नवीन लेखन...

जमवा–जमव

शब्दांची जमवाजमव सुरु होती. काय बोलावं?… काही सांगावं की सुरुवात विचारण्यापासून करावी कळत नव्हतं.

खोलीत नुसतं गरम होत होतं कुठेच काही हरकत होत नव्हती. खिडकीच्या काचातून डोकावणाऱ्या तारका मंद झाल्या होत्या. वारा साधं पान पण हलवत नव्हता. खिडकीतून दिसत असलेले बदामाचे पानं हले ना डुले सारखे नुसतेच ढिम्म. कुठेच ‘सुरुवात’ म्हणून नव्हती.

इतक्यात अलार्म वाजला. माझ्या उशी खालीच घड्याळ निघालं. रात्री साडेअकराचा अलार्म. आत्ता पर्यंतच्या सगळ्या कार्यात मुहूर्त सांभाळायचं काम करणारं घड्याळ आज ठरलेल्या मुहुर्तात व्यत्यय आणण्याचं काम करणार होतं. मला संभाव्य धोक्याचा अंदाज आला. मी मग रूमभर शोधलं, ६ अलार्म घड्याळे मिळाली. एकएक करून सगळ्यांचा अलार्म बंद केला. दोन्ही हातात सहा घड्याळ घेऊन टेबलावर नीट ठेवता येतील का पाहिलं पण तिथे आधीच काजू किशमिशच्या बाटल्या, फळं, दुधाचा ग्लास, पाण्याचा तांब्या असल्या एक ना सतरा गोष्टी मांडून ठेवलेल्या.

मग मी उठून घड्याळ समोरच्या शेल्फमध्ये ठेवून आलो. येताना माझं मलाच हसू आलं ‘अरे आयडियात तरी नावीन्य आणा” जेव्हापासून अलार्मचं पाहिलं घड्याळ मराठवाड्यात आलं तेव्हापासून हीच एक आयडिया, इतकी बोद्धिक दिवाळखोरी. स्माईललो, अन लक्षात आलं. नसताना उगीच ते माझं पवित्र स्माईल चावट वाटू नये म्हणून मग लगेच तोंड फिरवून स्वीचबोर्डवरच्या फॅनचं रेग्युलेटर उगीच फिरवून बघितलं. आजून तरी भारतात पाचच्या वर स्पीड जात नाही याचा पूनः साक्षात्कार झाला. गरम झाल्यानं अंगातला नवा झब्बा टोचलालता नुसता. नव्या कपड्यानं गर्मी जास्त होतीय हे आजच्या रात्री जास्तच जाणवत होतं.

तसंही मी कधीच कपडे घालून झोपत नाही पण आत्त्ता तसं कसं शक्य होत? आता ‘हा’ अन पुढे असले किती बदल अंगवळणी पाडून घ्यायचे होते कुणास ठाऊक.

ही एक घड्याळी रात्र होती. सेकंद काटा मिनिट काट्याच्या स्पीडने पळत होता. कोपऱ्यात रेडिओ दिसला म्हणलं लावावं विविधभारती केंद्र, पण लगेच विचार अव्हेरला. म्हटलं साला आजच्या रात्री अविनाश हाथगुडे, साहिर लुधियानवी यांनी गीतबद्ध खय्याम यांनी संगीतबद्ध केलेलं मुकेश आणि लता मंगेशकर यांच्या आवाजातील कभी कभी या चित्रपटातील ‘ते’ गीत लावायचा. उगीच अवघडल्यात अजून जास्त अवघडलेपण आला असता. शशी कपूर आणि राखी खोटं खोटं एक्टिंग करत होते पण आपलं खरं खरं होतं ना. आता मी पलंगाच्या एका टोकाला अंग चोरून बसलो होतो, आपल्याच घरात आपल्याच पलंगावर.

कुठूनतरी सुरुवात होणं गरजेचं आहे हे कळत होतं म्हणून मग उगीच एकदा खाकरलं पण त्यानं समोरच्याचे कान टवकारले का? हे मात्र पाहिलं नाही. एवढी मोठी ४० किलोची मुलगी ती कधी नीट बघितली नाही म्हणजे आजून देखील. अन आता तिचा काही ग्रामचा कान पाहायचा…माझं मलाच हसू आलं. बरंच झालं हसू आलं. हसलं की माणूस चमकतोय अन आता आपल्या चेहऱ्याला या क्षणी चमकीची गरज आहे…मनातल्या मनात मारलेल्या जोकवर मी मनातल्या मनात जोरदार हसलो त्याचा तरंग चेहऱ्यावर पसरला ओठांचा से ‘चीझ झालेला’.

पुन्हा खाकरलो बोललो मात्र काहीच नाही. पण या वेळच्या खाकरण्याचा उपयोग मात्र झाला. समोरच्या तांब्यातलं पाणी फुलपात्रात गेलं अन गळवट भरलेलं फुलपात्र आलं माझ्या चेहऱ्यासमोर. याही वेळेला मी फुलपात्रंच पाहिलं. हात दिसण्याच्या आधीच नजर काढून फुलपात्र हातात घेतलं. पाणी घेतलं दोन घोट, घसा कोरडा नव्हता तरी. फुलपात्राचा हात खाली आणताआणताच पाहिलं मी बसलोय तिथून टेबल हाताच्या अंतरावर नाही. आता उष्ट फुलपात्र व्हाया ‘पास’ करायचं की स्वतः उठून जागच्या जागी ठेवायचं… यक्षप्रश्न?

मी एकदा मान वर केली तिला परत जागेवर घेतलं अन थोडासा उठता झालो निर्णय झाला होता. नेहमीसारखंच आपलं काम आपण करायचं. इतक्यात समोर पुन्हा तो हात फुलपात्र हाती सोपवताना पाहिलं, या वेळेला नीट पाहिलं गडद मेहंदीने रंगलेला तो हात ‘गोरा होता’ जितकं ऐकलं होतं त्यापेक्षा कितीतरी जास्त.

फुलपात्र कधीचंच हाललं होतं पण तो गोरा हात काही हालत नव्हता डोळ्यासमोरून.

त्या आरसपानी हाताचं संपूर्ण नाव जिथं तिथं मेथीच्या भाजीबरोबर, सोन्याच्या ताटातील जिलेबीबरोबर कित्येकदा ते उच्चारलं होतं उखाण्यात. तिच्या कुटुंबाची घराच्या पत्त्या सहित माहिती होती. काय करतेय म्हणजे काय शिकलीय? कुठे राहतीय हे सुद्धा माहित होतं. त्यामुळं उगीच पुन्हा एकदा तेच, नाव काय तुमचं? काय शिकलोय? पुढे काय करायचा विचार आहे? असले फुकाचे प्रश्न विचारायला कसतरी वाटत होतं. अन ही वेळ तसलं बोलायची म्हणजे फक्त बोलायची होती का? थोडक्यात पुन्हा खाखरण आलंच पण गोऱ्या हातानं पाणी पाजवल्याची आठवण झाली अन त्या बिचाऱ्याला मी गळ्यातल्या गळ्यात दाबलं… आवंढा.

मला आता अंदाज येण्यावर होता ‘के भैया ही जमवाजमव वाटतीय तितकी सोपी नसतीय’.

पुन्हा विचार चक्कर. अगदीच पुस्तक नं वाचताच डायरेक्ट पेपर सोडवायला येणाऱ्या ठोंब्या पैकी नव्हतोच मी. ओरल आणि थेरॉटिकल बरीच तयारी केलेली मी ही रात्र येण्याआधीच. पण, ऑन ग्राउंड वर्किंग आणि तुमचं थेरॉटिकल नॉलेज यातली तफावत मी डिग्रीत जे शिकलो अन त्यानंतर केलेलं माझ पहिलं काम यात चांगलीच अनुभवली होती. नुसता गोंधळगोंधळ होत होता. मी त्या गोंधळात इकडं तिकडं पाहिलं त्यातल्या त्यात तिकडं जास्त पहिलं. अन तिकडं पहिलं तरी या वेळेला आपल्याला कुणीच पाहत नाही अन ज्याला पाहतोय त्याला त्याचं फार वाईट वाटत नाही याचा अंदाज आला. थोडं बरं वाटल. विचारलं, “तुम्ही पैंटिंग करता का हो? नाही म्हणजे तुमची बोटं लांब आहेत, कलाकाराची असतात म्हणे” मी एका झटक्यात बोललो. समोरून बांगड्यांचा किणकिणाट आधी आला अन, “इंटरमिजिएट देत होते तेव्हा करत होते त्यानंतर फक्त बॉटनीच्या फिगर रेकॉर्ड बुकमध्ये”

एक्दम घाबरट “करते” किंवा नुसतंच “हम्म” ऐवजी आलेलं ते पूर्ण वाक्य ऐकून मला पुन्हा अंदाज आला ही जमवाजमव खरंच वाटतिय तितकी अवघडपण नाही. केल्याने होतं आहे रे अशीच आहे. आता मी बसल्या जागी थोडं सावरलो, कणा हलकासा ताठ केला मान फिरवून मोकळी केली…साठली होती. या दिड महिन्यात आलेलं अवघडलेलपण आता थोडं कमी कमी होतंय जाणवत होतं. उठलो खिडकी उघडली वारा आला बरं वाटलं. वळत पुन्हा एकदा तिकडं नजर फिरवली या वेळेला समोरची नजर पण इकडं होती. पाहिलं..आधी डोळे हसले मग दोघांचे ही ओठ, अजून थोडं हलकं वाटलं. बसता बसता बोललो, “नांदेड किती टपरं आहे कसं राहता हो तुम्ही?”

या वेळेला मनात नाही दमात हसलो ती पण हसली म्हणाली ‘ कुमारमामा आहेत नं माझे उदगीरचे?”

माझे कान टवकारले अन माझं मलाच यावेळी कळलं की कान टवकरतात ते फक्त मनात, फिज़िकली ते जागच्या जागी असतात फक्त आपली मान, डोळे, डोकं, कर्मेंद्रिय म्हणतात ते सारे सेन्सेस बोलणाऱ्याकडे केंद्रित होतात, असो

“कुमारमामा म्हणजे माझ्या बाबाचे दोस्त….बी अँड शीतले??”,मी. तिने मानेनेच ‘हो’ सांगितले अन पुढे म्हणाली, “हो हो तेच त्याच्याकडे मी यायची अन त्यालाही हेच म्हणायची” माझ्या तोंडातून सटकन निघालं, “काय म्हणायचीस?’

“की तुमचं उदगीर टपरं आहे” ती खुद्कन हसली.

तिच्या त्या स्वछ दाताच्या लायनी अन त्यात डोकावणारा एक्सट्रा लार्ज सुळा, ही थोडी मौसमी चट्टेर्जीसारखी दिसतीय का हसताना? आपल्याला कसं आधी लक्षात नाही आलं? फोटोत काहीतरी वेगळीच दिसलेली…चारचौघी सारखी. अन आधी जितक्यांदा लाईव्ह पाहिलं तितक्यांदा आपण कुठं नीट पाहिलं? खरं म्हणजे नीट काय थोडं पण नाही पहिलं. म्हणजे बघायला गेलो तेव्हा एकदा, नंतर साखरपुडा, नंतर व्याही भोजन, एकदा सोबत कपडे घ्यायला गेलो तेव्हा. अन एकदा बट्या अन अक्कानी आगाऊपणा करून जुळवून आणलेलं. आलो भेटायला ठरवलं होतं भरपूर बोलायचं, बाहेर खायचं, गुरुद्वारा पाहायचा, मुन्नाभाई पाहायचा पण आपल्या भेटीची कुणकुण तुझ्या बाबाला लागली त्यांना ते आवडलं नाही. माझ्या बाबांनासुद्धा ते थिल्लरच वाटलं. खैर आपली भेट झालीच पण बघायला आलो होतो तशीच …या वेळेला फक्त तुझ्या माणसांच्या गराड्यात. थोडक्यात त्याही वेळेला मी तुला पाहिलीच नाही.

म्हणजे तसं पाहिलं पण नीट छापलीच गेली नाही इमेज डोक्यात. माझे डोळे फक्त पाहायचे आईबाबा आक्का, बट्या, हिचे आईबाबा, काका काकू, मध्यस्थ, माझे मित्र, आमच्या दोघात असलेला तो सेन्टर टेबल, त्यावर असलेले पन्नास जिन्नस, ते पोहे बेसनाची वडी इतक्या सगळ्या गोष्टीत बिचारी झाकोळून गेली. फोन केलेले मी, पण कळतंच नव्हतं काय बोलायचं. तुला म्हणायला केलेल्या फोनवर तुझ्या आख्या खानदानाला तिळगुळ घ्या गोड गोड बोला म्हणायचा कंटाळा यायचा. अन तहीइ उगीचंच इमेज नं ठसलेल्या कसलाच आकार नसलेल्या अनोळखी पण आपलं म्हणून अरेंज केलेल्या आवाजाला काय बोलायचं…

“छान हस्तियस” माझ्या तोंडातून मला नं विचारता पुन्हा एकदा सटकन निघालं. हसण्याचा बांगड्यांचा तो उत्फुल्ल आवाज यकायक आता थांबला. आता जाणवत होती ती फक्त अनामिक थरथर. पुन्हा एकदा तसंच, मी शांत ती शांत पुन्हा तेच अवघडलेपण.

बसल्या जागी नजरेसमोरून सरकत होता फ्लॅशबॅक ‘इसके पहले अब तक’ चा आत्ताच काही मिनिटांपूर्वी घंटाभर हसून खिदळून माझे ५००० ढिले करून माझे दोस्त वहिन्या, उत्साही पाहुणे मंडळी, कझिन्स गेली होती. त्याच्या काही मिनिटे आधी तिच्या आई बाबानी माझ्या आई बाबा समोर तिला ओवाळुन औक्षण केलेलं. सकाळी उपाध्यायकडून, रघु महाराजांच्या मुहूर्त बरहुकूम फलशोभन विधी पार पाडलेला. त्या आधी काही सेशनमध्ये आजच्या रात्रीबद्दल माझ्या अनुभवी मित्रांनी डीव्हीडीनी, डॉक्टरनी थेरॉटिकल समजावलेलं. थोडक्यात बारावी सायन्समध्ये येऊन गेलेली फर्टीलायझेशनची माहिती पुनर्प्रसारित केली होती आपआपल्या केंद्रावर, समजावण्याच्या आपआपल्या पद्धतीने. त्याच्या आधी चार दिवस देवा ब्राम्हणांच्या साक्षीने आमचं लग्न लागलेलं अन आता या क्षणी आम्ही दोघ एकत्र होतो फुलांच्या माळांनी सजवलेल्या पलंगावर. बेडशीटवरच्या फुलांच्या खाली काचकूर कलर टाकला होता आम्ही एकमेकांनी एकमेकांच्या रंगात रंगावं म्हणून.

पुन्हा शब्दांची जमवाजमव सुरु होती. काय बोलावं… काही सांगावं का सुरुवात विचारण्या पासून करावी कळत नव्हतं.

— प्रसाद कुमठेकर
(ही कथा आधी bookhungama.com च्या नुक्कड या सदरात १८ ऑगस्ट २०१७ रोजी प्रसिद्ध झाली होती )

1 Comment on जमवा–जमव

  1. वा छान !
    हे आणखी वाढवलं तर एक छान एकपात्री प्रयोग होऊ शकतो.
    विचार कर.

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..