नवीन लेखन...

६ – गणरायाचा विलसे नृत्यविहार

मृदंग घुमतो , घुंगुरनादीं वीणेचा झंकार

नगराजावर गणरायाचा विलसे नृत्यविहार  ।।

 

खलनिर्मूलन विघ्ननिवारण पळभर ठेवुन मागे

श्रीगणनायक बह्मांडाचा-पालक नाचूं लागे

पदन्यासातुन युगभाग्या करि जागृत जगताधार  ।।

 

नाचतसे वक्रतुंड , नाचे अंग अंग त्याचें

नाचतात पद, भुजा नाचती , विशाल तन नाचे

नयनांमधुनी उल्हासाचा नर्तन-आविष्कार  ।।

 

सुपासारखे कान नाचती, पुष्ट नाचते सोंड

ओठ नाचती, गाल नाचती, झुलत नाचते दोंद

पीतांबर उत्तरीय गिरक्या घेती गोलाकार  ।।

 

शंख, दंत-क्षत, पाश, गदा, शर, परशू, अंकुश, शूल,

बाहुबंध, मुद्रिका, गळ्यातिल नाचे फूल-न्-फूल

कर्णभूषणें, मेखला नि रक्तिम-रत्नांचा हार   ।।

वरदहस्त-स्थित लोंबीसह  मोदक-पात्रें उदंड

भाळीं गंध नि देहीं चंदन-उटी नाचती थंड

मुगुट नाचतो माथीं, नाचे दाट केशसंभार   ।।

 

भान हरपुनी मग्न नर्तनीं सरस्वतीचा पती

स्वत:स विसरुन नाचत गण,  मूषक-वाहन संगती

क्षणाक्षणाला करत अलंकृत  नवनव नृत्यप्रकार  ।।

 

नाचत पानें, पुष्प, लता, तृण, तरू, नद्या, निर्झरऽ

भू, सिंधू, पशु-पक्षि मत्स्य , रवि-शशि तारे अंबरऽ

सप्तलोक-दशदिशातुनी ओंकार घेइ आकार  ।।

करतो नर्तन गिरिजानंदन सदाशिवाचा पुत्र

पाहत राही जगत् अचंबित, थांबत दिवस नि रात्र

दर्शन अनादि-अनंत यांचें हर्षद अपरंपार   ।।

 

अनुभव असा अलौकिक हा, अस्तित्वच होई झंकृत

जागतसे शब्दांच्याही पलिकडला नाद-अनाहत

नाचे जेव्हां ब्रह्म निर्गुणी,  बनुन  सगुण-साकार  ।।

 

– – –

नगराज   :  हिमालय पर्वत

– सुभाष स. नाईक. Subhash S. Naik

सांताक्रुझ (प), मुंबई.  Santacruz (W), Mumbai.

Ph-Res-(022)-26105365.  M – 9869002126

eMail   : vistainfin@yahoo.co.in

Website : www.subhashsnaik.com / www.snehalatanaik.com

 

 

 

 

 

 

लेखकाचे नाव :
Subhash S. Naik
लेखकाचा ई-मेल :
vistainfin@yahoo.co.in
सुभाष नाईक
About सुभाष नाईक 297 Articles
४४ वर्षांहून अधिक अनुभव असलेले सीनियर-कॉर्पोरेट-मॅनेजर (आतां रिटायर्ड). गेली बरीच वर्षें हिंदी/हिंदुस्थानी, मराठी व इंग्रजी या भाषांमध्ये गद्य-पद्य लिखाण करत आहेत. त्यांची ९ पुस्तकें प्रसिद्ध झाली आहेत. पैकी ६ ‘पर्यावरण व प्रदूषण’ या विषयावरील इंग्रजी न हिंदी कवितांची पुस्तकें आहेत. दोन पुस्तकें , ‘रामरक्षा’ व ‘गणपति-अथर्वशीर्ष’ या संस्कृत स्तोत्रांची मराठी पद्यभाषांतरें आहेत. अन्य एक पुस्तक ‘मृत्यू आणि गत-सुहृद ’ हा विषयाशी संल्लग्न बहुभाषिक काव्याचें आहे. गदिमा यांच्या ‘गीत रामायणा’चें हिंदीत भाषांतर. बच्चन यांच्या ‘मधुशालचें मराठीत भाषांतर केलेलें आहे व तें नियतकालिकात सीरियलाइझ झालेलं आहे. टीव्ही वर एका हिंदी सिट-कॉम चें स्क्रिप्ट व अन्य एका हिंदी सीरियलमधील गीतें व काव्य लिहिलेलें आहे. कत्थक च्या एका कार्यक्रमासाठी निवेदनाचें हिंदी स्किप्ट लिहिलें आहे. अनेक मराठी व हिंदी पब्लिकेशब्समध्ये गद्य-पद्य लेखन प्रसिद्ध झालें आहे, जसें की, महाराष्ट्र टाइम्स, लोकसत्ता, सत्यकथा, स्वराज्य, केसरी, नवल, धर्मभास्कर, धर्मयुग, धर्मभास्कर, साहित्य अकादेमी चें हिंदी जर्नल ‘समकालीन भारतीत साहित्य’ , मराठी अकादेमी बडोदा चॅप्टर चें मराठी जर्नल ‘संवाद’, तसेंच प्रोफेशनल सोसायटीचें इंग्रजी जर्नल यांत लेखन प्रसिद्ध झालेलें आहे.मराठी , हिंदी व इंग्लिश वेबसाईटस् वर नियमित गद्य-पद्य लेखन. कांहीं ई-बुक सुद्धा प्रसिद्ध.
Contact: Website

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..