नवीन लेखन...

संस्कृत भाषा व संस्कृती : भाग – (१.ब/११)

‘आर्य प्रचारकांनी लोकसमूहांतील निवडक व्यक्तींना संस्कृत शिकवलें असणार’ ही मांडणीच बरोबर नाहीं.
• वैदिक काळापासून संथा देऊन , योग्य पद्धतीनें वेदपठण शिकवत असत, व त्यासाठी तिथें गुरु-शिष्य परंपरा होती. (तशी संथा घेतली नाहीं तर, उच्चारात कुठे व कसे आघात द्यायचे हें कळणार नाहीं, व अर्थभिन्नता येऊं शकेल, असें म्हणतात ). आजही कांहीं पाठशाला तशी संथा देत आहेत. उदा. वाईची प्राज्ञ पाठशाला, सातार्‍यालाही असलेली एक पाठशाला, व उज्जैनलाही असलेली, असें माझ्या वाचनात आलेलें आहे.
• एक बाब आपण ध्यानात घ्यायला हवी, आणि ती ही की, भारतात पहिल्यापासूनच बहुभाषिकत्व होतें. त्यामुळे,( नंतरच्या काळात ), ज्यांना संस्कृत येत असे, त्यांची ‘मातृभाषा’ वेगळी असणें अर्थातच शक्य आहे. अशा व्यक्ती रोजच्या व्यवहारात त्यांची मातृभाषा; आणि सांस्कृतिक, धार्मिक, ज्ञानविषयक इत्यादी कार्यांसाठी संस्कृत वापरत असत. वैदिक-काळानंतरच्या कालखंडात जरी शूद्र व स्त्रिया यांना संस्कृत शिकायला बंदी होती (जें अर्थातच योग्य नव्हतें), तरी समाजाच्या मोठ्या भागाला ती शिकण्याची अनुमती होती. म्हणून, ‘मुद्दामच कांहीं निवडक व्यक्तीनाच संस्कृत शिकवलें गेलें’, असें म्हणणें अयोग्य आहे.
• चामु कृष्ण शास्त्री सांगतात की, पुरातन काळात संस्कृत ही सर्वसाधारण लोकांची बोली-भाषा होती. संस्कृतमध्ये शेतीविषयक विपुल शब्दसंपदा आहे. पाणिनी हा, जुगारी, चलाखीबाज, आणि गुंड लोकांच्या वापरात असलेले शब्दही देतो.
• पाणिनी (संस्कृत) भाषेबद्दल दोन कॅटेगरीज् देतो : ‘छंद’ (छांदस् ) म्हणजे वैदिक भाषा , आणि ‘भाषा’ म्हणजे लोकांच्या रोजच्या बोलचालीतील भाषा. ‘भाषा’ या शब्दाचा उगमच ‘भाष्’ म्हणजे ‘बोलणें’ हा आहे . (भाषण, संभाषण वगैरे शब्द आठवावेत ).
( संदर्भ : राजीव मलहोत्रा यांचा संस्कृतवरील ग्रंथ ; त्याचें डीटेल्स नंतर दिलेले आहेत ).
 याचा अर्थ असा की, ‘देववाणी (आर्ष-संस्कृत ) ही ‘देव’ या गटाची (Clan) भाषा होती ; व पुरातन काळीं ती सर्व-लोकांची बोली-भाषा होती.
• पण , कांहीं शतकांनतर, किंवा सहस्त्रकांनंतर ती प्रामुख्यानें ज्ञानभाषा झाली, संपर्क-भाषा (Link-Language) झाली, जसें युरोपमध्ये लॅटिन. त्यामुळे, ‘संस्कृत ही ज्ञानभाषा बनली ’, हें मोरे यांचे विधान योग्य आहे. मात्र, ‘बोलीभाषा या परस्पराच्या भगिनी , संस्कृत ही सर्वांची जननी अशी भावनिकताही निर्माण करण्यात आली ; … ती देववाणी असल्याचेंही सांगण्यात आलें ’, ही मोरे यांची मांडणी अयोग्य आहे. या त्यांच्या शब्दांमधून असें ध्वनित होतें की, ‘असें खरोखर नव्हतेंच, मात्र असा (खोटा) प्रचार केला गेला’.
• मात्र, आपण भाषिक इतिहास पाहिला तर, पाली, अर्धमागधी, महाराष्ट्री , शौरसेनी या ‘पाउड’ (‘प्राकृत’) भाषांतील शब्द म्हणजे संस्कृत शब्दांचे (किंवा , आर्ष-संस्कृत म्हणा हवें तर) सौकर्यीकरण (simplification) आहे, उदा. कृष्णचें कण्ण , कन्ह ; पुत्रचें पूत्त, मध्यमचें मज्झिम, मार्गचें मग्ग, धर्मचें ‘धम्म’, भिक्षुचें भिक्खु, अर्हंतचें अरिहंत, नमोचें णमो, वगैरे. त्या ( प्राकृत ) भाषांचे व्याकरणही सोपें झालेलें आहे. आणि, त्या भाषांमधूनच बदल होत-होत हल्लीच्या, आधुनिक-कालीन भाषा उद्भवल्या आहेत. म्हणजेच, आर्ष-संस्कृत ही भारतीय भाषांची जननीच आहे, (किंवा, आजी, पणजी म्हणा हवें तर) , व या प्रादेशिक-भाषा परस्परांच्या भगिनीच आहेत ; हें वस्तुत: सत्यच आहे , मुद्दाम प्रचार केली गेलेली एखादी खोटी गोष्ट नव्हे.
• हाल सातवाहन याच्या ‘गाथा सप्तशती’ या, इ.स. च्या पहिल्या शतकाच्या सुमारास लिहिलेल्या, महाराष्ट्री या प्राकृत भाषेतील ग्रंथाचें उदाहरण पहा. ही बघा त्यातील एका गाथेची एक ओळ :
‘सुह-उच्छअं जणं दुल्लहं पि दूराहि अहम आणन्त ’
महाराष्ट्री ही मराठीची ‘आजी’ असली तरी, तिचें संस्कृतशी साम्य आहे की आजच्या मराठीशी साम्य आहे, हें कुणीही सहज सांगूं शकेल
• एक साधी गोष्ट ध्यानात घेऊं या. आर्ष-संस्कृत साहित्य हें ऋग्वेदापासून उपलब्ध आहे ; आणि तें, काळाच्या संदर्भात, unbroken, continuous उपलब्ध आहे. कुठल्याही भाषेत साहित्य निर्माण होण्यासाठी ती भाषा आधीची कांहीं शतकें तरी ( ‘बोली’ म्हणून तरी ) अस्तित्वात असावी लागते, व तिच्यात परिपक्वता आल्यानंतरच तिच्यात साहित्य निर्माण होतें. (हल्लीचें उदाहरण म्हणून, कोंकणी भाषा पहा, म्हणजे वरील म्हणणें पटेल). पाली, अर्धमागधी, महाराष्टी इत्यादी प्राकृत भाषांमधील साहित्य बुद्ध-महावीर-कालोत्तर आहे. म्हणजेच, ज्या भाषांना आपण ‘प्राकृत’ असें म्हणतो, त्या भाषा बर्‍याच नंतरच्या आहेत.
• यासाठी आणखी एक पुरावा पाहूं या. तो म्हणजे अवतारांचा. (संदर्भ : नरहर कुरुंदकर, ‘व्यासांचें शिल्प’). अवतारांची मूळ कल्पना ‘ब्राह्मण’ ग्रंथांमध्ये येते. त्यांत प्रजापतीचे अवतार आहेत, आणि ते आहेत २४. त्यानंतर आलेल्या बौद्ध-जैन साहित्याचें पहा. तथागत बुद्धाचे ‘अवतार’ ही २४ . जैनांचे ‘तीर्थंकर’ही २४. अर्थातच, ही चोविसांची कल्पना त्यांनी आधीच्या ‘ब्राह्मण’ ग्रंथांवरून घेतलेली आहे, हें उघड आहे.
• गौतम बुद्धानेंही आधीच्या उपलब्ध ग्रंथांचें अध्ययन केलें होतें, त्यानें चारही वेद वाचलेले होते, असा उल्लेख आहे. म्हणजेच ते (संस्कृत) ग्रंथ आधीचे, व बुद्धोत्तर काळात बुद्धाचें तत्वज्ञान सांगणारें बौद्ध साहित्य नंतरचें आहे. जैनधर्म जरी बौद्ध धर्माहून प्राचीन असला तरी, त्याचें साहित्य लिखित स्वरूपात यायला आणखी कांहीं शतकें जावी लागली. (संदर्भ : नरहर कुरुंदकर).
• याचा अर्थ असा की ‘संस्कृत’ (म्हणजे, छांदस किंवा आर्ष-संकृत) ही भाषा ऋग्वेदाच्या किमान कांहीं शतकें तरी आधी बोलली जात होती. पाणिनीनें फक्त तिचें व्याकरण व्यवस्थितरीत्या मांडलें.
• पाणिनीच्या काळात, आणि उत्तर-पाणिनी काळात ‘संस्कृत’चें स्वरूप बदललें. उदा. वैदिक आर्ष-संकृतमध्ये ‘ळ’ हें व्यंजन आहे ( जसें की, ऋग्वातील ‘ अग्निम् ईळे पुरोहितम् ) ; पण नंतरच्या काळात, संस्कृतमधूण ‘ळ’ लुप्त झाला. ( पण, ‘ळ’ कांहीं प्राकृत भाषांमध्ये वापरात राहिला) .
कोणीही वैयाकरणी भाषा ‘निर्माण’ करत नाहीं, मग तो इंद्र ऋषि असो, यास्क असो, पाणिनी असो, कात्यायन असो, तोळकप्पयन असो, वा कुणीही असो. कोणीही कुठलीही भाषा vacuum मधून मुद्दाम निर्माण करूंच शकत नाहीं. एखादा जनसमूह एकमेकांशी communicate करतांना, संवाद साधतांना, शब्द व वाक्यांचा वापर करतो व त्यातून भाषा निर्माण होत जाते. वैयाकरणी फक्त तिचें व्याकरण लिहितात.
• आणखी एक गोष्ट अशी की, विविध भाषा एकमेकींकडून शब्दांची वगैरे देवाणघेवाण करतात, ही एक स्वाभाविक प्रक्रिया आहे, त्यानें भाषा समृद्धच होतात. मध्य युगातलें उदाहरण पहायचें तर, मराठीनें फारसीकडून घेतलेले शब्द पहा. त्यांतील अनेक शब्द मराठीत इतके रुळले आहेत, की ते परभाषेतून आले आहेत हें आपल्याला अनेकदा कळतही नाहीं. तेंच इंग्रजीनेंही इतर भाषांकडून शब्द घेऊन केलेलें आहे. आज मराठी आणि इतर भारतीय प्रादेशिक भाषा इंग्रजीकडून शब्द घेऊन तेंच साधत आहेत.
• वैदिक काळच्या किंवा नंतरच्या अन्य भाषांमधून आर्ष-संस्कृतनें कांहीं शब्द वगैरे घेतले असले तरी, त्यांच्यापासून आर्ष-संस्कृत किंवा संस्कृत भाषा तयार झालेली नाहीं. त्या इतर भाषा mostly आतां लुप्तही झालेल्या आहेत. मुंडा परिवारातील आजच्या भाषा पाहिल्या तर, त्यांचें रूपही पूर्णपणें बदललें आहे; त्यांनी संस्कृत, फारसी, हिंदी वगैरे भाषांमधून बरेंच कांहीं घेतलेले आहे. ( संदर्भ : ‘हो’ भाषा और साहित्य का इतिहास ; लेखक : डॉ. आदित्य प्रसाद सिन्हा ). (टीप : ‘हो’ ही मुंडा भाषा-परिवारातील एक भाषा आहे).
• प्राकृत साहित्य पहाल तर, तें गौतम बुद्ध व महावीर वर्धमान यांच्या काळानंतरचें आहे. आणि, हे दोघेही वैदिक काळाच्या बरेच नंतरचे आहेत, हें सर्वमान्य आहे, आणि आपण तें आधी पाहिलेंच आहे. प्राकृतमधील पैशाची भाषा, खरोष्ठी लिपी आतां लुप्त आलेल्या आहेत. महाराष्ट्री, शौरसेनी, पाली, अर्धमागधी या भाषांमध्येच बदल झालेले आहेत, व आजच्या प्रादेशिक भाषा तयार झालेल्या आहेत. ‘संस्कृत’ म्हणजे संस्करण झालेली, किंवा सुसंस्कृत असा कांहींही अर्थ घेतला तरी, ही भाषा, आधीच्या ‘छांदस’ (तसेंच, देववाणी व अन्य नांवानीही ओळखल्या जाणार्‍या) भाषेवर संस्करण होऊन, बदल घडून, रूपांतर झालेली भाषा आहे ; प्राकृत अथवा बोलीभाषांपासून ‘तयार’ झालेली भाषा नव्हे. त्यामुळे, मोरे यांची ही मांडणी मान्य करतां येत नाहीं.
• म्हणजे, निष्कर्ष असा की, संस्कृतला ‘देववाणी’ असें संबोधत, हा प्रचार नव्हे, तर वस्तुस्थिती आहे.
तसेंच, ‘आधीच्या ‘प्राकृत’ भाषांपासून नंतर संस्कृत तयार झाली’, या मोरे यांच्या वाक्याचेंही (statement) वैफल्यही आपोआपच दिसून येतें.
हिंदी ही संस्कृतनिष्ठ कशी बनली ? –
भारतात फारसी भाषाभाषी परक्यांची बराच काळ राज्यें होती. मुघलांचें तर प्रचंड साम्राज्य होतें. त्यांचीही राजभाषा फारसीच होती. आपण पाहिलें आहे की, या कारणामुळे मराठीसारख्या भाषेनेंही बरेच फारसी शब्द आपलेसे केले आहेत. हिंदीचें तर आणखी पुढचें पाऊल आहे. उर्दूचा उगम कोठे झाला या प्रश्नाचा ऊहापोह करण्याची ही जागा नव्हे. मात्र एक गोष्ट सर्वांनाच माहीत आहे की उर्दूमध्ये मुख्य व्याकरण हिंदीचें आहे, व शब्दांचा भरणा फारसीचा आहे. हिंदी व उर्दू या दोन्ही जरी अस्तित्वात होत्या , तरी १९ व्या शतकाच्या मध्यापर्यंत दैनंदिन वापरात ‘हिंदुस्तानी’ भाषा होती, जी या दोन्ही भाषांचें मिश्रण आहे. १९ व्या शतकाच्या सुरुवातीच्या कांहीं दशकांमध्ये बंगालमध्ये भाषाशुद्धीची चळवळ सुरूं झाली ; तिच्यापासून स्फूर्ती घेऊन, १९ व्या शतकाच्या मध्यावर हिदी शुद्धीकरणाची चळवळ सुरूं झाली. बनारस-अलाहाबाद भागात संस्कृताधारित हिंदी बोलली जात होतीच. म्हणून मग, हिंदीचें उर्दू व हिंदुस्तानीपासूनचें भिन्नत्व प्रस्थापित करण्यासाठी संस्कृताधारित-हिंदी ‘प्रमाण भाषा’ म्हणून स्वीकारली गेली. (मराठीच्या शुद्धीकरणाचा प्रयत्न एकतर शिवकाळातला ; व नंतर २० व्या शतकाच्या प्रारंभीचा, मुख्यत्वें स्वातंत्र्यवीर सावरकर , व कवि माधव ज्यूलियन यांचा. परंतु, तो एक वेगळाच विषय आहे).
 संस्कृतचें ऐक्यासाठी योगदान आहे की नाहीं, व असल्यास काय, याची चर्चा पुढे येईलच. ती आपण हेतुत: नंतर करणार आहोत.
( पुढे चालू )

– सुभाष स. नाईक. Subhash S. Naik
सांताक्रुझ (प), मुंबई. Santacruz (W), Mumbai.
Ph-Res-(022)-26105365. M – 9869002126
eMail : vistainfin@yahoo.co.in
Website : www.subhashsnaik.com / www.snehalatanaik.com

सुभाष नाईक
About सुभाष नाईक 297 Articles
४४ वर्षांहून अधिक अनुभव असलेले सीनियर-कॉर्पोरेट-मॅनेजर (आतां रिटायर्ड). गेली बरीच वर्षें हिंदी/हिंदुस्थानी, मराठी व इंग्रजी या भाषांमध्ये गद्य-पद्य लिखाण करत आहेत. त्यांची ९ पुस्तकें प्रसिद्ध झाली आहेत. पैकी ६ ‘पर्यावरण व प्रदूषण’ या विषयावरील इंग्रजी न हिंदी कवितांची पुस्तकें आहेत. दोन पुस्तकें , ‘रामरक्षा’ व ‘गणपति-अथर्वशीर्ष’ या संस्कृत स्तोत्रांची मराठी पद्यभाषांतरें आहेत. अन्य एक पुस्तक ‘मृत्यू आणि गत-सुहृद ’ हा विषयाशी संल्लग्न बहुभाषिक काव्याचें आहे. गदिमा यांच्या ‘गीत रामायणा’चें हिंदीत भाषांतर. बच्चन यांच्या ‘मधुशालचें मराठीत भाषांतर केलेलें आहे व तें नियतकालिकात सीरियलाइझ झालेलं आहे. टीव्ही वर एका हिंदी सिट-कॉम चें स्क्रिप्ट व अन्य एका हिंदी सीरियलमधील गीतें व काव्य लिहिलेलें आहे. कत्थक च्या एका कार्यक्रमासाठी निवेदनाचें हिंदी स्किप्ट लिहिलें आहे. अनेक मराठी व हिंदी पब्लिकेशब्समध्ये गद्य-पद्य लेखन प्रसिद्ध झालें आहे, जसें की, महाराष्ट्र टाइम्स, लोकसत्ता, सत्यकथा, स्वराज्य, केसरी, नवल, धर्मभास्कर, धर्मयुग, धर्मभास्कर, साहित्य अकादेमी चें हिंदी जर्नल ‘समकालीन भारतीत साहित्य’ , मराठी अकादेमी बडोदा चॅप्टर चें मराठी जर्नल ‘संवाद’, तसेंच प्रोफेशनल सोसायटीचें इंग्रजी जर्नल यांत लेखन प्रसिद्ध झालेलें आहे.मराठी , हिंदी व इंग्लिश वेबसाईटस् वर नियमित गद्य-पद्य लेखन. कांहीं ई-बुक सुद्धा प्रसिद्ध.
Contact: Website

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..