नवीन लेखन...

शिट्टी

गणपतीपुळेचं शांत बीच, सकाळची साधारण ६.१५ ची वेळ. सूर्याची कोवळी किरणे नुकतीच पाण्यावर फेर धरून नाचू लागलेली असतात. किनाऱ्यावर राधा शांतचित्ताने एकटक नजर लाऊन सूर्याकडे पाहत बसलेली आहे. मान डाव्या खांद्यावर लोटलेली, शरीराचा भार दोन्ही हातांवर मागे देऊन कोवळ्या किरणांना चेहऱ्यावर मुक्त खेळू देत. “आयुष्य रोज इतकं निवांत का असू नये” असा विचार मनाशी करत असते तोच एक आवाज तिच्या कानी येतो,   “राधा, ए राधा. अगं, काय हे? किती शोधायचं तुला? इथे केंव्हा आलीस आणि? सांगायचं तरी ना रूमच्या बाहेर निघतांना.” श्याम राधाला शोधतच आला.

“आलास? बैस. बघ ना, किती सुंदर दिसतो आहे सूर्य? आपल्या मुंबईत का नसेल दिसत  असा?” राधा.

“अहो मॅडम, सूर्य-पुराण नंतर दिवसभर चालू ठेऊ आपण. आता चलताय का? आपण ७ ला फिरायला निघणार होतो. साईट सीईंगला जायचे आहे ना?” श्याम.

“जा तुम्ही सारेजण. मी येथे फिरायला नाही, थोडं थांबायला आली आहे.” राधा.

“थांबायला? इतक्या दूर का आलीस थांबायला? घरीच थांबली असतीस ना मग? ऊठ बघू, तुझ्यामुळे सगळ्यांनाच उशीर नको” श्याम फिरकी घेत बोलला.

“श्याम, बसू देत ना रे. धावपळ तर पाचवीलाच पुजलेली आहे. इथे नको घड्याळ दाखवूस यार.” राधा उदास चेहऱ्याने बोलली.

“काय झाले राधा? ईतकी का उदास झाली आहेस? Come on, cheer up. प्रॉब्लेम विसरायलाच तर आलो आहोत आपण इथे. कोणी काही बोललं का तुला?” श्याम.

“कोण काय बोलेल रे? संधीच कुठे देतो आपण कोणाला? सतत इतरांच्या पुढे-पुढे करत असतो. घर असो नाहीतर ऑफिस, कोणाला काय हवं नको ते बघत असतो. प्रसंगी आपली कामे मागे ठेवतो आणि इतरांची करून देतो. सगळेच म्हणतात राधा खूप चांगली आहे. पण, राधाला काय म्हणायचं ते मात्र कोणीच ऐकून घेत नाही. (थोडं थांबून पुन्हा) श्याम, हरवल्यासारखं वाटतं रे. जगणं असं म्हणून काही होतंय असं वाटतच नाही बघ. पळणंच होतं आहे नुसतं. थकलीय रे मी आता.” राधा

“हम्म्, असं आहे तर? श्यामने हातातल्या घड्याळाकडे पहिले, तिला तो काही बोलणार तोच ती पुन्हा बोलू लागली.

“तुला तो संगीत-खुर्चीचा खेळ माहिती आहे ना? त्यात शिट्टी वाजली कि सर्वजण मिळेल त्या खुर्चीवर बसून घेतात; आपल्या आयुष्यातहि तसच पाहिजे होतं. कोणी तरी शिट्टी वाजवावी अन सर्वांनीच आहे नाही ती सर्व कामे टाकून खाली बसून जावं. मज्जा आली असती बघ. (एक दीर्घ उसासा टाकून) पण असं नाही होत आयुष्यात.” राधा पाण्यावर उठणाऱ्या तरंगांकडे बघत बोलली. श्यामला राधाच तरंगत असल्याचा भास झाला. तिला आणखी बोलतं करायला हवं असं त्याला क्षणभर वाटून गेलं.

“होऊ शकतं. का नाही होऊ शकत? फक्त शिट्टी वाजवण्याचं काम मात्र आपल्यालाच करावं लागणार. जेंव्हा खूप पळालो असं वाटेल तेंव्हा आपणच शिट्टी वाजवायची अन खाली बसायचं.” श्याम मिश्किलपणे हसत बोलला.

“आपणच शिट्टी वाजवायची? कुठे शक्य आहे ते? सकाळी उठल्यावर मुलांची तयारी करून घेण्यापासून जी सुरुवात होते ती रात्री त्यांचा अभ्यास घेऊन त्यांना झोपी घालेपर्यंत दिवस कसा संपतो तेच कळत नाही. त्यात पुन्हा माझं ऑफिस, पतीदेवांचे शेड्युल, सासूबाईंचं आजारपण…   ह्याच शिट्ट्या संपत नाहीत रे दिवसभर. त्यात आपली शिट्टी कुठून अन कशी वाजवणार? आपलं सगळं आयुष्य “अर्जंट” भोवती फिरतंय जे इतरांसाठी असतं; पण त्यात ते important मिस होतंय ज्यात आपलं खरं जगणं असतं, कारण ते फक्त आपल्यासाठी important असतं. इतर कुणालाही त्याचं सोयर-सुतक नसतं. म्हणूनच कधी-कधी वाटतं नकोत हि नाती अन हा फाफट-पसारा ” राधा आणखीनच खिन्न वाटू लागली.

“राधे, संगीत-खुर्चीच्या खेळात शिट्टी वाजवणारा महत्वाचा असतो. सर्व खेळाडू त्याच्या शिट्टीचा आदर करत असतात. आपल्या आयुष्यात खेळाडू पण आपणच असतो आणि शिट्टी वाजवणारे पण आपणच. आपलं महत्व आपणच जर स्वतःला नाही द्यायचं तर कोणी द्यायचं? प्रत्येक वेळी इतरांसाठी स्वतःला मागे ठेवायचं काही कारण नाही. स्वतःला महत्व द्यायला शिक. इतरांनाही ते पटवून दे. दिवसातला काही वेळ ठरवून तू स्वतःसाठी काढत चल. त्यावेळेत तू कोणाचंहि ऐकणार नाहीस आणि कोणासाठी काही करणार नाहीस याची प्रचीती सर्वांना येऊ दे. त्यावेळेत मग तुला जे आवडतं ते कर. एखादा छंद जोपास नाहीतर क्लास लाव. जगायला आणखी उर्मी येईल.” श्याम तिचं डोकं कुरवाळत बोलला.

“जमेल हे मला? रोज स्वतःसाठी वेळ काढता येईल? किती काय-काय सुरु असतं दिवसभर?” राधाने  साशंक होऊन विचारले.

“का नाही? तू कित्येक वेळा 3-D सिनेमा पाहिलास, 3 Dimention. आहेच काय ते? फक्त एक फील असतो. ईफेक्ट तोवरच जाणवतो जोवर तू चष्मा लावलेला आहेस, चष्मा काढला कि चित्र प्लेन दिसू लागतं, जणू काही नॉर्मल सिनेमाच आहे. आयुष्याचंहि तसच आहे. इथे Dimentions नक्कीच खूप जास्त आहेत मात्र, ईफेक्ट तोवरच जाणवतो जोवर आपण विचारांचा चष्मा घातलेला आहे, चष्मा काढला की ईफेक्ट बंद. म्हणूनच तर एकाच प्रसंगात दोन व्यक्ती वेगवेळ्या वागतात कारण त्यांचा चष्मा वेग-वेगळा असतो आणि म्हणून त्यांचा फीलसुद्धा. तो विचारांचा चष्मा अधून-मधून काढून ठेवायला शिक. पण त्याआधी सर्वात महत्वाचं, तुझ्याशिवाय हे जग चालू शकतं हे आधी स्वतःलाच ठणकावून सांग. आयुष्यातील गम्मत जितकी करून पाहण्यात आहे तितकीच ती दुरून पाहण्यातहि आहे. म्हणून कधी-कधी रिंगणाबाहेर येऊन उभी राहा; इतरांना खेळू दे. बघ, कशी  गम्मत येते ते. जगण्यासाठी मग असे २-3 दिवस वेगळे काढायची गरज नाही पडणार. जगणं हे रोजचच होऊन जाईल.” श्याम हसत बोलला. राधाला त्याचं पटत होतं. तिला आता हलकं वाटू लागलं.

shitti
स्वतःला वेळ देणं म्हणजे रिचार्ज होणं…

राधा बराच वेळ पाण्यावर उठणाऱ्या तरंगांकडे पाहत होती. श्यामने तिच्या मनाची चलबिचल ओळखली. “राधे, आपल्या प्रत्येकात एक अंतःस्थ उर्जा असते. ती उर्जा सतत आपल्याला काही एक करायचे सुचवत असते. तोच आपला छंद असतो. पैसा आणि करिअर तर ओघानेच आले परंतु आपलं मन सांगतंय म्हणून जर आपण आपला छंद जोपासत राहिलो तर जगायला मजा येते. तेच आपलं रिचार्ज होणं असतं. तुला अस्वस्थ वाटतंय त्याचं एक कारण हे हि असू शकेल कि तू आपल्या  छंदासाठी काहीएक करत नाही आहेस. बघ विचार कर.”

“चलतेस ना, उशीर होतो आहे आपल्याला?” शुभांगीने टेबल आवरत विचारलं. तशी राधा भानावर आली. “अं, काही म्हणालीस का शुभे?” हातातली फाईल बाजूला करत तिने विचारलं.

“चालायचं ना घरी? ७ वाजत आलेत. उशीर होईल पुन्हा ट्राफीकमध्ये. सकाळीच गणपतीपुळेला निघायचे आहे ना? त्याची तयारी करायला नको?” शुभांगी एकदम उत्साहात येऊन.

“गणपतीपुळे? कशाला?” राधा.

“अगं, असं काय करतेस? तूच म्हणत होतीस ना, जरा २-3 दिवस जगून येऊ म्हणून? विसरलीस वाटतं? आपली बाकी टीम तर तयार होऊन बसलीय.” शुभांगी मोठे डोळे करून बोलली.

“जगायला कशाला जावं लागतं गणपतीपुळेला? मी आता इथेच जगायचं ठरवलं आहे. त्यात काय एवढं? शिट्टी वाजवली की life सुरु.” शुभांगीला काही समजायच्या आत राधा पर्स घेऊन रूमच्या बाहेर पडली.

Avatar
About विनोद किशनराव राऊत 3 Articles
मानवी मन आणि त्याचे असंख्य पैलू हे माझे आवडीचे विषय असून त्याभोवती फिरणारं आयुष्य यावर मी मराठी ब्लॉग लिहितो. माझ्या ब्लॉगचे नाव वलयांकित.. शोध स्वतःचा! असे असून त्याची लिंक आहे https://www.valayankit.blog वाचकांनी थेट संपर्क करायला माझी हरकत नाही.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..