नवीन लेखन...

दख्खनची राणी आणि धावते उपाहारगृह !

deccan-queen-dining-car

सकाळी पुणे ते मुंबई आणि संध्याकाळी परत पुणे असा प्रवास करणार्‍यांची संख्या फार मोठी आहे. गेली कित्येक वर्षे अनेकजण असा प्रवास करत आहेत. सहाजिकच हा प्रवास होतो रेल्वेने…… हे रेल्वेप्रवासी एखाद्या कुटुंबाप्रमाणेच एकमेकांशी जिव्हाळ्याचं नातं ठेउन आहेत.

या नियमित प्रवास करणार्‍या प्रवाशांच्या मनात दख्खनची राणी म्हणजेच डेक्कन क्वीन या गाडीबद्दल प्रचंड आत्मियता आहे. मध्य रेल्वेवरील ही अत्यंत दिमाखदार गाडी. या गाडीचं तिकिट मिळणं ही एके काळी अत्यंत मौल्यवान गोष्ट मानली जायची.

पांढऱ्या-निळ्या रंगसंगतीत धावणारी आणि मुंबई-पुणे या दोन शहरांना एकमेकांशी जोडणारी डेक्कन क्वीन अर्थात दख्खनची राणी ही ऐतिहासिक गाडी १ जून १९३० रोजी ब्रिटिश साम्राज्याच्या काळात सुरू करण्यात आली. त्या वेळेस ती फक्त शनिवारी व रविवारी धावायची. तिचा उपयोग प्रामुख्याने घोड्यांच्या शर्यतींच्या शौकिनांची मुंबई व पुण्यादरम्यान ने-आण करण्यासाठी होत. हळूहळू तिच्या सेवेचा विस्तार करण्यात आला व दख्खनची राणी रोज या दोन शहरांदरम्यान धावू लागली.

दख्खनची राणी पुण्याहून दररोज सकाळी सव्वासात वाजता निघते आणि बरोबर सव्वातीन तासांनी सकाळी साडेदहा वाजता मुंबईच्या छ्त्रपती शिवाजी टर्मिनस (सी एस टी) वर पोहोचते. परतीच्या प्रवासात ती सायंकाळी ५:१० वाजता छ्त्रपती शिवाजी टर्मिनसहून निघते आणि रात्री ८:२५ वाजता पुणे स्थानकावर पोहोचते. ही गाडी एका दिशेने १९२ किलोमीटर अंतर धावते. राजधानी एक्सप्रेस, शताब्दी एक्सप्रेस वगैरे गाड्या सुरु होण्यापूर्वी डेक्कन क्वीन ही भारतातली सर्वात वेगवान गाडी होती.

या गाडीने नियमितपणे म्हणजे अक्षरश: दररोज प्रवास करणारे शेकडो प्रवासी आहेत. मुंबई-पुणे प्रवासाचे अनेक पर्याय उपलब्ध असतानाही अनेकजण डेक्कन क्वीननेच प्रवास करणे पसंत करतात. नियमित प्रवास करणार्‍या प्रवाशांसाठी मासिक पासची व्यवस्था आहे आणि त्या प्रवासांसाठी डेक्कन क्वीनमध्ये राखीव डब्बे सुद्धा आहेत हे विशेष. डेक्कन क्वीन म्हणजे त्यांचं जणू काही दुसरं घर. दरवर्षी ते या गाडीचा वाढदिवसही साजरा करतात. अगदी गाडी सजवण्यापासून ते केक कापेपर्यंत सगळं काही करतात. या गाडीचे मोटरमन जेव्हा जेव्हा सेवानिवृत्त होतात तेव्हा त्यांना निरोप देण्यासाठी समारंभही करतात.

काळानुसार या पहिल्यावहिल्या डिलक्स गाडीत अनेक बदल झाले. या गाडीतील प्रथम श्रेणीचा डबा स्वातंत्र्यानंतर लगेचच बंद करून त्याजागी द्वितीय श्रेणीचा डबा सुरू करण्यात आला. सुरुवातीला पूर्ण निळ्या रंगाच्या या गाडीला पांढऱ्या-निळ्या अशा नेत्रसुखद रंगसंगतीची जोड देण्यात आली. त्याचप्रमाणे १९५५ मध्ये पहिल्यांदाच या गाडीत तृतीय श्रेणीचा डबाही जोडण्यात आला. त्यानंतर २००३ पासून या गाडीतील पाच वातानुकूलित डब्यांची संख्या चारवर आणण्यात आली. गाडीतील आणखी एक वैशिष्टय़ म्हणजे धावते उपाहारगृह!

“डायनिंग कार‘ असे वैशिष्ट्य असलेली देशातील एकमेव आणि पहिली रेल्वे म्हणून दख्खनच्या राणीचा उल्लेख केला जातो. एक जून १९३० पासून – म्हणजेच तब्बल ८५ वर्षे – या रेल्वेला “डायनिंग कार‘ ही सुविधा उपलब्ध आहे. यामध्ये जाऊन प्रवासी खाद्य पदार्थ खाऊ शकत. तेथे टेबल आणि मऊ गाद्या असलेल्या खुर्च्यांची व्यवस्था होती. या “डायनिंग कार‘ला आयएसओ प्रमाणपत्रही मिळाले होते. या रेल्वेमुळेच पुण्याला जागतिक दर्जाचे रेल्वे स्थानक मिळण्यास मदत झाली होती. वेगळा थाट असलेल्या या “डायनिंग कार‘ची नोंद “लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड‘मध्ये झाली आहे. देशातीलच नाही तर परदेशी प्रवासांनाही डेक्कन क्वीन आणि तीची डायनिंग कार याची भूरळ पडली होती.

प्रवासी नाष्टा करण्यासाठी डब्यातून “डायनिंग कार‘मध्ये येत असत. तेथे मिळणारे विविध प्रकारचे सॅंडविच, चिकन कटलेट, व्हेज कटलेट, ब्रेट बटर, पापलेट ब्रेड, चीज टोस्ट सॅण्डवीच, चिकन कटलेटसह अन्य पदार्थ तसेच चहा-कॉफीवर प्रवाशांकडून चांगलाच ताव मारला जात होता. लाकडी खुर्च्या, टेबल असा थाट असणाऱ्या डायनिंग कारमध्ये अनेक प्रवासी मुंबई-पुणे मार्गावरील निसर्ग न्याहळत पदार्थांची चव चाखत होते. प्रवाशांनी दिलेल्या “ऑर्डर‘नुसार त्यांना जागेवर खाद्य पदार्थ उपलब्ध करून दिले जात असत. “डायनिंग कार‘मधून दररोज सरासरी ३० हजार रुपये इतका व्यवसाय होत असे.

डिसेंबर २०१४ मध्ये रेल्वे प्रशासनाने या डायनिंग कारचे आयुष्य संपल्याचे सांगत दुरुस्तीच्या नावाखाली “डायनिंग कार‘ बाजूला केली. त्या जागी “पॅंट्री कार‘ जोडली. प्रवाशांच्या मागणीवरुन ही डायनिंग कार पुन्हा सुरु केली जाईल असे रेल्वे अधिकारी सांगत. भारतीय रेल्वेच्या इतिहासातील हे सोनेरी पान कायमचे पुसले जाणार नाही याची दक्षता प्रवाशांनीच घेतली. सततच्या रेट्यामुळे हे `धावते उपहारगृह अर्थात डायनिंग कार’ १ जून २०१५ पासून म्हणजेच `दख्खनच्या राणी’च्या ८५ व्या वाढदिवशी पुन्हा या गाडीला जोडले गेले.

डेक्कन क्वीनमधून केलेल्या पुणे ते मुंबई या प्रवासाची एक झलक !

 

निनाद प्रधान
About निनाद प्रधान 96 Articles
मराठीसृष्टीचे व्यवस्थापकीय संपादक. मराठी आणि इतर भारतीय भाषांमधील इंटरनेट तंत्रज्ञान तसेच इतर अनेक सॉफ्टवेअरची निर्मिती. १९९६ साली मराठी भाषेतील पहिल्या वेबसाईटच्या निर्मितीमध्ये सहभाग. त्यानंतर अनेक मराठी आणि आणि भारतीय भाषिक वेबसाईटस बनविण्यात सहभाग. वृत्तपत्र आणि मिडियासाठी विविध सॉफ्टवेअरची निर्मिती. लोकसत्ता फॉन्टफ्रीडम आणि फॉन्टसुविधा या देवनागरीसाठीच्या अत्यंत उपयुक्त सॉफ्टवेअरची निर्मिती. अनेक वेबसाईटच्या निर्मितीत सहभाग. याच विषयावर विपुल लेखन. मराठी वृत्तपत्रांच्या इंटरनेट आवृत्तींचे सल्लागार.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..