नवीन लेखन...

साडेसाती म्हणजे काय? -भाग २ रा ( उत्तरार्ध )

(ग्रह-तारे-नक्षत्रांवर विश्वास असलेल्यांसाठीच फक्त..बाकीच्यांनी वाचून सोडून द्यावं..)
‘साडेसाती’ म्हणजे काय? -भाग २ रा.( उत्तरार्ध )
लेखाच्या पहिल्या भागात सूर्य, चंद्र, बुध, मंगळ, शुक्र, गुरू व शनी प्रत्येक राशीत किती काळ मुक्कामाला असतात हे पाहिलं. शनीच्या साडेसातीकडे जाण्यापूर्वी आपण राहू आणि केतू या दोघांच्या प्रत्येक राशीतील मुक्कामाची थोडक्यात माहिती घेऊ.

राहू व केतू हे खरंतर ग्रह नसून पृथ्वीची सूर्याभोवती फिरण्याची कक्षा आणि चंद्राची पृथ्वीभोवती फिरण्याची कक्षा एकमेकांना ज्या दोन ठिकाणी छेदतात, ते दोन छेदन बिंदू आहेत. परंतू ज्योतिष शास्त्रात या छेदन बिंदूंना ग्रहांचा दर्जा दिला आहे. शनी खालोखाल राहू आणि केतू हे पापग्रह मानले गेले आहेत..राहू शरीराला ग्रासतो तर केतू मनाला असे ज्योतिषशास्त्र मानते. राहू आणि केतूचा एका राशीतील मुक्काम साधारणतः दीड वर्षापर्यंत असतो असं मानलं जातं.
आपण पूर्वी पाहिल्याप्रमाणे प्रत्येक ग्रहाचा प्रत्येक राशीतील मुक्काम त्याचा कालावधी संपेपर्यंत असतो. याचा अर्थ त्या ग्रहाची एखाद्या राशीच फळ देण्याची कुवत तो ग्रह त्या राशीत असे पर्यंतच असते. उदा. गुरु या ग्रहाने गेल्या वर्षी म्हणजे सन २०१६ च्या ११-१२ ऑगस्ट रोजी कन्या राशीत आपला मुक्काम हलवला.. गुरु एका राशीत एक वर्षभर राहतो. म्हणजे गुरु ग्रहाचा कन्येतील मुक्काम २०१७ च्या ऑगस्ट-सप्टेंबरपर्यंत राहिल. हा ढोबळ अंदाज आहे कारण ग्रहांचं वक्री-मार्गी होण्यानुसार नुसार त्यांचा मुक्काम कमी अधिक वाढत असतो. परंतु विषय समजण्यासाठी गुरु एक वर्ष एका राशीत राहतो हे लक्षात ठेवावं. या एक वर्षात गुरु त्या राशी व घरानुसार फळ देत राहतो. एक वर्षानंतर गुरु ज्या पुढल्या राशीत प्रवेश करतो त्या घरा आणि राशीप्रमाणे (आणि तिथे ग्रह असल्यास ग्रहाप्रमाणे) फळ देतो. शनी व्यतिरिक्त सर्वच ग्रह आपापल्या घरापुरतं व त्या घरातल्या राशीपुरतं बघतात व उगाच शेजाऱ्याच्या घरात ढवळाढवळ करत नाहीत. डाव्या-उजव्या हाताला असणाऱ्या शेजाऱ्यांच्या घरात डोकावून पाहण्याचा अधिकार मात्र शनीचा..!
पुढे जाण्यापूर्वी ‘घर’ म्हणजे काय ते बघू. कुंडलीच्या चार्टमध्ये ज्या मधल्या चार शंकरपाळ्या व चार कोपऱ्यात जे दोन दोन त्रिकोण दिसतात त्यांना ‘घर’ किंवा ‘स्थान’ असं म्हणतात. कुंडलीत एकूण १२ (बारा) घरं किंवा स्थानं असून घरं स्थिर असतात. घरांचे क्रमांकही १ ते १२ असे स्थिर असतात. प्रत्येक घरात राशी ही असतेच मात्र ती घराप्रमाणे स्थिर असेलच असे नाही. आपला जन्म दिवसाच्या किंवा रात्रीच्या कोणत्यावेळी झाला त्यानुसार पहिल्या घरातील राशीचा नंबर बदलत जातो व त्यापुढील घरात पहिल्या घरातील राशीचा नंबर लिहिला जातो. कुंडलीतील पहिल्या घराला ‘लग्न’ असं म्हणतात. उदा. कोणाच्यातरी जन्माच्या वेळेस पूर्व क्षितिजावर जर कर्क रास असेल तर कुंडलीतील पहिल्या घरात कर्केचा (४) आकडा येईल व पुढल्या राशींचा क्रमांक त्यापुढील घरात ५, ६, ७,…१२ असे क्लॉकवाईज येत जातील. ४ हा कर्केचा आकडा लिहिलेलं पाहिलं घर ‘लग्न’ म्हणून ओळखल जात. अशी कुंडली ‘कर्क लग्नाची’ असे म्हटले जाते. सोबतच्या फोटोत हे अधिक स्पष्ट होईल.

प्रत्येक घरात राशी ही असतेच मात्र तिथे ग्रह असेलच असं नाही तर कधी कधी एकाच घरात, एकाच राशीत एकापेक्षा पेक्षा जास्त ग्रह ही मुंबैकरांसारखे दाटीवाटीने राहत असतात.

शनी ज्या घरातील राशीत असतो, त्या घराच्या मागच्या आणि पुढच्या घरातील राशींना साडेसाती आहे असं म्हणतात. आपल्या शेजारच्या घरात जर अति महत्वाचा पाहुणा काही काळासाठी येणार असेल तर जसे पोलीसवाले आपली व शेजारची घरं तपासतात व काही काळासाठी शेजारच्या घराचा ताबा घेतात, तसं शनीचं आहे.

शनीचा प्रत्येक राशीतील मुक्काम अडीच (२.५ ) वर्षाचा असतो. शनी ६ जानेवारी पासून (काहींच्या मते २६ जानेवारी पासून येईल) धनु (धनु ही १२ राशीतली ९ वी रास) राशीत मुक्कामाला आला. धनुतला शनीचा मुक्काम ६ जानेवारीपासून पुढची अडीच वर्ष राहणार. धनुच्या पुढची रास मकर (१० वी रास) व मागची रास वृश्चिक ८ वी रास) म्हणून वृश्चिक(८), धनु(९) व मकर (१०) या राशींना साडेसाती आहे असे मानले जाते. आता ह्या तीनही राशींना पूर्ण साडेसात वर्षाची साडेसाती चालू असते का, तर तसं नाही. शनी ज्या राशीत मुक्कामाला येतो त्याच्या पुढच्या राशीला पूर्ण साडेसात वर्षाचा कालावधी, ज्या राशीत शनी येतो त्या राशीच्या साडेसात वर्षांपैकी अडीच वर्ष अगोदरच संपल्यामुळे शनीच्या मुक्कामाच्या राशीला पाच वर्ष तर शनीच्या मुक्कामाच्या राशीच्या मागच्या राशीचा पाच वर्षाचा कालावधी अगोदरच संपल्यामुळे अडीच वर्षाचा कालावधी अशी साडेसाती भोगावी लागते.
शनी काल ९ व्या राशीत आला म्हणजे ९ च्या पुढच्या १० व्या राशीला पूर्ण साडेसात वर्षांची साडेसाती सुरु झाली. शनी ज्या राशीत मुक्कामाला आला त्या ९ व्या राशीला ५ वर्षांची तर ९व्याच्या मागच्या ८ व्या राशीला २.५ वर्षांची साडेसाती असे म्हणतात. असंच क्रमानं पुढे चालू राहातं व ३० वर्षांनी पुन्हा शनी ७ व्या राशीत आला की पुन्हा ८ व्या राशीची साडेसाती सुरू होते.

साडेसातीचा प्रभाव प्रत्येकाच्या कुंडलीनुसार वेगवेगळा मिळतो. शनीचं भ्रमण ज्या स्थानातून/राशीतून सुरु असतं, त्या स्थानावरून पाहिल्या जाणाऱ्या जीवनातील त्या त्या गोष्टींवर शनीचा प्रभाव पडतो. अर्थात नखाला दुखापत झाली तरी पूर्ण शरीराला वेदना होतात तसं इथे होतं.
शनी ज्योतिषशास्त्रात पाप ग्रह मानला गेला आहे परंतु मुळात तो तसा नाही. शनी न्यायी आहे आणि न्याय करताना तो अजिबात आपपरभाव करत नाही. शनी मृत्यूचा कारक आहे. साडेसातीत काही लोकांवर कठीण प्रसंग येतात हे खरे असलं तरी याच काळात आपलं कोण आणि परकं कोण याची नव्याने ओळख होते. साडेसातीच्या काळात आपले अनेक निर्णय चुकतात, योजना फसतात, अनेकदा नको हे जीवन असेही प्रसंग काही लोकांवर येतात परंतु स्वतःवर विश्वास आणि चिकाटी असलेली माणसं यातून तावून सुलाखून बाहेर पडतात. म्हणजे शनी चिकाटी आणि सहनशीलता वाढवतो ज्याचा अंतिमतः आपल्याला फायदाच होतो..शनी वाईट काहीच करत नाही तर आपण आपल्या पूर्वायुष्यात केलेल्या कर्माची फळ देतो. *शनीच्या स्वतःच्या राशी असलेल्या मकर आणि कुंभ या राशींना साडेसाती तेवढीशी वाईट जात नाही कारण शनीच्या असलेल्या ह्या राशी मुळात चिकाटी असलेल्या, मेहेनती असतात त्यामुळे ह्या राशीच्या लोकांना साडेसातीचा प्रभाव जाणवत नाही.

अर्थात शनीची चांगली-वाईट फळं मिळणं हे प्रत्येकाच्या कुंडलीतील मूळ ग्रहांच्या स्थितीवर अवलंबून असतं. तसंच व्यक्तीच्या वयावरदेखील अवलंबून असतं. लहान मुलं किंवा फार वृद्ध व्यक्तींना साडेसाती अनुभवायला येत नाही कारण लहान वयात आपण आपल्या पालकांच्या पंखाखाली असतो तर वृद्धत्वात सर्व काही भोगून झाल्यामुळे साडेसाती आली काय आणि गेली काय, सारखंच अशी परिस्थिती असते.
साडेसातीला अजिबात घाबरू नका. शनी जे करतो ते चांगल्यासाठीच ह्यावर विश्वास ठेवा, अंतिमतः चांगलंच होत. फक्त टिकून राहा, स्वतःवरचा विश्वास ढळू देऊ नका.

(लेख समाप्त)

-नितीन साळुंखे
9321811091
www.astroganesh.in
salunkesnitin@gmail.com

नितीन अनंत साळुंखे  उर्फ गणेश
About नितीन अनंत साळुंखे  उर्फ गणेश 377 Articles
श्री नितीन साळुंखे (मित्रपरिवारात गणेश या नावाने परिचित) हे मुळचे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभववाडी तालुक्यातील खांबाळे या गावचे. सध्या मुक्काम मुंबईत. वाचन, लेखनाची अत्यंत आवड. स्वत:चा ७०० हून जास्त पुस्तकांचा संग्रह. इतिहास, भाषा,शब्दांचा जन्म, देव, धर्म, संस्कृती, प्रथा, परंपरा यांचा अर्थ काय व त्या कशा अस्तित्वात आल्या याचा शोध घेण्याची विशेष आवड. लहानपणापासून संघ स्वयंसेवक व संघविचारांशी एकनिष्ठ. पुणे येथील संघप्रणित सर्वात मोठ्या अशा जनता सहकारी बॅंकेतील प्रदिर्घ नोकरीनंतर त्यांचे मित्र आणि आमदार प्रमोद जठार यांच्याबरोबर काम करण्यासाठी त्यांनी २००७ मध्ये नोकरी सोडली. त्याचबरोबर मित्राबरोबर मुंबईत बांधकाम व्यवसायात पदार्पण. २०-२२ वर्षांचा ज्योतिष शास्त्राचा अभ्यास असल्यामुळे परिचितांमध्ये एक उत्तम ज्योतिषी म्हणून ओळख. सर्व थरातील मित्र. त्यातही बहुतकरून लेखक, कविंचा, कलाकारांचा जास्त भरणा.

2 Comments on साडेसाती म्हणजे काय? -भाग २ रा ( उत्तरार्ध )

  1. धन्यवाद साहेब तुमचा हा ब्लॉग मी वाचला अतिशय सोप्या भाषेत तुम्ही हे लोकांना समजून सांगता आपल्या जीवना मध्ये आपली पत्रिका किती महत्त्वाची आहे हे कळत.

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..