नवीन लेखन...

एका रात्रीत हीरो

धुळीने भरलेल्या एस.टी.तून आपला काळवंडलेला चेहरा घेऊन विजय उतरला आणि मला समोर बघून त्याचे डोळे अश्रुंनी डबडबले. त्याच्या पाठीवर हात ठेवताच एखादी ढगफुटी होऊन क्षणार्धात धोधो पाऊस कोसळू लागावा तसा तो ढसाढसा रडू लागला. एका विवाहित तरुणाला अशा तऱ्हेने हमसून हमसून रडताना बघून नक्की काय करावं हे काही क्षण मला कळेना. त्या क्षणी त्याचं सांत्वन करण्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय माझ्याजवळ उपलब्ध नव्हता हे कितीही खरं असलं तरी ती कृती करण्याची काही माझी मनापासून इच्छा होत नव्हती. सूर्यास्तानंतर काही तासांच्या अवधीत होणाऱ्या सूर्योदयाला या जगात कोणतीही शक्ती थांबवू शकत नाही हे माहित असूनही एखादं अपयश पदरी पडल्यानंतर काही माणसं आयुष्यातून उठल्यासारखी का वागू लागत असावीत? अनिच्छेने त्याचा अश्रूपात थांबविण्याचे प्रयत्न करीत असताना गेल्या काही दिवसातील घटनाक्रम माझ्या डोळ्यासमोरून सरकू लागला.

‘टर्निंग पॉईंट’ या संस्थेचा विश्रांती न घेणारा दूरध्वनी पुन्हा एकदा खणखणला आणि शंभर कि.मी. अंतरावरील गावातील एका अनोळखी तरुणाने मला भेटण्याची इच्छा व्यक्त केली. आत्महत्त्या, घटस्फोट, भांडणं, प्रेमभंग, अभ्यासात दुर्लक्ष यापैकी कोणती समस्या आता कानी पडते याची वाट बघत असतानाच त्याने मला एक सुखद धक्का दिला. त्याचं काम माझ्या अत्यंत आवडत्या ‘संगीत’ या विषयाशी संबंधित होतं! त्याला गाण्याची आवड असल्यामुळे गावातील छोट्या-मोठ्या कार्यक्रमांमध्ये तो गात असे. लहान गावात त्याच्या कलेला काही खास वाव मिळत नसल्यामुळे टी.व्ही. चॅनलवरील स्पर्धांमध्ये प्रवेश मिळविण्यासाठी त्याने सुरु केलेल्या धडपडीला काही प्रमाणात यश मिळालं होतं आणि एका स्पर्धेसाठी हजारो तरुण-तरुणींच्या आवाजाची चाचणी घेतल्यानंतर ज्या शंभर भाग्यवंतांची निवड झाली होती त्यात त्याचा समावेश झाला होता. त्याच्या निवडीची बातमी गावात येऊन थडकताच गावकऱ्यांमध्ये प्रचंड उत्साहाचा संचार झाला आणि दिल्ली अद्याप बरीच दूर असली तरी उत्साहाच्या भरात छोट्यामोठ्या सत्कार समारंभांना सुरवातही झाली! तो तरुण आपल्या देशातील तरुणाईसाठी प्रथम क्रमांकाचा एक आदर्श गायक ठरावा असं झाडून सर्व गावकऱ्यांना वाटत होतं आणि त्यासाठी काय वाट्टेल ते करण्याची त्यांची तयारी होती.

आमच्या भेटीची वेळ ठरली आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ठीक नऊच्या ठोक्याला तो हजर झाला. स्पर्धेत पहिला नंबर पटकविण्याचं स्वप्न उराशी बाळगणाऱ्या त्या तरुणाचं नाव विजय होतं. संसाराचा गाडा हाकण्यासाठी त्याचे वडील अत्यंत तुटपुंज्या पगारावर एका इमारतीत चौकीदाराचं काम करत होते तर आई घरोघरी भांडी घासून संसाराला हातभार लावण्याचा प्रयत्न करत होती. पत्नी व शाळेत जाणारी मुलं मिळून सहा माणसांच्या संसारात रोज कमीतकमी दोन घास तरी तोंडात पडावेत म्हणून तो स्वत:ही एका प्रयोगशाळेत सहाय्यकाची नोकरी करत होता. स्पर्धेत जर तो यशस्वी ठरला असता तर त्याच्यावर पैशाचा पाऊस पडला असता व त्याची गरीबी कायमची दूर झाली असती. त्याच्या आवाजाची परिक्षा घेऊन स्पर्धेत यशस्वी होण्यासाठी मी काही मार्गदर्शन करावे अशी इच्छा बाळगून तो मला भेटायला आला होता. तो येऊन पोहोचण्याआधीच त्याची परीक्षा घेण्याची जय्यत तयारी करण्यात आली. रोज समस्याग्रस्तांच्या चिंताक्रांत चेहऱ्यांनी गजबजणारं ‘टर्निंग पॉईंट’ आज मात्र सर्व चिंता बाजूला सारून स्वरांच्या मंद मंद लाटांमधे हरवून गेलं होतं ! जिच्या रक्तात तानपुऱ्याच्या तारा झंकारत असतील अशी कोणतीही जिवंत व्यक्ती नकळत गाऊ लागेल अशी वातावरणनिर्मिती हेतुपुरस्सर करण्यात आली होती. विजय त्याच्यासाठी ठेवण्यात आलेल्या खास आसनावर स्थानापन्न झाला आणि डोळे मिटून तानपुऱ्याच्या सुरांमधे स्वत:चा सूर मिळविण्याचा प्रयत्न करू लागला. त्याच्या गायनातले बारकावे टिपण्यासाठी मीही डोळे मिटून पूर्ण एकाग्रतेने ऐकण्यास सुरवात केली. तो सुरात गातो आहे असं काही क्षण वाटत असतानाच त्याची गाडी हळूहळू रुळांवरून घसरू लागली व तानपुऱ्याच्या सुरांशी पूर्णत: फारकत घेऊ न तो वेगळ्या वाटेने जाऊ लागला. तो गात असलेल्या गीतातील शब्द नको तिथे तोडले जात होते आणि अनेक शब्दांवर अनावश्यक आघात केल्यामुळे तो गीताच्या ओळींचे अक्षरश: लचके तोडतोय असं वाटत होतं. त्याचं ते विचित्र आणि बेसूर गायन असह्य झाल्यामुळे मी त्याला मध्येच थांबवलं. सतत रियाज करून त्याच्या गायनात मोठ्या प्रमाणात सुधारणा करण्याची आत्यंतिक आवश्यकता आहे हे लक्षात आल्यानंतर त्याने मुंबईला जाण्यासाठी पैसे खर्च करण्यात काहीही अर्थ नाही असं त्याला निक्षून सांगण्याची तीव्र इच्छा झाली होती, पण अपेक्षांनी भरलेला त्याचा चेहरा बघून मी स्वत:ला आवरलं. स्पर्धेच्या पुढील फेरीचं आमंत्रण केंव्हाही येणार असल्यामुळे तयारी करण्यासाठी अत्यंत थोडा वेळ त्याच्याजवळ उरला होता आणि त्याला काहीतरी सल्ला देणं आवश्यक होतं. त्याची प्रतिक्रिया अजमावण्यासाठी मी त्याला म्हणालो – ‘‘तू जरी सुरात गाऊ शकला नाहीस तरी आपल्या देशातून तुझ्यावर मॅसेजेसचा पाऊस पडू शकतो. तू एकच काम कर. डोळ्यात पाणी आणून तुझी कौटुंबिक पार्श्वभूमी आणि हलाखीची आर्थिक परिस्थिती करोडो प्रेक्षकांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न कर आणि त्यानंतर बघ काय चमत्कार घडतो ते!’’ त्याची प्रतिक्रिया माझ्यासाठी अत्यंत धक्कादायक होती. त्याला माझी युक्ती प्रचंड आवडली. तो आश्चर्याने डोळे विस्फारून माझ्याकडे बघू लागला आणि एखाद्या वाहिनीवरील स्पर्धेच्या परीक्षकाला करावा त्या स्टाईलने त्याने अगदी पूर्ण वाकून मला नमस्कार केला! गळ्यातील सुरांपेक्षा देशभरातून होणाऱ्या एस.एम.एसच्या वर्षावावर जास्त भिस्त ठेवणाऱ्या विजयचा अत्यंत खिन्नतेने मी निरोप घेतला.

विजयला स्पर्धेच्या एका फेरीचं आमंत्रण अवघ्या काही तास आधी मिळाल्यामुळे गावकऱ्यांनी पैसे जमा करून व मोठी धावपळ करून त्याची जवळच्या शहरातून चक्क विमानाने मुंबईला रवानगी केली. गायनाचा अत्यंत अल्प सराव, प्रचंड तणाव, जागरण, विमानाचा आयुष्यातील पहिलाच प्रवास या सर्वाचा एकत्रित परिणाम त्याच्या तब्येतीवर झाल्यामुळे तो स्पर्धेच्या बाहेर फेकल्या गेला. अखेर एका रात्रीत हिरो होऊन तमाम भारतीय तरुणाईच्या दिलाची धडकन बनल्यावर आपल्यावर कोट्यावधी रुपयांची बरसात होईल असं स्वप्नरंजन करीत रस्त्याने व हवाई मार्गाने मजल-दरमजल करीत मुंबई नावाच्या स्वप्ननगरीत पोहोचलेला विजय अवघ्या चोवीस तासात हीरोऐवजी झीरो बनून व वैफल्यग्रस्त होऊन अश्रुंनी डबडबलेल्या डोळ्यांनी गावात परतला!

माझ्यासमोर उभा असलेला विजय केवळ आजच्या तरुण पिढीचंच प्रतिनिधित्व करत नव्हता तर There are no short cuts to success ही वाडवडिलांची शिकवण पूर्णत: निकालात काढून ‘केवळ    शॉर्टकट्‌सनेच आयुष्यात यशस्वी होता येतं’ असं एक अत्यंत घातक दिवास्वप्न आजच्या तरुण पिढीला रात्रंदिवस विकण्यात धन्यता मानणाऱ्या विविध टी.व्ही. वाहिन्यांच्या मायाजालाचा तो एक बळी होता.     स्वत:वर देशभरातून मॅसेजेसचा पाऊस पाडून घेण्याची युक्ती सांगितल्यानंतर प्रचंड आनंदित झालेल्या विजयचा चेहरा बघून मी अवाक् झालो होतो आणि केसांच्या जटा न वाढवता व चित्रविचित्र कपडे घालून अंगविक्षेप न करता वर्षानुवर्षे रसिक श्रोत्यांच्या ह्दयासनावर विराजमान झालेल्या गायक- गायिकांनी यशस्वी होण्यासाठी केलेला प्रखर संघर्ष माझ्या डोळ्यासमोर उभा राहिला. स्व. दीनानाथ ज्याला साधूपुरुष म्हणत असा एक तानपुरा, एक चिजांची वही व गळ्यातील उपजत गांधार येवढ्या पुण्याईवर संगीतकारांचे उंबरठे झिजवणाऱ्या लतादीदी, असंख्य हालअपेष्टा सोसून स्व-कर्तृत्वाने खऱ्या अर्थाने ’चतुरस्त्र’ गायिकेच्या पदाला पोहोचलेल्या व आज सत्तरी पार केल्यानंतरही थोडेही बेसूर न होता गळ्यातून अगदी लिलया सणसणीत ताना काढणाऱ्या आशा भोसले या मंगेशकर भगिनींनी केलेली कठोर तपश्चर्या मला आठवली. जे पद प्राप्त करण्यासाठी आपल्या देशातील अनेक गायकांनी आपलं पूर्ण आयुष्य खर्ची घातलं, ज्या विद्येला प्रसन्न करून घेण्यासाठी काही तरुण-तरुणींनी आपल्या आयुष्यातील ऐन उमेदीची अनेक वर्षे न कंटाळता गुरुजींच्या घरी अक्षरश: पडेल ते काम करण्यात व्यतीत केली ती अत्यंत  कष्टसाध्य अशी कला गळ्यात उतरवण्यासाठी परिश्रम करण्याऐवजी भर उन्हात हजारो स्पर्धकांच्या रांगेत उभे राहून याचना करण्यात कोणती क्रिएटीव्हिटी आहे? संगीताची हजारो वर्षांची परंपरा लाभलेल्या आपल्या या महान देशात तोडके कपडे घातलेल्या मुला-मुलींच्या घोळक्यात भडक रंगाचे कपडे घालून(किंवा बरेचदा तेही न घालता केवळ बनियानवर!) व वेगवेगळे अंगविक्षेप करून स्वत:वर एस.एम.एस चा पाऊस पाडून घेतला की नंबर वनचा गायक किंवा गायिका बनता येतं हे कोणी ठरवलं? लोकांसमोर हात जोडून मॅसेजेसची भीक मागण्यासारखा संगीत हा उधारीचा मामला नसतो तर ते रक्तातच असावं लागतं आणि त्याला जर अविरत कष्टांची जोड दिली नाही तर श्रोत्यांच्या ह्दयावर वर्षानुवर्षे अधिराज्य गाजवता येत नाही हे आजच्या तरुणाईला कोण समजावून सांगणार?

निकोप स्पर्धा हा यशस्वितेचा प्राणवायू असतो. त्यामुळे स्पर्धा आयोजित करणं यात काहीच गैर नाही. विविध प्रकारच्या स्पर्धांचं आयोजन ही स्पर्धकांना स्वत:ची गुणवत्ता सिध्द करण्यासाठी मिळालेली एक सुवर्णसंधी असते. पण आपल्या देशातील करोडो दर्शक संगीताशी संबंधित जे स्पर्धात्मक कार्यक्रम खूप मोठ्या अपेक्षा बाळगून बघत असतात त्यात सहभागी होणाऱ्या स्पर्धकाने गायनावर आपले पूर्ण लक्ष केंद्रित करून पूर्ण तयारीनिशी मैदानात का उतरू नये? आपण ज्या परीक्षकांसमोर गातो आहोत ते त्या क्षेत्रातील दिग्गज असल्यामुळे अगदी साधी गाणी गाताना तरी बेसूर न होण्याचं पथ्थ्य पाळण्यास काय हरकत आहे? ‘आपको मेरा परफॉर्मन्स अच्छा नही लगा होगा, लेकिन पब्लिकने तो (मॅसेजेस भेजके!) मुझे पसंद किया है ना!’ असं समोर बसलेल्या आदरणीय परीक्षकांना बिनदिक्कतपणे सांगण्याची एखाद्या स्पर्धकाची हिंम्मत होते हे क्वालिटी ऐवजी क्वांटिटीचा सुळसुळाट झाल्याचं द्योतक आहे. नाच व मॅसेजेसचा गोंधळ न घालताही अनेक गुणी कलावंतांचा शोध घेता येतो हे काही वर्षांपूर्वी सुरु झालेल्या एका अत्यंत दर्जेदार कार्यक्रमाने दर्शकांना दाखवून दिलं आहेच.

अल्प श्रमात मोठं यश प्राप्त करण्यासाठी धडपड करणं ही जर मानवीय प्रवृत्ती नसती तर सट्टयाला, जुगाराला, लॉटरीला, घोड्यांच्या शर्यतींना व विविध वाहिन्यांवर (खोट्या) यशाची रात्रंदिवस स्वप्न दाखविणाऱ्या कार्यक्रमांना येवढ्या मोठ्या प्रमाणात प्रतिसाद कधीच मिळाला नसता. पण जीवनातील विविध क्षेत्रात आपल्या तेजाने तळपणाऱ्या व यशोशिखरावर विराजमान झालेल्या व्यक्तिंनी काही मिनिटात किंवा काही एपिसोड्‌समध्ये सहभागी होऊन यश प्राप्त केलेलं नाही तर प्रत्येकाला परिस्थितीशी दोन हात करत व अनेक अपयशांना पचवून यशोमंदिराकडे मार्गक्रमणा करावी लागली आहे. या सर्वांची धडपड टी.व्ही.च्या करोडो प्रेक्षकांपर्यंत पोहचवून व तरुण वर्गाला जग जिंकण्यासाठी प्रोत्साहित करून खऱ्या अर्थाने राष्ट्राची उभारणी करायची की ‘तुमचं नाणं खरं नसलं तरी तुम्ही यशस्वी होऊ शकता’ अशी वीषपेरणी करायची? लक्षावधी तरुण-तरुणींना ईडियट बॉक्सच्या छोट्या पडद्याला खिळवून ठेवणारे व कोट्याधीश बनविण्याची स्वप्न दाखविणारे कार्यक्रम ज्या पाश्चात्त्य देशातील कार्यक्रमांवर बेतलेले असतात त्या देशांमध्ये शालेय शिक्षण आटोपताच स्वकष्टाची कमाई करून यशस्वी होण्यासाठी विद्यार्थी धडपडू लागतात याचा आम्हाला सोईस्कररित्या विसर का पडतो?

‘‘केवळ पैसा कमावण्यासाठी स्पर्धेत सहभागी होऊ नका. गाडी आणि बंगल्याच्या मागे धावण्यापेक्षा कलेच्या मागे धावलात तर सगळं ऐश्वर्य तुमच्या मागे आपोआपच धावत येईल’’ हा एका सुप्रसिध्द संगीतकाराने स्पर्धकांना दिलेला सल्ला अत्यंत गांभीर्याने घेण्याची वेळ आलेली आहे. थोडेही कष्ट न करता ‘एका रात्रीत हीरो’ बनण्यासाठी प्रयत्न करण्याऐवजी ’या जगात यशस्वी होण्यासाठी शॉर्टकट्‌स नसतात’ हा विचार रक्तात भिनवून व ’डिग्निटी ऑफ लेबर’ची खिल्ली न उडवता ऐन उमेदीच्या वयात रात्रंदिवस कष्ट करून अफाट यश प्राप्त करण्यासाठी जर आपल्या देशातील तरुणाईने प्रयत्नांची पराकाष्ठा केली तर भारताला अवघ्या विश्वावर राज्य गाजविण्यासाठी वेळ लागणार नाही!

— श्रीकांत पोहनकर

श्रीकांत पोहनकर
About श्रीकांत पोहनकर 40 Articles
श्रीकांत पोहनकर हे १९९८ पासून सतत सोळा वर्षे समाजातील विविध घटकांसाठी काम करणार्‍या टर्निंग पॉईंट, पोहनकर फाऊंडेशन, टर्निंग पॉईंट पब्लिकेशन्स व दिलासा या संस्थांचे नेतृत्त्व करत आहेत.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..