नवीन लेखन...

सरकार आणि सौंदर्यदृष्टी !!

माझं काही कामानिमित्त फोर्ट-चर्चगेट परिसरात जाणं होतं..हा परिसरच मुळी माझ्यावर गारूड करतो..सीएसटी पासून रमत गमत चालत निघायचं, ते सरळ  काळ्या घोड्यापर्यंत. तिथून पुढे रिगलच्या दारात असलेल्या विलिंग्डन फाऊंटनला वळसा घालून, सायन्स इन्स्टिट्यूट उजव्या हाताला ठेवून, पुढे त्याच रस्त्याने पुढे उजव्या बाजूचा वळसा घेऊन युनिव्हर्सिटी,  हायकोर्टाची मागली बाजू धरून  चर्चगेटला यायचं आणि मग लोकलने  घराच्या दिशेने..

कित्येकदा कामाच्या निनित्ताने व बऱ्याचदा निरुद्देश, ह्या परिसराच्या अनावर ओढीने मी ही परिक्रमा, वारकरी  पंढरीची वारी ज्या ओढीने करतो, त्याच ओढीने करत आलोय..ह्या परिसरात  मुंबईचं जुनं वैभव, दबदबा, अदब  जाणवते ती मुंबईच्या इतर भागात जाणवत नाही..इतर भाग सोडा, हाकेच्या अंतरावर असलेल्या मंत्रालय परिसरातही तो जाणवत नाही, तीथं जाणवते ते फक्त ‘शासन’..!

असो. माझा विषय मुंबईचा फोर्ट परिसर व त्याचे सुमारे तीन-साडेतीनशे  वर्ष  उलटून  गेली  तरी  अबाधीत  राहीलेलं  ‘रॉयल’ सौंदर्य व त्याची आपण लावत असलेली वाट हा आहे..वर उल्लेख केलेल्या परिसरातील एकेका इमारतीची  अदब, दबदबा(दहशत नाही) जाणवतो..त्या इमारतींमध्ये जाणीवपूर्व ठेवलेली सौंदर्यदृष्टी आंधळ्यालाही दिसेल..कोणत्याही इमारतीच्या प्रवेशदारावरची एखादी नजाकतभरी कमान असो वा वरच्या मजल्यावरच्या  एखाद्या लहानश्या झरोख्याचं डिझाईन  असो, सौंदर्याची जाणीव ठेवलेली आपल्याला लक्षात येते..

अश्या या खानदानी राजस परिसरात अलीकडे या सुरेख दृष्याला गावबोट लावाव्यात अश्या उभारलेल्या दोन गोष्टी नजरेला (अर्थात माझ्या) खटकू लागल्यात..एक म्हणजे सीएसटी स्टेशनाच्या अगदी दारात, म्हणजे कॅपिटॉल सिनेमाच्या समोर पोलिसांसाठी  एक ‘वॉच टॉवर’ उभारला आहे..सीएसटी स्टेशनची इमारतीचा समावेश ‘वर्ल्ड हेरीटेज’मध्ये होतो हे आपण सोडून उर्वरीत जगाला  माहीत आहे..हे असलं भव्य आणि सुंदर निर्माण स्वातंत्र्योत्तर मुंबईत पुन्हा झालं नाही आणि  होणारही नाही.. अश्या  या चित्रासारख्या आखीव रेखीव  इमारतीच्या नेत्रदिपक पार्श्वभूमीवर  मुंबईच्या पोलीस खात्याने लोखंडाचे  फॅब्रिकेशन करून, वर त्यावर बटबटीत निळा रंग थापून त्या परिसराशी पूर्णपणे  विसंगत असा ‘वॉच टॉवर’ उभारला आहे आणि तोही सीएसटीच्या अगदी दारात..कॅपीटॉल सिनेमाच्या दारात उभं राहून जर आपल्याला सीएसटी स्टेशनाचा फोटो काढायचा किंवा नुसत्या डोळ्यानेही आस्वाद घेण्याचा प्रयत्न हा ‘वॉच टॉवर’ अक्षरक्षः हाणून पडतो..!

सुरक्षेशो तडजोड करू नये हे तर खरंच (आता पोलीस मोबाईल वर व्यस्त असतात ही गोष्ट वेगळी..!)..या ‘वॉच टॉवर’ आवश्यकता असेल हे देखील खरं..असं असली तरी त्या इमारतीच्या पार्श्वभूमीला सुसंगत असं बांधकाम नाही का करता आलं असतं?  की काहीतरी बेढब, आनंदाचा बेरंग करणारी, सामान्यांना आपलीशी वाटू नये अशी काही गोष्ट केल्याशिवाय ती सरकारी आहे हे लोकांना पटणारच नाही अशी सरकारची समजूत आहे का? कितीतरी चांगले, या शहराविषयी आस्था असलेले डिझायनर्स या मुंबापुरीत आहेत, त्यांना विनंती केली असती तर त्यांनी आनंदानं सहकार्य केल असतं..असाच आणखी एक ‘वॉच टॉवर’ चर्चगेटच्या हुतात्मा चौकात अगदी ‘फ्लोरा फाऊंटन’ला चिकटून म्हणावा असा उभारला आहे..’फ्लोरा फाऊंटन’च्या अप्रतिम सुंदर शिल्पाचं असाच पांढरा आॅइल पेंट फासून असंच काही वर्षांपूर्वी ‘ब्युटीफिकेशन’च्या नावाखाली विद्रुपीकरण काही वर्षांपूर्वी केलं गेलंय, त्यात आणखी ही भर..!!

तसंच आपल्या उपनगरांत नव्याने बांधत असलेल्या ब्रिजेस, स्कायवॉक्स बद्दल..लोखंडी फॅब्रीकेशनचे लोखंडी अजस्त्र सापळे उभे करून ठेवलेत नुसते..कसा उपयोग करावासा वाटेल लोकांना ? या पार्श्वभूमीवर मला एक उदाहरण द्यायला आवडेल..नवी मुंबईतील वाशी वरून पुढे बेलापूरच्या दिशेने हायवेने जाताना आपण जुईनगर इथे उजवीकडे वळतो. तिथेच मुंबई-पुणे हायवेवर एक अतिशय सुरेख पूल आहे. लोकांना हायवे क्रोस करणे सोयीचे व्हावे यासाठी हा ब्रिज खूप पूर्वीच उभारला आहे..हा ब्रिज इतका देखणा आहे, की ज्याला रस्ता क्रोस करायचा नाही त्यालाही या मुद्दाम पुलावरून दोन वेळा रस्ता क्रोस करावासा वाटेल..मी ही काही कारण नसताना पुण्याला जाताना एक-दोन वेळा सहज म्हणून हा ब्रिज चढलो-उतरलो आहे..हमरस्त्यावरचा हा पूल आहे म्हणजे बहुदा तो सरकारीच असावा, म्हणजे सरकारला सौंदर्य दृष्टीचे वावडे नसावे, परंतु असे एकच निर्माण मला तरी दिसले..ते बहुदा अपवादाने नियम सिद्ध होतो हे सिद्ध करण्यासाठीच असावे..!

आपला वारसा, आपल्या शहराचा सन्मान आपणच जपायला हवा याच भान सरकारने ठेवणे गरजेच आहे.. सरकार थोडी सौंदर्य दृष्टी नाही का राखू शकत? असा काय खर्च येत असेल त्यात? की मानसिकताच नाही? काही कळायला मार्ग नाही..!!

–गणेश साळुंखे
9321811091
salunkesnitin@gmail.com

नितीन अनंत साळुंखे  उर्फ गणेश
About नितीन अनंत साळुंखे  उर्फ गणेश 377 Articles
श्री नितीन साळुंखे (मित्रपरिवारात गणेश या नावाने परिचित) हे मुळचे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभववाडी तालुक्यातील खांबाळे या गावचे. सध्या मुक्काम मुंबईत. वाचन, लेखनाची अत्यंत आवड. स्वत:चा ७०० हून जास्त पुस्तकांचा संग्रह. इतिहास, भाषा,शब्दांचा जन्म, देव, धर्म, संस्कृती, प्रथा, परंपरा यांचा अर्थ काय व त्या कशा अस्तित्वात आल्या याचा शोध घेण्याची विशेष आवड. लहानपणापासून संघ स्वयंसेवक व संघविचारांशी एकनिष्ठ. पुणे येथील संघप्रणित सर्वात मोठ्या अशा जनता सहकारी बॅंकेतील प्रदिर्घ नोकरीनंतर त्यांचे मित्र आणि आमदार प्रमोद जठार यांच्याबरोबर काम करण्यासाठी त्यांनी २००७ मध्ये नोकरी सोडली. त्याचबरोबर मित्राबरोबर मुंबईत बांधकाम व्यवसायात पदार्पण. २०-२२ वर्षांचा ज्योतिष शास्त्राचा अभ्यास असल्यामुळे परिचितांमध्ये एक उत्तम ज्योतिषी म्हणून ओळख. सर्व थरातील मित्र. त्यातही बहुतकरून लेखक, कविंचा, कलाकारांचा जास्त भरणा.

1 Comment on सरकार आणि सौंदर्यदृष्टी !!

  1. खूप सुंदर लेखक सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभववाडी तालुक्यातील आहेत त्याचा जास्त आनंद झाला कारण मीही वैभववाडी तालुक्यातील एक छोटीशी वाचक आहे खूप विषयांवर छोटे छोटे लेख लिहिले आहेत पण अशा पद्धतीचे लेखक वैभववाडीत नारायण सुर्वे सोडून कोणीतरी आहे याचा फार आनंद झाला

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..