मानवी शरीरातील सप्तचक्रे आणि अंतस्त्रावी ग्रंथी.
|
|||
........गजानन वामनाचार्य उर्फ जी. वामन.
|
|||
रविवार १ एप्रिल २०१२
शरीर आणि मेंदू यांचे सुयोग्य संतूलन होण्यासाठी योग्य आहार, पुरेशी झोप, व्यायाम, आरोग्य आणि मनस्वास्थ्य यांची आवश्यकता असते. मनस्वास्थ्यासाठी योगाचरणे आणि योगाभ्यासाची गरज आहे. जाणीव, मन, बुध्दी, भावना, विचार, विवेक वगैरेंसाठी, शरीरात, कुठेही अलग अलग केन्द्रे नाहीत. ही सर्व केन्द्रे मेंदूतच असतात. सजीवांना चेतना असते तसेच जाणीव, म्हणजे कॉन्शसनेस असतो हे देखील मेंदूतल्या विशिष्ट भागातील पेशीमुळेच शक्य झाले आहे. मानवी शरीरात अनेक उर्जास्थाने आहेत हे रुशीमुनींनी फार पूर्वीच ओळखले. योगशास्त्रात सात चक्रांची संकल्पना रूढ झाली आहे. शरीरातील या, अनेकांपैकी महत्वाच्या, उर्जाकेन्द्रांना विशिष्ट नावे दिलेली असून ही केन्द्रे शरीराच्या व्यवहाराला आणि कर्मेन्द्रियांना कशी मदत करतात हेही विस्ताराने सांगितले आहे. चक्रे आणि नाड्या सुषुम्ना, मेंदूच्या खालच्या भागापासून सुरू होते, मान आणि मेरुदंडातून म्हणजे स्पायनल कॉलममधून माकडहाडापर्यंत जाते. इडा ही मेरुदंडाच्या डाव्या बाजूस तर पिंगला ही उजव्या बाजूस असते. आयुर्वेदाचा वैद्य जी नाडीपरीक्षा करतो ती, खरे म्हणजे शुध्द रक्तवाहिनी धमनी असते. कानशीलाजवळ आणि मनगटाजवळ ती उडतांना आढळते. तिच्या स्पंदनावरून रोगनिदान करता येते. ज्यावेळी ह्रदयाकडून शरीराकडे रक्त पाठविले जाते त्यावेळी ही नाडी उडते आणि ज्यावेळी ह्रदय प्रसरण पावलेले असते त्यावेळी ही नाडी खाली गेलेली असते. चक्रांच्या जागा. १. सहस्त्रार चक्र (Crown चक्र) जागा...मेंदू.
स्वाधिष्ठान चक्र आणि मूलाधार चक्र यांच्या जागांविषयी थोडे मतभेद आहेत. काही साधक, स्वाधिष्ठान चक्राची जागा मेरूदंडाच्या खालच्या टोकापाशी समजतात आणि मूलाधार चक्राची जागा, ओटीपोटाखालच्या त्रिकोणी जागेत समजतात. मूलाधार चक्र हे सर्वात खालचे चक्र आहे याबद्दल मात्र एकमत आहे. योगशास्त्रानुसार सात चक्रांचे वर्णन :: २. आज्ञाचक्र : या चक्राची जागा मेंदूत असून, समोरून पाहिल्यास ते कपाळावर दोन भुवयांच्या मधील जागी असल्यासारखे वाटते. हे चक्र प्रभारित किंवा कार्यक्षम रहावे म्हणून कपाळावर गंध किंवा भस्म लावण्याची परंपरा आहे. याला दोन पाकळ्या आहेत. रंग : निळा. या चक्रावर लक्ष्य केंद्रित केल्यास तुमची अध्यात्मिक शक्ती वाढते अशी समजूत आहे. या चक्राला तिसरा डोळा असेही म्हणतात. भगवान शंकराने हा डोळा उघडला तर त्यातून निघणार्या शक्तीकिरणांनी राक्षस मरत असत. ३. विशुध्द चक्र: या चक्राचा रंग अस्मानी असून त्याला १६ पाकळ्या आहेत. जीवात्मा ही या चक्राची देवता आहे. ४, अनाहत चक्र : रंग..हिरवा. याला १२ पाकळ्या आहेत. ह्रदय आणि फुफ्फुसे याच्या कार्यांना, या चक्रामुळे शक्ती मिळते. ५. मणिपूर किंवा नाभी चक्र : रंग : पिवळा. हे चक्र पाठीच्या कण्यात, बेंबीच्या मागच्या भागात आहे. १२ पाकळ्या. विष्णू ही देवता आहे. जठर, यकृत, मूत्रपिंड आणि आतडी यांना, या चक्रामुळे प्राणशक्तीचा पुरवठा होतो. ६. स्वाधिष्ठान चक्र : रंग... नारिंगी. ६ पाकळ्या. हे चक्र जननसंस्थेच्या मागच्या बाजूस असते. प्राणायाम आणि ध्यानधारणेमुळे या चक्रावर नियंत्रण झाल्यास, योग्याला ब्रम्हचर्य प्राप्त होते. ७. मूलाधार चक्र : रंग… लाल. ४ पाकळ्या. मेरूदंडाच्या खालच्या टोकाजवळ हे चक्र आहे. गणपती देवता. अनेक जन्मातील संस्कार जिच्यात आहेत ती कुंडलिनी या चक्रात सुप्तावस्थेत आहे. नागिणीचे कुंकवासारखे लाल पिल्लू वेटोळे घालून बसते त्याप्रमाणे ही कुंडलिनी साडेतीन फेर्यांचे वेटोळे घालून, खाली तोंड करून झोपलेली असते. योगशास्त्रात, मानवी शरीरातील सात योगिक चक्रांच्या अस्तित्वाबद्दल, अधिकारवाणीने खूपच महिती सांगितलेली आहे. या चक्रांच्या शरीरातील जागा, चक्रांचे गुणधर्म आणि त्यांच्या कार्यांचा, शारीरिक व्यवहारातील सहभाग सांगितलेला आहे. आधुनिक वैद्यकशास्त्रानुसार, मानवी शरीरातील सात अंतस्त्रावी ग्रंथींच्या जागा, त्यांचे कार्य आणि सात योगिक चक्रांच्या जागा यात कमालीचे साम्य आढळते. मानवी शरीरातील अंतस्त्रावी आणि बाह्यस्त्रावी ग्रंथी : अंतर्स्त्रावी ग्रंथीतून संप्रेरके म्हणजे हॉर्मोन स्त्रवतात आणि ते सरळ रक्तातच मिसळून योग्य तो परिणाम साधतात.
अंतर्स्त्रावी ग्रंथी :: १. पिनियल ग्रंथी (Pineal Gland)(सहस्त्रार चक्र).. मेलॅटोनीन नावाचा हॉर्मोन स्त्रवतो. रात्र झाली किंवा शरीर थकले असले किंवा भरपेट जेवण झाले असले म्हणजे ही ग्रंथी कार्यान्वित होते, मेलॅटोनीन स्त्रवते आणि माणसाला झोप येते. मेलॅटोनीन ही झोपेची नैसर्गिक गोळी आहे. जितके आवश्यक असते तेव्हढेच मेलॅटोनीन स्त्रवते आणि तितकाच काळ झोप लागते. शरीर ताजेतवाने झाले की मेलॅटोनीन स्त्रवण्याचे थांबते आणि आपण जागे होतो. पिनियल ग्रंथीत काही बिघाड झाला तर मेलॅटोनीन निर्माण होत नाही आणि त्या माणसाला निद्रानाशाचा विकार जडतो. २. पूरस्थ ग्रंथी (Pitutary Gland)(आज्ञा चक्र). ही ग्रंथी म्हणजे सर्व ग्रंथींची राणी आहे कारण इतर ग्रंथींना कार्यान्वित होण्याच्या आज्ञा याच ग्रंथीतून जातात. म्हणजे आज्ञा चक्र हे नाव अगदी सार्थ आहे. या ग्रंथीतून ९ हॉर्मोन स्त्रवतात. ३. गलग्रंथी आणि उप-गलग्रंथी. (Thyroid and Para-Thyroid Glands)(विशुध्द चक्र). यातून ३ हॉर्मोन स्त्रवतात. ४. उरस्थ ग्रंथी. (Thymus Gland) (अनाहत चक्र) यातून १ हॉर्मोन स्त्रवतो. ५. अधिवृक्क ग्रंथी आणि स्वादुपिंड.(Adrenal glands and Pancreas)(मणिपूर चक्र) या दोन्ही ग्रंथीतून ७ हॉर्मोन स्त्रवतात. त्यातील इन्सुलीन हा फार महत्वाचा हॉर्मोन आहे. ६. जनन ग्रंथी (Gonads. पुरुषांची वृषणे आणि स्त्रियांचे बीजांडकोष)(स्वाधिष्ठान चक्र) यातून लिंगदर्शक हॉर्मोन स्त्रवतात. पुरुषत्वासाठी Testosterone आणि स्त्रीत्वासाठी Estrogen आणि Progesterone. ७. उत्सर्जन यंत्रणा (गुदद्वार, मूत्राशय, मूत्रमार्ग)(मूलाधार चक्र). शरीराचा गुरुत्वमध्य.
सजीवांचा जन्म, त्यांची वाढ, त्याच्या शरीरातील इंद्रिये आणि अवयव, त्यांनी खाल्लेल्या आहारातूनच त्यांच्या शरीरातील सर्व घटकांची आणि विशिष्ट साध्यासाठी निर्माण होणारी जीवरसायने, त्यांची प्रजनन करण्याची क्षमता आणि यंत्रणा...हे सर्व निसर्गाने कसे साध्य केले आणि गेली कित्येक कोटी वर्षांपासून परिपूर्णावस्थेत कसे टिकविले हे समजणे, मानवी मेंदूच्या मर्यादेपलिकडले आहे असे वाटते. हे सर्व विज्ञान पुढच्या पिढीत संक्रमित होण्यासाठी कोणत्या सांकेतिक भाषेत आज्ञावल्या निर्माण केल्या हे अचाट आहे. सजीवांची निर्मिती हे निसर्गाचे अतर्क्य, अनाकलनीय यश आहे. या लेखाला आपल्या वेबसाईट किंवा ब्लॉगवरुन लिंक देण्यासाठी पुढील URL वापरा http://www.marathisrushti.com/?article=16046 |
|||
या लेखावर अजून प्रतिक्रिया आलेल्या नाहीत,पहिली प्रतिक्रिया आपण देऊ शकता!.
|
|