नवीन लेखन...

विडा घ्या हो नारायणा – भाग ३

जगण्याची साधी सोप्पी तत्वे – भाग ८४ ; आयुर्वेदातील मार्गदर्शक तत्वे – क्रमांक ११
जे जे देवासाठी ते ते देहासाठी – भाग ४१

पान खाण्याचा एक विशिष्ट नखरा आहे. “पान लावणे” ही एक खास कला आहे. दर्दी खवैय्याला यातील नजाकत बरोब्बर समजते. आपल्याला हवी असलेली, किंचित पिवळसर झाक असलेली दोन पाने चंचीतून निवडून, हलकेच झटकून सफाईदारपणे पुसत, नखानी त्याचे टोक आणि त्याचा हिरवा देठ खुडुन, दातांनी एकदाच त्याचा चावा घेत देठ टाकून द्यावा. नखांनी पानावरच्या शिरा हलकेच काढाव्यात. या शिरा काढताना पानाला भोक पडता नये, एवढे सराईत झाल्याशिवाय चारचौघात पान खायला सुरवात करू नये. नाहीतर त्याएवढा लाजीरवाणा प्रसंग दुसरा नाही. तो पानाचा केलेला जणुकाही अपमानच असतो. डाव्या हातात हे पान घेत, उजव्या अंगठ्याने थम्सअप करीत पानाला चुना लावणे केवळ लाजवाब. खैरापासून बनवलेल्या काताचा किंवा काताच्या पाण्याचा शिडकावा करीत, चुना आणि कात एकजीव करणे म्हणजे जणुकाही एखाद्या युवतीच्या गालावर “फाउंडेशन” लावण्यासारखे वाटते. नंतर त्यावर भुरभुरवलेली कत्री सुपारी,थोडासा गुलकंद, चिमूटभर रंगीत खोबरं, जायफळ, जायपत्री, केशर, कस्तुरी, कंकोळ, कापूर, थंडक, ज्येष्ठमधाची कुटलेली सुपारी, खारकेची पूड किंवा खजूर, चिमूटभर गुंजेची पानं, वेलचीचा दाणा, बडिशेपेच्या चिमट्या, अगदी सोन्या चांदीचा वर्ख देखील ! यातील जे मिळेल ते, आणि परवडेल ते या पानात वाढावे. (म्हणजे घालावे ) तीन तेरापासून ते अगदी छत्तीस प्रकारचे पदार्थ पानामधे आपणाला घालता येतात. जे जे देवाला चालतात, ते सर्व देहाला मानवतात. एवढे लक्षात ठेवावे. अशा भरगच्च पानाला गोविंद विडा असे नारायणी नाव आहे.

पानातील हे सारे घटक एखाद्या जुन्या मल्टीस्टार सिनेमातील हिरो हिराॅईन सारखेच वाटतात. प्रत्येकाचं महत्व आहे, आणि काही वेळा एखादा तो ती ते, नसला तरी चालतो. पण पान असणे महत्त्वाचे !

या पानातील कात चुना आणि सुपारी हे मिश्रण प्रमेहावरील ( प्रमेह म्हणजे मधुमेहाचा आयुर्वेदात वर्णन केलेला पिता ) उत्तम औषध आहे. रक्तातील, स्त्रोतसातील, अन्नातून आलेला क्लेद कमी करण्यात श्रेष्ठ, आणि तुरट चवीमधे सर्वोत्तम. जेवण हे मधुर रसाने सुरवात करून तुरट रसाने संपवावे, असा संदर्भ ग्रंथात आहे. तुरट चवीचा पदार्थ जेवणाच्या शेवट घेतल्याने अतिरिक्त पाचक स्राव वाढत नाहीत, आणि मुख्य पचन व्यवस्थित सुरू होते.

या भरलेल्या पानाची त्रिकोणी, चौकोनी, शंकूच्या आकाराची देखणी घडी करून त्यावर टोचलेली लवंगेची कळी. आणि तोंडाचा मोठ्ठा आऽऽ करून ही अख्खी पानपट्टी आत सरकवून डोळे बंद करून, कोणाशीही न बोलता, पान चघळत चघळत, त्यातील वेगवेगळ्या रसांचा आस्वाद जिभेवर आपोआप अवतरत जाणे, म्हणजे जणुकाही ब्रह्मानंदी टाळी लागणे. यापेक्षा आणखीन स्वर्गसुख ते कोणते ?

असे मस्तपैकी जमलेलं पान चावून खाऊन गिळले की पचन कशाला बिघडणार ? त्यातील सर्वच्या सर्व घटक हे औषधांचे भांडारच आहे. आणखी एक नवीन पदार्थ तयार होतो, तो म्हणजे अल्कलाईन स्वभावाची लाळ. लाळ हे एक उत्तम नैसर्गिक एन्झाईम असून पचनाला मदत करणारे असते.जरी लाळेचे काम तोंडापुरतेच असले तरी अन्नाला घुसळवायला ही लाळ उत्तम काम करते. यावर स्वतंत्र टीप येईलच !

हे पान ज्यांना चावता येत, चघळता येतं, आणि गिळता येतं, त्या सर्व जाणत्या अजाणत्या, बालक पालकांनी खाल्लंतरी चालतं.

पण या पानामध्ये आज जो बाजारी मसाला घातला जातो तो अनौषध आहे. उलट विषाप्रमाणे काम करतो. जसे, चमन, पानचटणी, किवाम, जर्दा, अन्य कृत्रिम रंग मिसळलेली सुगंधी सुवासिक द्रव्य अजिबात वापरू नयेत. बाकी नसेल तर केवळ ते पान, तो चुना, तो कात आणि ती सुपारी एवढे मोजके हिरो हिराॅईन देखील पिक्चर सुपरहीट करतात.

एकंदरीत हे पान तोंडापासून रसोत्पत्ती करत करत, पोटाच्या दिशेत, आत सरकत जाताना ओठ लाल करीत जाते. लाल होणे हा दोष मानायचा की फायदा ? लिपस्टिक लावून ओठ रंगवण्यापेक्षा पान खाऊन रंगलेले काय वाईट ? पूर्णपणे अगदी नैसर्गिक आणि सेफ !

वैद्य सुविनय दामले.
कुडाळ सिंधुदुर्ग.
9673938021
02362-223423.
04.07.2017

Avatar
About (वैद्य) सुविनय दामले 453 Articles
वैद्य सुविनय दामले हे कुडाळ, सिंधूदुर्ग येथील सुप्रसिद्ध आयुर्वेदाचार्य आहेत. ते आयुर्वेद या विषयावर विपुल लेखन करतात तसेच व्याख्यानेही देतात.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..