नवीन लेखन...

थुंकण्याच्या प्रवृत्तीमुळे जंतुसंसर्ग !

रस्त्यावर थुंकणे, कचरा टाकणे, लघुशंका/प्रातर्विधी करणे, आपला परीसर स्वच्छ न ठेवणे, सर्वच प्रकारचे प्रदूषण निर्माण करण्यास मदत करणे हे सगळे काश्याचे द्योतक आहे? तर अज्ञान, अंधश्रद्धा, आळस, शिस्त आणि संस्कारांचा अभाव, आपण राहतो त्या शहराप्रती आणि आपल्या देशाबांधवांप्रती कमी होत चाललेलं प्रेम, माया, आदरभाव म्हणावा लागेल. आपण सुजाण नागरिक नसल्याचा दाखला, आपण राहत असलेल्या परिसराशी आपले काही देणे घेणे नसल्याचे सर्टिफिकीट आपणा अश्या कृतीने देत असतो. काही लोकांची परिस्थिती ‘अढयात नाही तर पोहऱ्यात कुठून येणार’ अशी असते.

एक बातमी वाचण्यात आली की सार्वजनिक ठिकाणी थुंकून टीबीसारख्या आणि इतर रोगराईस आमंत्रण देणाऱ्या प्रवृत्तींना पायबंद घालण्यासाठी सरकार येत्या अधिवेशनात थुंकण्याविरोधातील कडक कायद्याचे नवे विधेयक मांडणार असल्याची समजले आणि ही बातमी दस्तुरखुद्द सार्वजनिक आरोग्यमंत्र्यांनी दिली. विशेष म्हणजे प्रस्तावित विधेयकात सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्या व्यक्तीचे ड्रायव्हिंग लायसन्स काही दिवसांसाठी रद्द करण्याची तरतूद असण्याची शक्यता असल्याचे त्यांनी सांगितले. याचा अर्थ फक्त ड्रायव्हरच रत्यावर थुंकतात का? नाही. मग बाकीचे नागरिक रत्यावर थुंकतात, कचरा टाकतात, प्रातर्विधी करतात त्यांचे काय?

सार्वजनिक ठिकाणी पान, तंबाखू खाऊन थुंकण्याच्या प्रवृत्तीमुळे टीबीसारख्या घातक रोगाचा फैलाव मोठ्या प्रमाणात होत आहे. असं बघण्यात आले आहे की मुंबईतील टीबी हॉस्पिटलमध्ये अशा प्रकारच्या पेशंटांवर उपचार करणाऱ्या डॉक्टर व वैद्यकीय कर्मचाऱ्यांना या विकाराचा प्रादुर्भाव झाला आहे. दिसेल तेथे थुंकण्याच्या प्रवृत्तीमुळे जंतुसंसर्गाचा धोका वाढून निरोगी व्यक्तीलाही टीबीची लागण होण्याची शक्यता नाकारता येत नाही असे काही तज्ञांच म्हणणं आहे. संसर्गजन्य रोगाने पिडीत रुग्ण रत्यातून जाताना कुठेही थुंकतात, नाक शिंकरतात, खोकला झाला असेल तर तोंडावर रुमाल न धरतात खोकतात. याने हवेमध्ये जंतूसंसर्ग फैलावून साथीच्या रोगांना आमंत्रण देत असतो हे त्यांच्या लक्षात येत नाही.

कुठेही थुंकणाऱ्या व्यक्तींना प्रतिबंध घालण्यासाठी मुंबई महापालिकेतर्फे नियम करण्यात आले आहेत. पण महापालिकेच्या नियमातील दंडात्मक रक्कम मामुली असल्यामुळे अशा प्रवृत्तींवर वचक राहत नाही. नव्या कायद्यात सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्या व्यक्तींना वचक बसेल यासाठी दंडाची रक्कम वाढविण्याची तरतूद आहे. शिवाय रिक्षा, टॅक्सी अथवा खासगी वाहनचालकांनी अशी कृती केल्यास त्यांचे मोटार ड्रायव्हिंग लायसन्स काही दिवसांसाठी रद्द करण्याची तरतूद करण्यासाठी सरकारच्या विधी व न्याय खात्याचे मत अजमावून तशी तरतूद करण्यात येईल, असे त्या खात्याच्या मंत्र्यांनी आवर्जून सांगितले. हे केल्याने जिथेतिथे थुंकण्याची सवय बंद होईल? बाकीचे बेस्टबस मधून, रेल्वेच्या डब्यातून पिचकारी मारतात त्यांचे काय?

वरील सर्व गोष्टी याही आधी होत्या, दंड होते, मार्शल होते, कायद्यात तरतुदी होत्या पण काय झाले? भ्रष्टाचारामुळे कडक अमलबजावणी झालीच नाही. गुटका, पान, तंबाखू खाऊन जिथेतिथे थुंकण्याची सवय असणाऱ्या व्यक्तींची मानसिकता बदलणे गरजेचे आहे. कित्येक उच्चशिक्षित, श्रीमंत, समाजात मोठे वजन असणारे जेंव्हा रत्यावर पान, तंबाखू खाऊन पिचकाऱ्या मारतात तेव्हां आपल्याला चीड येते. मनात विचार येतो की ह्यांच्यावर हेच संस्कार झाले आहेत की काय? कित्येक वाहनचालकांना सिग्नला गाडी थांबली की दार उघडून पानाची चूळ भरून पिचकारी मारतांना पहिले आहे. काही वेळा तर बेस्टबस सिग्नलला थांबली की खिडकीतून नक्की समोरच्या गाडीवर किंवा वाटसरूवर मॉडर्नआर्ट झेलण्याची पाळी येते. हे सर्व वरील कारणांचे द्योतक आहे. हेच सर्व ते परदेशात करू शकतात का? नाही. याचा अर्थ भीती व इज्जतिला जपतात. देशात/शहरात असे केले तर त्यांना कोणी विचारणारा नाही आणि त्यात त्यांना मोठेपणा वाटत असेल कदाचित. हा प्रात्यक्षिक परिणाम असावा ! हे परमेश्वरा हा कायदा पारित होण्याअगोदर यांच्या सवयीत बदल घडवून आण म्हणजे कायद्याची अमलबजावणी न करताच स्वयंशिस्त व मनाचा निग्रह झाल्याचे सर्व नागरिकांना दिसेल.

यावर जालीम उपाय म्हणून पिचकाऱ्या मारणाऱ्या सर्वांनी मिळून रत्यावरील जेव्हढ्या भिंती, रस्ते, व्यवसायिक इमारतींच्या जिन्यातील कोपरे, रेल्वेतील खिडक्या दररोज पिचकार्यांनी रंगविल्या ते सर्व हे स्वेच्छेने आणि सकारात्मक मानसिकता ठेऊन स्वत: स्वच्छ करतील तेव्हांच त्यांना याचा पश्चाताप झाल्याचे आणि भविष्यात असे न करण्याची शपथ घेतील आणि आपल्या कृतीतून दाखवतील तेव्हांच हे सगळे बंद होईल. समजा कोणी रत्यावर थुंकताना दिसलाच तर त्याला तेथेच अटकाव करून हे कसे चुकीचे आहे, याने भविष्यात कुठल्या रोगांचा सामना करावा लागतो हे समजावून सांगतील.

जगदीश पटवर्धन, दादर

जगदीश अनंत पटवर्धन
About जगदीश अनंत पटवर्धन 227 Articles
एम.कॉम. एल.एल.बी. असलेले श्री पटवर्धन हे एक बहुआयामी व्यक्तिमत्त्व आहे. चित्रकला, तबला वादन, क्रिकेट, टेबल टेनिस शास्त्रीय संगीत ऐकण्याची त्यांना आवड आहे. त्यांनी अनेकविध विषयांवर आजपर्यंत लेखन केले आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..