या कवितेत तुम्ही विनाकारण नको त्या गोष्टींची चिंता करून स्वत:सह जगाच्या डोक्याला ताप देणाऱ्या उपद्व्यापी ‘चिंतातूर जंतूं’ना काही मोलाचे (अन् शेलके) सल्ले दिले आहेत. त्यात चिंतातूर जंतू म्हणतो, ‘उगाच पाणी पहा पुराचे फूकट वाहते कितीतरी’ त्यावर तुम्ही म्हणता की, ‘पहावत नसेल तुला जर ते उडी टाक तू त्या पुरात!’ चिंतातूर जंतू पुन्हा म्हणतो; ‘उगाच वाहते हवा मोकळी, वाया जाते फुकाच ती’ त्यावर तुम्ही पुन्हा म्हणता की, ‘नाक दाबूनी जीव दे अन् कर बचत तूच हवा’ एवढे सांगूनही चिंतातूर जंतूची चिंता थांबतच नाही. अखेर तुम्ही वैतागून म्हणता की, ‘देवा तो विश्वसंभार राहूद्या, जरी राहिला तरी या चिंतातूर जंतूना, मुक्ती द्या आधी’

आता माझा साधा आणि अखेरचा प्रश्न. किमान याचे उत्तर तरी तुम्ही द्यावे. मास्तर, ज्यांनी आज पुण्यात तुमचा पुतळा फोडला तेच हे चिंतातुर जंतू होत का ? तुम्ही यांना ‘जंतू’ म्हणालात पण काहींना हे वाघ सिंह वाटतात. आता एखादे जंतूनाशक पण तुम्हीच सुचवा मास्तर कारण सरकारमध्येही काही जंतू आहेत, व्यवस्था तर जंतूमय झालीय आणि माझ्यासारखे बाजारबुणगे साहित्यप्रेमी जंतू मारण्या इतकं धाडस हरवून बसले आहेत. तेंव्हा मास्तर यावर उतारा तुम्हीच सुचवायचा आहे.

तुमच्यावर माझी फार श्रद्धा आहे. आशा करतो की तुम्ही माझ्या पत्राचे उत्तर द्याल. ‘बाकी सर्व ठीक आहे..’ हे नेहमीचे पालुपद लिहून थांबतो. आणि हो, एक सांगायचे राहिले, कोणी काही म्हणो मायमराठीच्या माझ्यासारख्या फाटक्या रसिकांच्या हृदयाशी असणारे तुमचे ‘भावबंधन’ चिरंतन असेल याची ग्वाही मात्र छाती ठोकून देतो !

– तुमचाच,

समीरबापू गायकवाड.

वि.सू. – आपल्या माय मराठीची अवस्था अजूनही तशीच आहे. जी तुम्ही शतकापूर्वी वर्णिली होती –

‘आठवणींचा लेवून शेला नटून बसली माय मराठी
दिवस झेलतो सुसाट वारा तरीही दिव्यात जिवंत वाती
जगण्यामधल्या अर्थासंगे बहरून गेले अक्षर रान
वाऱ्यावरती थिरकत आले झाडावरूनी पिंपळपान….’ )महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

50-chandrabhaga

पंढरपूरची चंद्रभागा नदी

भीमा नदी पंढरपुरात चंद्रभागा नावाने ओळखली जाते. भाविक पंढरीत पाऊल ...
p-2281-kadav-ganpati-temple

दिगंबर सिद्धीविनायक, कडाव

कर्जत तालुक्यातील कडाव गावामधील हे बाल दिगंबर गणेशाचे अतिप्राचीन मंदिर ...
p-2062-Ralegan-Siddhi-04

पर्यावरण संवर्धक राळेगणसिध्दी

अहमदनगर जिल्ह्यातील राळेगण सिध्दी हे गाव मध्य महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्याच्या पारनेर ...
marathi-barakhadi-chaudakhadi

मराठी बाराखडी आता चौदाखडी

मराठी बाराखडीची ओळख तर आपल्या सर्वांना शाळेपासूनच होते. मात्र आता ...

Loading…

About समीर गायकवाड 155 लेख
समीर गायकवाड हे अनेक विषयांवर इंटरनेटवर लेखन करत असतात. त्यांचे लेखन अतिशय वास्तववादी असते. गायकवाड यांना विषयाचे कोणतेही बंधन नाही. ते जसे वैचारिक लेखन करतात तसेच चित्रपटांची परिक्षणेही लिहितात. समीर गायकवाड हे सोलापूरचे रहिवासी आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*